अश्विनी बिद्रे हत्याकांड खटल्यात पुरावे भक्कम

नवी मुंबई :  सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याकांड खटल्यात पुरावे भक्कम आणि पुरेसे असल्यामुळे स्पॉट व्हिजिट करण्याची गरज नसल्याचे पनवेलचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. जी. पालदेवार यांनी स्पष्ट केले आहे. अश्विनी बिद्रे यांची हत्या झालेले ठिकाण, त्यांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावलेली जागा आणि कुरुंदकरची ये-जा असलेल्या ठाण्यातील कार्यालय यांची स्पॉट व्हिजिट करण्यात यावी, अशी मागणी विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी केली होती. याप्रकरणी सुनावणी सुरू असताना स्पॉट व्हिजिटची आवश्यकता नाही, असे न्यायधीशांनी सांगितले.

अश्विनी बिद्रे हत्याकांडाचा तपास हा सर्व तांत्रिक मुद्यांवर आधारित आहे. आरोपी अभय कुरुंदकर, राजेश पाटील, कुंदन भंडारी आणि महेश फळणीकर यांच्याकडे वेगवेगळे नेटवर्क असलेले मोबाईल फोन होते. त्यामुळे एका नेटवर्कमध्ये एक सर्कल तर दुसर्‍या नेटवर्कमध्ये दुसरे सर्कल दाखवले जात आहे. त्यामुळे गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे. हा गैरसमज दूर व्हावा यासाठी विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी न्यायालयाने स्पॉट व्हिजिट करावी अशी मागणी केली होती. या मागणीवर ९ फेब्रुवारी रोजी सुनावणी सुरू असताना स्पॉट व्हिजिटला आरोपीच्या वकिलांनी विरोध केला होता. यावर शुक्रवारी सत्र न्यायाधीश के. जी. पालदेवार यांनी स्पॉट व्हिजिटची आवश्यकता नसल्याचा निर्णय दिला. या खटल्यात पुरेसे पुरावे असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

८४ साक्षीदार तपासले
अश्विनी बिद्रे हत्याकांड ११ एप्रिल २०१६ मध्ये घडले होते. त्यानंतर नवी मुंबई पोलिसांनी डिसेंबर २०१७ मध्ये अभय कुरुंदकर आणि राजेश पाटील यांच्या मुसक्या आवळल्या. या खटल्यात न्यायालयाने आतापर्यंत ८४ साक्षीदार तपासले असून या सर्वच साक्ष आरोपींच्या विरोधात गेल्या आहेत. खटल्यातील सर्वच साक्षीदारांची साक्ष नोंदवली गेल्यामुळे आता आरोपींचे जबाब नोंदवण्यासाठी प्रश्नावली तयार केली जात आहे. आरोपींचे जबाब नोंदवल्यानंतर दोन्ही बाजूच्या वकिलांमध्ये युक्तिवाद होणार आहे.  

 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

वाशी प्लाझा उड्डाणपुलावर ट्रेलर पलटी