थकीत कर भरुन जप्ती कारवाई टाळा; महापालिकेचे आवाहन

पनवेल :  पनवेल महापालिका कर संकलन-कर आकारणी विभागाच्या वतीने थकबाकीदारांच्या मालमत्ता कर वसुलीची मोहीम अधिक तीव्र करण्यात आली असून, वसुली पथकांच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे. आता ९ वसुली पथकांच्या माध्यमातून महापालिकेच्या विविध भागांमध्ये  जप्ती नोटिसांचे वाटप, तसेच थकबाकीदारांना मालमत्ता कर लवकर भरण्याबाबत सूचना देण्यात येत आहेत. निवासी, औद्योगिक आणि व्यावसायिक थकबाकीदारांनी थकीत मालमत्ता कर भरुन  जप्ती कारवाई टाळावी, असे आवाहन महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी केले आहे.

चारही प्रभागांमध्ये ९ पथकांच्या माध्यमातून पनवेल महापालिका कार्यक्षेत्रातील थकीत मालमत्ता कर दात्यांना ३८० जप्ती नोटिसांचे वाटप करण्यात आले आहे. पथकांच्या माध्यमातून वसुली मोहीम तीव्र करण्यात आली आहे. दरम्यान, मालमत्ता धारकांचा मालमत्ता कर भरण्याकडे ओढा वाढू लागला आहे. या आर्थिक वर्षात २७५ कोटी मालमत्ता कर जमा झाला आहे. तसेच आत्तापर्यंत एकूण ५६२ कोटींचा मालमत्ता कर महापालिकेच्या तिजोरीत जमा झाला आहे.

वसुली पथकांच्या माध्यमातून कळंबोलीतील स्टील मार्केट, मार्बल मार्केट, कामोठ्यातील विविध सोसायटी, जवाहर औद्योगिक वसाहत, रोहिंजण, तळोजा, खारघर, नवीन पनवेल अशा सर्व ठिकाणच्या थकबाकीदारांना भेटी देण्यात येत आहेत. जप्ती कारवाई टाळण्यासाठी मालमत्ता कर भरण्याचे आवाहन या वसुली पथकांच्या माध्यमातून करण्यात येत आहे. येत्या दिवसांमध्ये सदरची कारवाई अधिक तीव्र केली जाणार असल्याचे महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले आहे.

महापालिकने मालमत्ता कर ऑनलाईन भरण्यासाठी  ‘PMC TAX APP’ मोबाईल ॲप विकसित केले आहे. तसेच www. panvelmc.org या वेबसाईटवर जाऊनही आपला मालमत्ता कर नागरिकांना भरता येणार आहे. याच वेबसाईटवर मालमत्ताधारकांना मालमत्ता कर भरण्यासाठी महापालिकेत न येता ऑनलाईन पध्दतीने भरता यावा यासाठी महापालिकेने ‘सिटीझन प्रॉपर्टी टॅक्स पेमेंट गाईड' तयार केले आहे. याचा लाभ मालमत्ता धारकांनी घ्यावा. मालमत्ताधारकांना काही शंका असल्यास 1800-5320-340  या टोल फ्री क्रमांवर संपर्क साधावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

नुकत्याच झालेल्या सुनावणीवेळी उच्च न्यायालयाने पनवेल महापालिका कार्यक्षेत्रातील मालमत्ता कर आकारणीला महापालिकेस कोणतीही स्थगिती दिलेली नाही. त्यामुळे मालमत्ताधारकांनी आपला थकीत मालमत्ता कर भरुन महापालिकेस सहकार्य करावे. -गणेश देशमुख, आयुवत-पनवेल महापालिका. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘ती महोत्सव'चे दिमाखदार उद्‌घाटन