सर्वांचे घराचे स्वप्न पूर्ण करणार -मुख्यमंत्री

ठाणे : प्रत्येक सर्वसामान्य व्यक्तीचे स्वतःचे घर असावे, असे स्वप्न असते. शासन सर्वांच्या घराचे स्वप्न पूर्ण करणार, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे येथे केले.

 कोकण गृहनिर्माण-क्षेत्रविकास मंडळ (म्हाडाचा विभागीय घटक) म्हाडा सदनिका सोडत २०२३-२४ कोकण विभागातील ५,३११ सदनिकांच्या विक्रीसाठी ठाणे मधील राम गणेश गडकरी रंगायतन नाट्यगृह येथे २४ फेब्रुवारी रोजी आयोजित संगणकीय सोडत कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. याप्रसंगी गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, आमदार निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर, माजी आमदार रवींद्र फाटक, ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, ‘म्हाडा'चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल, ‘कोकण गृहनिर्माण-क्षेत्र विकास मंडळ'चे मुख्य कार्यकारी अधिकारी मारोती मोरे आदि उपस्थित होते.

अन्न, वस्त्र, निवारा काळाची आणि समाजाची मूलभूत गरज आहे. त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार सर्वातोपरी प्रयत्न करीत आहे. पंतप्रधान आवास योजना शहरी तसेच ग्रामीण या दोन्ही भागात राबविली जाते. अल्प उत्पन्न गट, अत्यल्प उत्पन्न गट आणि मध्यम उत्पन्न गटातील लोकांना सदर सदनिकांचे सोडतीद्वारे वाटप करण्यात येते, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. ‘पंतप्रधान आवास योजना'मध्ये आपल्याला केंद्राकडून मोठ्या प्रमाणात मदत मिळत आहे. राज्य सरकार कडून घरे मोठ्या प्रमाणावर वाढविण्याचा संकल्प करण्यात आला आहे. गिरणी कामगारांना देखील घरे देण्यास सुरुवात केली आहे. राज्य शासन अनेक गरजू कुटुंबांना घर देत आहे. आपले सर्वसामान्यांचे सरकार असून सर्व कामकाज पारदर्शक पध्दतीने चालले आहे. पायाभूत सुविधा पुरविण्यावर भर देण्यात येत आहे, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

शासनाकडून देण्यात येणारी सर्व घरे वेळेमध्ये पूर्ण झाली पाहिजेत. जे वेळेत घर पूर्ण करतील त्यांना सन्मानित करण्यात येईल. तर जे काम वेळेत काम करणार नाहीत त्यांना निश्चितच दंड आकारण्यात येईल असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हाडा सदनिका सोडती मध्ये ज्यांना घरे मिळाली आहेत, त्या सर्वांचे अभिनंदन केले.

याप्रसंगी ‘म्हाडा'चे अधिकारी-कर्मचारी, सोडतीमध्ये भाग घेतलेले नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

फुकटात चमकोगिरी करणाऱ्या नेत्यांना आता पायबंद