ठाणे जिल्ह्यामध्ये निवडणूक कामात नारी शक्ती अग्रेसर

ठाणे : रोजच्या जगण्यात एकाच वेळी अनेक आघाड्यांवर यशस्वी काम करण्याचे सामर्थ्य आणि कसब कुणात असेल ती म्हणजे कुटुंबातील महिला होय. अवकाशाला गवसणी घालण्याचे धाडस महिलांनी आजपर्यंत अनेक क्षेत्रात दाखवलेच आहे. तसेच  निःपक्षपणे प्रशासन चालवण्यातही महिलांनी आपली कर्तव्य दक्षता सिध्द केली आहे. म्हणूनच ठाणे जिल्ह्यातील ‘लोकसभा मतदारसंघ'मध्ये ‘आदर्श निवडणूक आचारसंहिता'चे काटेकोर पालन करुन निवडणुका पार पाडण्याचे काम जिल्ह्यातील महिला अधिकारी समर्थपणे सांभाळत आहेत. एका अर्थाने नारीशक्तीच निवडणुकीचे मोठे आव्हान यशस्वीपणे पेलताना दिसत आहेत.

देशात लोकसभा निवडणुका सर्वत्र सुरु आहेत. ठाणे जिल्ह्यात पाचव्या टप्प्यात निवडणुका होत असून यासाठी ठाणे जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. ठाण्यातील २४-कल्याण लोकसभा मतदारसंघ आणि २५-ठाणे लोकसभा मतदारसंघात निवडणूक निर्णय अधिकारी या महत्त्वाच्या पदावर महिला अधिकारी सक्षमपणे काम करीत आहेत. ठाणे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी अर्चना कदम या संपूर्ण जिल्ह्याच्या निवडणूक कामावर लक्ष ठेवत आहेत.

निवडणूक निर्णय अधिकारी पदाची जबाबदारी...

‘२४-कल्याण लोकसभा मतदारसंघ'च्या निवडणूक निर्णय अधिकारी पदाची धुरा उपजिल्हाधिकारी सुषमा सातपुते यांच्याकडे असून ‘२५-ठाणे  लोकसभा मतदारसंघ'च्या निवडणूक निर्णय अधिकारी पदाची धुरा अपर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये-धुळे यांच्याकडे आहे.

निम्म्या मतदारसंघात महिलांकडे जबाबदारी...

ठाणे लोकसभा मतदारसंघात ६ विधानसभा मतदारसंघ असून ३ विधानसभा मतदारसंघात सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून महिला अधिकारी समर्थपणे कामकाज सांभाळत आहेत. १४६-ओवळा माजिवडा येथे उपजिल्हाधिकारी शितल देशमुख, १४८-ठाणे विधानसभा मतदारसंघासाठी उपविभागीय अधिकारी उर्मिला पाटील, १५०-ऐरोली विधानसभा मतदारसंघासाठी उपजिल्हाधिकारी सुचिता भिकाणे या कामकाज पाहत आहेत.

तर ‘कल्याण लोकसभा मतदारसंघ'मध्ये ‘१४३-डोंबिवली विधानसभा मतदारसंघ'मध्ये उपजिल्हाधिकारी वैशाली परदेशी आणि ‘२४-कल्याण विधानसभा मतदारसंघ'मध्ये वैशाली लंभाते यांच्याकडे सहाय्य निवडणूक निर्णय अधिकारी पदाची जबाबदारी आहे. ‘२३-भिवंडी लोकसभा मतदारसंघ'मध्ये ‘१३९-मुरबाड विधानसभा मतदारसंघ'मध्ये अंजली पवार यांच्याकडे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी पदाची जबाबदारी असून त्या समर्थपणे जबाबदारी पार पाडत आहेत.

तसेच ‘भिवंडी लोकसभा मतदारसंघ'मध्ये तहसीलदार कोमल ठाकूर, ‘कल्याण लोकसभा मतदारसंघ'मध्ये तहसीलदार प्रशांती माने, तहसीलदार कल्याणी मोहिते, तहसीलदार स्वाती घोंगडे, ‘ठाणे लोकसभा मतदारसंघ'मध्ये आसावरी संसारे यांच्याकडे अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी पदाची जबाबदारी आहे.

‘जिल्हा निवडणूक कार्यालय' येथेही महिला अधिकाऱ्यांकडे महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. यामध्ये तहसीलदार उज्वला भगत, नायब तहसीलदार स्मितल यादव, निलिमा मेंगळ, हेमलता भोये यांचा समावेश आहे.

याशिवाय निवडणूक विषयक माहिती प्रसारमाध्यमांमार्फत जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कामही महिला अधिकारी सक्षमपणे सांभाळत आहेत. ठाणे महापालिका उप माहिती जनसंपर्क अधिकारी प्राची डिंगणकर या ‘२५-ठाणे लोकसभा मतदारसंघ'च्या प्रसिध्दीची जबाबदारी सांभाळत आहेत. तर ‘कल्याण लोकसभा मतदारसंघ'मध्ये कल्याण-डोंबिवली महापालिका जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे या देखील जबाबदारी सांभाळत आहेत. तसेच ‘ठाणे जिल्हा परिषद'च्या जनसंपर्क अधिकारी रेश्मा आरोटे याही एकत्रित माध्यम कक्षात प्रसिध्दीचे कामकाज सांभाळत आहेत.

ठाणे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या मार्गदर्शनाखाली लोकसभा निवडणुकांचे काम सुरु आहे. ‘भारत निवडणूक आयोग'ने आखून दिलेल्या मार्गदर्शक सुचनांनुसार ‘आदर्श आचारसंहिता'चे पालन करण्याचे काम या जिल्ह्यातील नारीशक्ती करीत आहे. स्वतःचे घर-संसार सांभाळात दिवसरात्र या महिला अधिकारी निवडणुकीचे काम अतिशय जबाबदारीने सांभाळत आहेत.

निवडणुकीसाठी रिंगणात असलेल्या उमेदवारांचे अर्ज दाखल करुन घेण्यापासून ते त्यांची अंतिम यादी तयार करणे, मतदान केंद्रे निश्चित करुन त्या ठिकाणी आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करुन देणे. मतदान  केंद्रावर निवडणुकीसाठी लागणाऱ्या ईव्हीएम मशीन्स, बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट, आदिंची उपलब्धतता करुन देणे, तसेच राखीव मशीन्स ठेवणे आदि सर्व कामांचा आढावा स्वतः निवडणूक निर्णय अधिकारी घेत आहेत. निवडणुकांसाठी ‘ठाणे'मध्ये दाखल झालेले केंद्रीय निवडणूक खर्च निरीक्षक यांच्याशी समन्वय साधणे. तसेच अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना मतदान करता यावे यासाठी टपाली मतदानाची सुविधा उपलब्ध करुन देणे, ८५ वर्षावरील आणि दिव्यांग व्यक्ती ज्या मतदान केंद्रापर्यत पोहोचू शकत नाही, अशा नागरिकांसाठी गृहमतदानाची सोय उपलब्ध करणे, अंध मतदारांसाठी ब्रेल लिपीतील व्होटर स्लीपची सोय करणे, जिल्हा प्रशासन करत असलेल्या कामांची प्रसार माध्यमांमार्फत जनतेपर्यंत माहिती पोहोचविणे, आदि सर्व जबाबदारी या महिला अधिकारी चोख पार पाडत आहेत. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

लोकसभा निवडणुकीसाठी नवी मुंबई पोलीस सज्ज