‘विकसित भारत संकल्प यात्रा'ला दिवाळे येथे उत्स्फुर्त प्रतिसाद

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका क्षेत्रात ‘विकसित भारत संकल्प यात्रा'चे ठिकठिकाणी आयोजन केले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या ‘संकल्प यात्रा'च्या उद्देश केंद्र सरकारच्या योजना या महिला- मुली, मागासवर्गीय युवक-युवती, प्रकल्पग्रस्त तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांपर्यंत पोहचवल्या जाव्यात, असा आहे. त्याअनुषंगाने २४ फेब्रुवारी रोजी ‘बेलापूर'च्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत बेलापूर विभागातील दिवाळे गांव परिसरात ‘संकल्प यात्रा'चा उपक्रम राबविण्यात आला.

यावेळी ‘आयुष्मान भवः अभियान'द्वारे विविध प्रकारच्या तपासण्या देखील करण्यात आल्या. तसेच आयुष्मान भारत कार्ड, उज्वला योजना, मुद्रा कर्ज योजना, प्रधानमंत्री आवास योजना अशा अनेक विविध केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ नागरिकांनी घेतला. दरम्यान, सरकार राबवित असलेल्या विविध योजनांचा लाभ जास्तीत जास्त लाभार्थ्यांना घेता यावा याकरिता लाभार्थ्यांनी सरकारी कार्यालयात येण्याऐवजी सरकारनेच लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याच्या दृष्टीने पंतप्रधान मोदी यांच्या संकल्पनेतून देशभरात ‘विकसित भारत संकल्प यात्रा' आयोजित केली जात आहे. त्यामुळे सदर योजनांचा नागरिकांनी जास्तीत जास्त प्रमाणात लाभ घ्यावा आणि सर्व संबंधित विभागांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी केले आहे.  

केंद्र सरकारच्या शहरी भागासाठी १५ विविध प्रकारच्या योजना असून त्याविषयीची माहिती वाहनांंवर लावलेल्या एलईडी स्क्रीनवरुन कार्यक्रम स्थळी प्रसारित केली जात आहे. त्याचप्रमाणे केंद्र सरकार, राज्य शासन तसेच नवी मुंबई महापालिका यांच्या लोककल्याणकारी विविध योजना आणि उपक्रम यांची माहिती देण्यासाठी कार्यक्रमाच्या ठिकाणी स्टॉल्स लावण्यात आले असून तेथे योजनांशी संबंंधित अधिकारी, कर्मचारी योजनांविषयीची माहिती देतील. तसेच योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करुन अर्ज दाखल करण्यास संपूर्ण सहकार्य करतील. त्यामुळे सदर योजना थेट नागरिकांपर्यंत पोहोचून पात्र नागरिकांना त्याचा लाभघेता येईल, असे आ. सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले.

यावेळी आ. सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या समवेत उपस्थितांनी ‘आपला संकल्प-विकसित भारत' अशी सामुहिक शपथ ग्रहण केली.

याप्रसंगी माजी नगरसेविका राजश्री कातकरी, प्रभाग समिती सदस्य बाळकृष्ण बंदरे, ज्येष्ठ समाजसेवक जी. एल. करणानी, ‘खांदेवाले मच्छीमार संस्था'चे अध्यक्ष रमेश हिंडे, समाजसेवक सुधीर पाटील, ‘एकविरा रिक्षा चालक-मालक संघटना'चे अध्यक्ष ज्ञानेश्वर कोळी, ‘छाया कला सर्कल'चे सदस्य घनश्याम कोळी, सहाय्यक आयुक्त शशिकांत तांडेल, विकसित भारत नोडल अधिकारी फिरोज तडवे तसेच भाजप कार्यकर्ते आणि महापालिका अधिकारी उपस्थित होते.

सरकारच्या योजना या मोबाईल मधील ॲपवर असून ॲपवर माहिती भरुन योजनांचा लाभ घेणे लाभार्थ्यांना सहजशक्य आहे. तरीही नागरिकांकडे मोबाईल आहे, मोबाईलमध्ये ॲप देखील आहे, मात्र ते वापरण्याचे ज्ञान नाही, अशी परिस्थिती बदलण्याची गरज आहे. या दोन्ही गोष्टींची सांगड घालण्यासाठी तसेच जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा या दृष्टीने महापालिकेच्या वतीने अधिक प्रभावीपणे प्रयत्न केला जाईल. याकामी लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था, प्रसारमाध्यमे यांचीही मदत घेतली जाईल. - आमदार सौ. मंदाताई म्हात्रे, बेलापूर. 

 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

ठाणे महापालिका क्षेत्रात विकसित भारत संकल्प यात्रेस साडेचार लाख नागरिकांनी दिली भेट