मराठा आंदोलनकर्त्यांना एपीएमसी प्रशासनाची साथ

वाशी : मराठा समाज आरक्षणासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईकडे निघालेला पायी मोर्चा २५ जानेवारी रोजी नवी मुंबई मध्ये मुक्कामी होता. त्यामुळे या आंदोलनकर्त्यांच्या निवास आणि जेवणाची सोय करण्यासाठी वाशी मधील एपीएमसी बाजार आवार बंद ठेवून माथाडी, मापाडी कामगारांसह  एपीएमसी प्रशासनाने देखील मराठा आंदोलनकर्त्यांना साथ दिली आहे.

२५ जानेवारी रोजी मराठा मोर्चा नवी मुंबई मध्ये  दाखल झाला असून, एपीएमसी बाजार आवारात आंदोलनकर्ते मुक्कामी होते. यासाठी बाजार समिती प्रशासनाने पाचही मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे वाशी मधील एपीएमसी बाजार आवारात सकाळपासूनच शुकशुकाट होता. तर दुसरीकडे आंदोलनकर्त्यांच्या जेवणासाठी सकाळपासूनच तयारी सुरु ठेवण्यात आली होती. नवी मुंबई मधील मराठा समाज बांधव तसेच माथाडी-मापाडी कामगारांद्वारे पाच ते सात लाख लोकांसाठी पाचही बाजार आवारात जेवण शिजवले गेले होते.तर नवी मुंबई महापालिका देखील दिमतीला हजर होती. महापालिकेने पाण्याचे टँकर तसेच फिरते शौचालय दिले होते. तर पनवेल महापालिकेने देखील आंदोलनकर्त्यांना शौचालय पुरवले होते.तसेच वैद्यकीय सुविधा केंद्र सज्ज ठेवले होते, अशी माहिती एपीएमसी सभापती अशोक डक यांनी दिली.
वाशी मधील एपीएमसी बाजार आवारात मराठा समाज आंदोलनकर्त्यांसाठी सुरु असलेल्या तयारीवर माथाडी संचालक तथा आमदार शशिकांत शिंदे , ‘आण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ'चे अध्यक्ष नरेंद्र पाटील आणि एपीएमसी सभापती अशोक डक आदी लक्ष ठेवून होते.

वाशी मधील एपीएमसी बाजार आवारातील १७५ एकरवर व्यवसाय चालतो. यामध्ये भाजीपाला, फळे, कांदा-बटाटा, मसाला आणि धान्य बाजार यांचा समावेश आहे. दररोज १५०० पेक्षा अधिक ट्रक आणि टेम्पो भाजीपाला महाराष्ट्र, कर्नाटकमधून एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये पाठवतात. या भाजीपाल्याची लहान भाजी विक्रेते मुंबई शहरात नेऊन विक्री करतात. भाजीपाला मार्केटमधील रोजची एकूण उलाढाल चार कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. एपीएमसी फळ मार्केटमध्ये देशभरातून १२०० व्यापारी फळे मागवतात. एपीएमसी फळ मार्केटमध्येही दररोज ५ ते ६ कोटी रुपयांचा व्यवसाय चालतो. मसाला मार्केटमध्ये सुक्या मेव्यासह मसाले परदेशातून तसेच राजस्थान आणि गुजरात या राज्यांमधून मोठ्या प्रमाणात विकले जातात. एपीएमसी मसाला मार्केटमध्ये दररोजची उलाढाल ७ कोटींपेक्षा अधिक आहे. एपीएमसी कांदा-बटाटा बाजारात दररोज जास्तीत जास्त १०० ते १५० ट्रक आणि किमान ९० ते १०० ट्रकची आवक असते. लसूणही या बाजारात उपलब्ध आहे. पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेशसह उत्तरेकडील राज्यांतून ६० ट्रकपेक्षा जास्त ट्रक बटाटे  एपीएमसी कांदा-बटाटा बाजारात येतात. महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात इत्यादी राज्यांतून कांद्याची खरेदी केली जाते.  एपीएमसी कांदा-बटाटा बाजारातील दररोजची एकूण उलाढाल एक कोटीच्या आसपास आहे. दाणा बाजारमध्ये देशभरातून डाळ, धान्य, साखर, गहू, तांदूळ आदी जीवनावश्यक वस्तूंची खरेदी केली जाते. दहा कोटी रुपयांहून अधिक उलाढाल असलेल्या या बाजारात सर्वाधिक उलाढाल होते. यासोबतच ८ हजार पेक्षा अधिक माथाडी कामगार एपीएमसी  बाजारात काम करतात. यासोबतच देश आणि राज्यभरातून दररोज १२०० पेक्षा अधिक ट्रक एपीएमसी  बाजारात येतात. तर १५०० पेक्षा अधिक टेम्पो-ट्रक स्थानिक पातळीवर माल पोहोचवण्याचे काम करतात. ५ एपीएमसी मार्केटमधून संपूर्ण नवी मुंबईसाठी जीवन वाहिनीचे काम चालते. एपीएमसी परिसर आणि आजूबाजूला शंभर पेक्षा अधिक हॉटेल्स आहेत. त्यांच्यावर वाहतूक व्यवसाय करणारे छोटे-मोठे व्यापारी अवलंबून आहेत. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

कातकरी जमातीच्या सर्वांगीण विकासासाठी यंत्रणांनी संवेदनशीलपणे काम करावे -डॉ. महेंद्र कल्याणकर