मिरा-भाईंदर महापालिकेत ‘सीसीटीव्ही मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्ष'
वेलची चोरल्याच्या आरोपावरुन कामगाराला मारहाण करुन दिली अमानुष वागणूक
नवी मुंबई : एपीएमसी मसाला मार्केटमधील स्वस्तिक ट्रेडर्स च्या दुकान मालकाने व त्यांच्याकडे कामाला असलेल्या कर्मचा-यांनी 50 किलो वेलची चोरल्याच्या आरोपावरुन त्यांच्या दुकानात कामाला असलेल्या एका कामगाराला कपडे काढुन बेदम मारहाण करुन त्याला बुट चाटण्यास लावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे सदर आरोपींनी या सर्व प्रकाराचे मोबाईलवरुन चित्रीकरण सुद्धा केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकाराची एपीएमसी पोलिसांनी गंभीर दखल घेऊन कामगाराला मारहाण करुन त्याला अमानुष वागणुक देणाऱया सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करुन सर्वांना अटक केली आहे.
या मारहाणीत जखमी झालेल्या कामगाराचे नाव राकेश पटेल (30) असे असून तो मागील दोन महिन्यांपासून एपीएमसी मसाला मार्केट मधील रौनक भानुशाली यांच्या स्वस्तिक ट्रेडर्स या मसाला व ड्रायफ्रूट च्या दुकानामध्ये काम करत होता. गत 26 मार्च रोजी राकेश पटेल याने दुकानातून 50 किलो वेलची चोरल्याचा मालक रौनक पटेल याला संशय आला होता. त्यामुळे त्याने रात्री राकेशच्या फोनवर कॉल करुन त्याच्या बहिणीला त्याबाबत माहिती दिली होती. त्यानंतर देखील रौनक भानुशाली हा पहाटे अडीच वाजेपर्यंत राकेशला कॉल करत होता. दुसऱ्या दिवशी राकेश नेहमीप्रमाणे कामावर गेल्यानंतर सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास दुकान मालक रौनक भानुशाली याने राकेशकडे दुकानातून चोरीला गेलेल्या 50 किलो वेलची बाबत विचारणा केली.
मात्र राकेशने वेलची चोरी केले नसल्याचे सांगितल्यानंतर सदर दुकानात काम करणा-या कर्मचा-यांनी मालक रौनक भानुषाली याच्या सांगण्यानुसार राकेशला दुकानाच्या टेरेसवर नेले. त्यानंतर भानुशाली याने राकेशला कपडे काढण्यास सांगुन त्याला लाथा बुक्क्यांनी तसेच फ्लॅस्टिकच्या लाठीने बेदम मारहाण केली. या मारहाणीचा रौनक भानुषाली व करण या दोघांनी मोबाईलमध्ये व्हिडीओ चित्रण सुद्धा केले असून त्या व्हिडीओमध्ये राकेशवर दबाव आणून जबरदस्तीने त्याला इलायची चोरल्याचे कबुल करण्यास रौनक भानुषाली याने भाग पाडले. त्यानंतर रौनक भानुषाली याने राकेशने चोरी केल्याचे कबूल केल्यामुळे त्याला पायातील बुट चाटायला लावले.
अशा पद्धतीने राकेशला अमानुष व क्रुर वागणुक दिल्यानंतर रौनक भानुषाली व त्याच्या सहका-यांनी राकेशला जखमी अवस्थेत एपीएमसी पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी राकेशला वैद्यकीय उपचारासाठी पाठवल्यानंतर मारहाणीमुळे राकेशच्या नाकाचे हाड फ्रॅक्चर झाल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी या प्रकाराची गंभीर दखल घेऊन रौनक भानुषालीसह त्याचे कर्मचारी संजयभाई, विरु, लालजी, योगेश, करण या सहा जणांविरोधात विविध कलमांद्वारे गुन्हा दाखल करुन सर्वांना अटक केली आहे.
अजय शिंदे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक एपीएमसी पोलीस ठाणे)
स्वस्तिक ट्रेडर्स या दुकानात काम करणा-या कामगाराला वेलची चोरल्याच्या आरोपावरुन मारहाण करुन त्याला अमानुष वागणुक देण्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर दुकान मालकासह सहा जणांविरोधात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने या सर्वांची तीन दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.