‘अटल सेतू'वर १४४ वाहनांवर कारवाई

उरण : ‘शिवडी-न्हावा शेवा सी-लिंक (अटल सेतू)'वर शासनाच्या, पोलीस यंत्रणेच्या नियमांचे काटेकोरपणे पालन न करता काही वाहन चालक आपली वाहने थांबवून सेल्फी (फोटो) काढण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण होणार असल्याने कायद्याचे पालन न करणाऱ्या अशा वाहनांवर नवी मुंबई पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार कारवाईच सत्र सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे  ‘अटल सेतू'वर कोणीही वाहने थांबवू नयेत, असे आवाहन ‘न्हावा-शेवा वाहतूक शाखा'चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जी. एम. मुजावर यांनी केले आहे.

‘अटल सेतू'चे उद्‌घाटन १२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते झाले असून, या पुलावर दुचाकी आणि तीन चाकी वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. तसेच ‘अटल सेतू'वर चार चाकी वाहनांकरिता वेग मर्यादा १०० किलोमीटर प्रति तास इतकी ठेवण्यात आली आहे .तसेच सदर पुलावर कोणत्याही परिस्थितीत विनाकारण थांबण्यास आणि वाहन पार्क करण्यास मनाई करण्यात आली आहे. असे असताना देखील अनेक वाहन चालक आपली वाहने ‘अटल सेतू'वर पार्क करुन सेल्फी काढण्यात तसेच फोटो काढण्यामध्ये व्यस्त असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. सदर प्रकारामुळे भविष्यात एखादा गंभीर अपघात होऊ शकतो. वाहन चालकांच्या बेशिस्त वर्तणुकीस आळा घालण्याकरिता ‘न्हावा-शेवा वाहतूक शाखा'च्या वतीने विनाकारण अटल सेतूवर वाहने पार्क केलेल्या आणि रहदारीस अडथळा निर्माण करणाऱ्या एकूण १४४ वाहन चालकांविरुद्ध कलम १२२/१७७ मोटर वाहन कायद्याप्रमाणे प्रत्येकी ५०० ते १५०० रुपये इतक्या रवकमेची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुजावर यांनी दिली.

‘अटल सेतू'वर विनाकारण थांबलेल्या लोकांना हटविण्यासाठी दोन गस्ती पथके नेमण्यात आली असून जो कोणी  नियमांचे उल्लंघन करेल त्या व्यक्तीवर आणि वाहन चालकाविरुध्द यापुढे दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे ‘शिवडी-न्हावा-शेवा सी-लिंक'वरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांनी ‘अटल सेतू'वर विनाकारण त्यांचेपार्क करु नये. रहदारीच्या वाहनांना अडथळा होईल असे वर्तन करु नये. अन्यथा संबंधितांविरुध्द आणखी कठोर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात येत आहे. -जी. एम. मुजावर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक-न्हावा शेवा वाहतूक शाखा.

अटल सेतू सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला
वाहनधारकांनी वेग मर्यादा आणि नियमांचे पालन करण्याचे मुख्यमंत्री शिंदे यांचे आवाहन
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी १२ जानेवारी रोजी ‘अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतू'चे राष्ट्रार्पण केले. अटल सेतू १३ जानेवरी पासून सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला झाला आहे. वाहन चालकांनी ‘अटल सेतू'वरुन प्रवासाचा आनंद घेताना वेग मर्यादा आणि नियमांचे पालन करावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.

भारतातील सर्वाधिक लांबीचा सागरी सेतू अशी या ‘अटल सेतू'ची ओळख आहे. यामुळे दक्षिण भारतासह पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि गोवा यांचे अंतर कमी होणार आहे. अटल सेतू देशातील एक प्रमुख अभियांत्रिकी आविष्कार ठरला आहे. या सेतू वरुन प्रवास करणे आपल्या सगळ्यांसाठी एक अभिमानाचा क्षण असणार आहे. सदरचा क्षण अनुभवताना वाहन वेगमर्यादा लक्षात घेऊन सुरक्षितपणे प्रवास करावा, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

दरम्यान, ‘अटल सेतू'सह सर्वच महामार्गावरुन सर्वांनी सुरक्षित आणि आनंददायी प्रवास करण्याचे आवाहनही मुख्यमंत्री शिंदे यांनी केले आहे. 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

  "निर्णय तुमचाच जबाबदारीही तुमचीच" संदेशाने "रस्ता सुरक्षा अभियान-२०२४"चा शुभारंभ