पायाभूत सुविधांमध्ये वैद्यकिय आरोग्य सेवांवरती महापालिकेचा भर

महापालिकेच्या आरोग्य सेवा सुविधांना नागरिकांचा उत्तम प्रतिसाद

पनवेल : पायाभूत सुविधांमध्ये वैद्यकिय आरोग्य सेवा देण्यावरती पनवेल महापालिका भर देत आहे. पनवेल महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेच्या वैद्यकिय सेवांना बळकटी देण्यासाठी ९ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये गेल्या मे महिन्यापासून सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत ओपीडी सेवा सुरु करण्यात आली आहे. या सेवेला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. मे महिन्यात ओपीडी सेवा सुरु केल्यापासून ते आजपर्यंत सुमारे ३१ हजार १७३ नागरिकांनी या सेवेचा लाभ घेतला आहे.

गरोदर मातांपासून ते जेष्ठ नागरिकांपर्यत सर्व नागरिकांना पनवेल महापालिका नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सकाळी १० ते  रात्री १० वाजेपर्यंत आरोग्य सेवा मिळत आहे. यासाठी पनवेल महापालिका उपायुक्त सचिन पवार यांनी दिलेल्या सूचनांनुसार प्रत्येक आरोग्य केंद्रासाठी १ वैद्यकिय अधिकारी, १ लॅब टेक्निशियन, १ फार्मासिस्ट, १ परिचारिका, १ हाऊसकिपींग असा पाच कर्मचाऱ्यांचा स्टाफ नव्याने भरती करण्यात आला आहे.

पनवेल महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी सर्वसामान्य नागरिक दिवसभर काम करुन संध्याकाळी दवाखान्यात येत असल्याचे लक्षात घेऊन महापालिकेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांवरती सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत आरोग्य सेवा देण्याचा अत्यंत स्तुत्य निर्णय घेतला होता. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवरती नव्याने सुरु झालेल्या या ओपीडी सेवेला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून, मे महिन्यात ओपीडी सेवा सुरु केल्यापासून ते आजपर्यंत सुमारे ३१ हजार १७३ नागरिकांनी या सेवेचा लाभ घेतला आहे.
महापालिका प्राथमिक आरोग्य केद्रांच्या ओपीडी सेवेमध्ये आरोग्य सल्ला, प्राथमिक आरोग्य उपचार, आपत्कालीन सेवा, संसर्गजन्य रोग उपचार, असंसर्गजन्य रोग उपचार, उच्च रक्तदाब, मधुमेह तपासणी आणि प्रतिबंध नियंत्रण, ताप दवाखाना, प्रसुतीपूर्व सेवा, नवजात शिशुंना दिल्या जाणाऱ्या आरोग्य सेवा, नियमित लसीकरण, कोविड लसीकरण, समुपदेशन सेवा देत आहेत. तसेच  प्रयोगशाळेमध्ये ४० प्रकारच्या चाचण्यांचे निःशुल्क निदान केले जात आहे. याचबरोबर औषध सेवाही पुरविली जाते.


पनवेल महापालिका जास्तीत जास्त चांगल्या वैद्यकिय सेवा नागरिकांना देण्यासाठी प्रयत्न करत आहे. नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून येत्या काही दिवसांमध्ये लसीकरण कार्यक्रम, मिशन इंद्रधनुष्य मोहिम, अतिसार नियंत्रण कार्यक्रम आणि राष्ट्रीय जंतनाशक कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. सदर कार्यक्रम राबविण्यासाठी नागरिकांनी महापालिकेला सहकार्य करावे. - डॉ. आनंद गोसावी, मुख्य वैद्यकिय अधिकारी - पनवेल महापालिका. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

इर्शाळवाडी पुनरावृत्ती होण्याची  शक्यता?