बाजारात टोमॅटो लालेलाल

किरकोळ बाजारात प्रतिकिलो ६० रुपये

वाशी : वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) भाजीपाला बाजारात परराज्यातून आणि महाराष्ट्र राज्यातून होणारी ‘टोमॅटो'ची आवक कमी झाल्याने घाऊक बाजारात ‘टोमॅटो'चे भाव वधारले आहेत. परिणामी किरकोळ बाजारात देखील टोमॅटो चांगलेच महाग झाले आहेत. घाऊक बाजारात प्रतिकिलो  १८-२८ रुपयांनी उपलब्ध असलेले टोमॅटो २२ जून रोजी २८-४० रुपये दराने प्रतिकिलो विक्री झाले. किरकोळ बाजारात ६० रुपये किलो दराने टोमॅटो उपलब्ध आहेत.

वाशी मधील एपीएमसी बाजारातच टोमॅटो कमी प्रमाणात दाखल होत आहेत. परिणामी आवक कमी आणि मागणी जास्त यामुळे टोमॅटो दरवाढ झालेली आहे. घाऊक बाजारामध्येच टोमॅटो २८-४० रुपये प्रतिकिलो या दराने विक्री होत आहेत. एपीएमसी बाजारात सध्या राज्यातील टोमॅटो दाखल होत असून, बंगळुरु मधून होणारी टोमॅटो आवक पूर्णतः बंद आहे. त्याठिकाणी मालाचे दर वधारले असल्याने बाजारात टोमॅटो दाखल होत नाही. आधी एपीएमसी बाजारात ‘टोमॅटो'ची ४०-५० गाड्या आवक होत होती. मात्र, आता उत्पादन कमी झाले आहे. एपीएमसी बाजारात ५० % आवक असून, ‘टोमॅटो'च्या २०-२५ गाड्या दाखल होत आहेत.

मध्यंतरीच्या कालावधीत उत्पादन वाढल्याने ‘टोमॅटो'ला कवडीमोल बाजारभाव मिळत होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी टोमॅटो उत्पादनाकडे अधिक लक्ष न दिल्याने टोमॅटो उत्पादन घटले आहे. त्यामुळे बाजारात आता मागणी वाढत असल्याने टोमॅटो दर वाढत आहेत, असे मत  वाशी मधील एपीएमसी बाजारातील भाजीपाला व्यापाऱ्यांनी व्यक्त केले. 

 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘महावितरण'च्या भरारी पथकाची कारवाई