मिरा-भाईंदर महापालिकेत ‘सीसीटीव्ही मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्ष'
मान्सूनपूर्व कामांसाठी केडीएमसी सज्ज
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेचा विषय बनत असते. दरवर्षी पावसाळा तोंडावर आला तरी मान्सूनपूर्व कामे निविदा प्रक्रियेत अडकून पडलेली असतात. यामुळे पर्यायाने मान्सूनपूर्व कामांना पावसाळा सुरु झाल्यावरच मुहूर्त मिळत असतो. यंदा लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या कात्रीत महापालिका क्षेत्रात मान्सूनपूर्व केली जाणारी नालेसफाईची, रस्ते दुरुस्ती, रस्त्यामधील खड्डे भरणे, चरी भरणे आदि कोट्यवधी रुपयांच्या निधीतून केल्या जाणाऱ्या कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण करुन महापालिका प्रशासनाने प्रत्यक्ष कामांना सुरुवात केली आहे. ‘केडीएमसी'च्या इतिहासात पहिल्यांदाच नालेसफाई आणि रस्त्यातील खड्डे भरण्याच्या पहिल्या टप्प्यातील कामांना अखेर मुहूर्त मिळून या कामांना सुरुवात देखील करण्यात आली आहे. त्यामुळे जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापूर्वी नालेसफाई आणि रस्त्या मधील खड्डे भरण्याची २ टप्प्यातील कामे पूर्ण करण्याचा निर्धार कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाने केला आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिकेतील नालेसफाई आणि रस्त्यातील खड्डे या २ गंभीर समस्यांनी कल्याण-डोंबिवलीकरांना अक्षरशः रडकुंडीस आणले आहे. मात्र, यंदा लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवली मधील खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि ना. रवींद्र चव्हाण यांनी शासनाकडून कोट्यावधी रुपयांचा विकास निधी उपलब्ध करुन दिल्यामुळे ‘एमएमआरडीए'च्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रस्ते सिमेंट काँक्रीटीकरणाची कामे केली जात आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासनाकडून रस्त्याची दुरुस्ती निगा, रस्ते बांधणीवर होणाऱ्या खर्चाला शासनाने दिलासा दिला आहे.
यंदा प्रथमच महापालिकेच्या बांधकाम विभागाने पावसाळयात पूर्वी केली जाणारी नालेसफाई तसेच पावस्राापूूर्व आणि पावसाळानंतर रस्त्यातील खड्डे भरणे, रस्ते निगा-दुरुस्तीच्या मान्सूनपूर्व कामांच्या निविदा प्रक्रिया मार्च महिन्यात पूर्ण करण्यात आल्या. ‘केडीएमसी'मधील रस्त्यांच्या कामासाठी तब्बल २८ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. महापालिकेतील १० प्रभागातील रस्त्याच्या कामांसाठी १३ ठेकेदारांना कामाची वर्कऑर्डर देण्यात आल्याने १५ मार्च पासून महापालिकेच्या सर्वच प्रभागांमध्ये रस्त्यामधील खड्डे भरण्याच्या कामांना सुरुवात झाली आहे.
दुसरीकडे महापालिका क्षेत्रात एकूण ९५ कि.मी. रुंदीचे ९७ नाले आहेत. नालेसफाईच्या कामासाठी ३ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. नालेसफाईच्या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन महापालिकेच्या १० प्रभागातील मोठे नाले, लहान नाले तसेच गटार सफाईची कामे करण्यासाठी १० ठेकेदारांची नेमणूक करण्यात आली असून महापालिका क्षेत्रामध्ये नालेसफाईच्या कामांना ५ एप्रिल पासून सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यातील नालेसफाईची कामे ‘मेे'च्या सुरुवातीला पूर्ण होणार असून त्यानंतर दुसऱ्या टप्यातील नालेसफाईची कामे केली जाणार आहेत. एकंदरीतच पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची कामे पूर्ण केली जाणार असल्याची माहिती महापालिका अधिकाऱ्यांनी दिली.