‘भाजप'कडून पूर्वी पक्ष फोडाफोडी, आता घरफोडी

वाशीः देशभरातील सर्व भ्रष्टाचाऱ्यांना सामावून घेऊन भाजप देशातील सर्वात मोठा भ्रष्टाचारी पक्ष ठरला आहे. पूर्वी पक्ष फोडणाऱ्या ‘भाजप'ने आता जनाधार घटल्यामुळे घर फोडायला सुरुवात केली आहे, असा घणाघात बारामती लोकसभा मतदारसंघातील ‘महाविकास आघाडी'च्या उमेदवार खासदार सुप्रिया सुळे यांनी कोपरखैरणे येथे केला.

कोपरखैरणे सेक्टर-२३ मधील भूमिपुत्र मैदानात ‘महाविकास आघाडी'चा मेळावा ७ एप्रिल रोजी सायंकाळी आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला संबोधित करताना ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी'च्या (शरदचंद्र पवार) बारामती लोकसभा मतदारसंघातील उमेदवार खा. सुप्रिया सुळे यांनी भाजपवर सडकून टीका केली.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अशोक चव्हाण यांच्यावर भ्रष्टाचाराची आरोप केले. त्यामुळे अशोक चव्हाण आज भाजपमध्ये आहेत. ‘दिल्ली'चे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावरही झाल्यानंतर ते मात्र जेलमध्ये आहेत. भाजपवाल्यानी कितीही त्रास दिला तरी महाविकास आघाडी लोकसभेची निवडणूक पूर्ण ताकतीने लढणार आहे. ‘भाजप'चा जनाधार घटत चालल्यामुळे त्यांचे नेते सैरभैर झाले आहेत. या निवडणुकीत देशातील जनता भाजपवाल्यांना त्यांची जागा दाखवणार आहे, असा विश्वासही खा. सुप्रिया सुळे यांनी यावेळी व्यक्त केला.

याप्रसंगी ठाणे लोकसभा मतदारसंघातील शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार खासदार राजन विचारे, आमदार जितेंद्र आव्हाड, शशिकांत शिंदे, संग्राम थोपटे, मारुती खुटवड, शिवसेना (उबाठा) नवी मुंबई जिल्हाप्रमुख वि्ील मोरे, द्वारकानाथ भोईर, ‘राष्ट्रवादी'चे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष सी आर पाटील, नवी मुंबई जिल्हा काँग्रेस अध्यक्ष अनिल कौशिक, पूनम पाटील आदी उपस्थित होते.


बारामती मध्ये आले की पवारांना संपवण्याची भाषा
भाजपा विकासाच्या राजकारणापासून सध्या दूर गेला आहे. भाजपचे कोणतेही नेते बारामतीत आले की शरद पवार यांना संपवण्याची भाषा करीत आहेत. पण, शरद पवार यांना संपवणे भाजप नेत्यांना वाटते तितकेसोपे नाही, असा इशाराही यावेळी खा. सुप्रिया सुळे यांनी दिला.

सातारा लोकसभा मतदारसंघात कोणी उभा रहायला तयार आहे का बघा, कोण उभे राहत नसेल तर माझ्यासारखा निष्ठावंत कार्यकर्ता उभा राहील, असे आ. शशिकांत शिंदे यावेळी म्हणाले. आ. शशिकांत शिंदे यांनी खा. सुप्रिया सुळे यांच्या समोरच सातारा लोकसभा मतदारसंघात उभे राहण्याचे संकेत दिले.

आमच्या घरी सर्व सुखाने चालायचे. पण, दादागिरीचा कंटाळा येत असल्याचे या मेळाव्यात जाहीरपणे सांगत तुमच्या आवाजामुळे तुमची बायको जवळ येणार नाही, बहिणीची नक्कल करणारा भाऊ कधी महाराष्ट्राने पाहिला का?,  खा. सुप्रिया सुळे यांनी जर तोंड उघडले तर तुम्हाला तोंड दाखवायला जागा राहणार नाही, जास्त नकला करुन टोमणे मारु नका, असा टोला आमदार जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लगावला. 

 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

 लोकसभा निवडणुकीत महिला शक्ती निर्णायक!