इस्टेट एजंट दुवकलीकडून फ्लॅट मालकाची फसवणूक  

नवी मुंबई : मोठ्या विश्वासाने दिलेला पलॅट दोघा इस्टेट एजंटने परस्पर १८ लाख रुपयांच्या हेवी डिपॉझीटवर देऊन पलॅट मालकाची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे या इस्टेट एजंटस्‌ने भाडोत्री आणि पलॅट मालक या दोघांसोबत वेगवेगळे भाडे करारनामे करुन भाडोत्रीकडून मिळालेली हेवी डिपॉझीटची १८ लाखाची रक्कम हडप केल्याचे उघडकीस आले आहे. खारघर पोलिसांनी या प्रकरणी दोघा इस्टेट एजंटस्‌ सह भाडोत्री विरुध्द फसवणुकीसह बनावटगिरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.  

खारघर मधील ओवे गावात राहणारे मोहसिन अब्दुल हमिद पटेल (५३) यांचा खारघर, सेक्टर-३५ डी मधील साई क्रिस्टल बिल्डींगमध्ये थ्री बीएचके पलॅट आहे. जुलै २०२२ मध्ये पटेल यांनी इस्टेट एजंटचे काम करणारा त्यांचा भाचा जुनैद अब्दुल हमीद पटेल (३३) याला दिड लाख रुपये डिपॉझीट आणि ३५ हजार रुपये भाडे देणारा भाडेकरु शोधण्यास सांगितले होते. त्यानुसार जुनैद याने त्याचा सहकारी इस्टेट एजंट अनुराग श्रीवास्तव याच्या मदतीने अताऊर रहमान मंडल या भाडेकरुला आणले होते. तसेच पटेल यांना डिपॉझिटचे दिड लाख रुपये देऊन त्यांच्याकडून इंग्रजीत असलेल्या भाडे करारनाम्यावर सह्या घेतल्या होत्या.  

त्यानंतर जुनैद प्रत्येक महिन्याला पटेल यांना भाड्याचे ३५ हजार रुपये देत होता. काही महिन्यानंतर पटेल यांना पैशांची गरज भासल्याने त्यांनी आपला पलॅट विकण्यासाठी काढला. याबाबतची माहिती त्यांनी आपल्या पलॅटमध्ये असलेल्या भाडेकरुला दिल्यानंतर त्याने १८ लाख रुपयांच्या हेवी डिपॉझीटवर सदरचा पलॅट घेतल्याचे सांगितले. तसेच त्याने १८ लाख रुपये दिल्यानंतर पलॅट खाली करणार असल्याचे सांगितले. त्यानंतर भाचा जुनैद आणि अनुराग श्रीवास्तव या दोघांनी फसवणूक केल्याचे पटेल यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी जुनैद याच्याकडे चौकशी केली.  

त्यानंतर त्याने भाडोत्रीला १८ लाख रुपये देऊन त्याला बाहेर काढण्याचे आश्वासन देऊन ३ चेक सुध्दा दिले. मात्र, सदरचे चेक वटले नाहीत. त्यानंतर जुनैद याने ३५ हजार रुपये भाडे देणे सुध्दा बंद केले. त्यानंतर भाडोत्री देखील पलॅट रिकामा करत नसल्याने पटले यांनी खारघर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिघांविरोधात तक्रार दाखल केली.

पलॅट मालक आणि भाडोत्री सोबत वेगवेगळे करारनामे करुन फसवणूक...  

या प्रकरणातील आरोपी जुनैद अब्दुल हमीद पटेल आणि अनुराग श्रीवास्तव या इस्टेट एजंटस्‌ने पलॅट मालकासोबत ३५ हजार रुपये भाडे आणि दिड लाख रुपये डिपॉझीटचा करारनामा केला होता. तर भाडोत्री सोबत १८ लाख रुपयांच्या हेवी डिपॉझीटचा करारनामा केला होता. जुनैद भाचा असल्याने त्यांनी विश्वासाने इंग्रजीत असलेल्या करारनाम्यावर सह्या केल्या होत्या. या व्यवहारादरम्यान इस्टेट एजंटने भाडोत्री आणि पलॅट मालक या दोघांना एकमेकांशी संवाद साधू न देता परस्पर व्यवहार करुन फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई