आर्थिक गुन्ह्यांना आळा घालण्याचे प्रयत्न
नवी मुंबईत ‘फायनान्शियल इंटेलिजेंट युनिट'ची स्थापना
नवी मुंबई : आर्थिक गुन्ह्यांंमध्ये दिवसेदिवस होणारी वाढ तसेच त्याचे गुंतागुंतीचे स्वरुप आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात होत असलेले नागरिकांचे आर्थिक नुकसान याचा विचार करुन नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात घडणाऱ्या आर्थिक गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी ‘फायनान्शियल इंटेलिजेंट युनिट'ची स्थापना करण्यात आली आहे. या ‘युनिट'च्या माध्यमातून नवी मुंबईत घडणाऱ्या आर्थिक स्वरुपाच्या गुन्ह्यांची अगोदरच माहिती काढून त्यांना प्रतिबंध करण्यात येणार आहे. त्याचबरोबर समाजामधे याबाबत जनजागृती देखील करण्यात येणार आहे.
नवी मुंबईच्या हद्दीत आर्थिक गुन्ह्यांमध्ये दिवसेदिवस वाढ होत असून या गुन्ह्यांचे स्वरुप गुंतागुंतीचे असल्याचे तसेच त्यामुळे नागरिकांचे मोठया प्रमाणात आर्थिक नुकसान होत असल्याचे आढळून आले आहे. अशा गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या आदेशाने, अपर पोलीस आयुक्त दिपक साकोरे आणि गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखा अंतर्गत ‘फायनान्शियल इंटेलिजेंट युनिट'ची स्थापना करण्यात आली आहे. सदर ‘फायनान्शियल इंटेलिजेंट युनिट' नवी मुंबई पालीस आयुक्तालयाच्या हद्दीत घडणाऱ्या आर्थिक स्वरुपाच्या गुन्ह्यांची अगोदरच माहिती काढून त्यांना प्रतिबंध करणार आहे. त्याचबरोबर समाजामध्ये याबाबत जनजागृती करण्याचे देखील काम करणार आहे.
या ‘युनिट'च्या वतीने २९ डिसेंबर रोजी पनवेल मधील मंथन हॉल येथे आर्थिक गुन्ह्यांमध्ये होणाऱ्या फसवणुकीबाबत पनवेल तालुक्यातील सर्व पोलीस पाटलांकरिता जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात पोलीस निरीक्षक सतिश जाधव, पोलीस निरीक्षक जितेंद्र मिसाळ यांनी पॉन्जी स्किम, मनी सवयर्ुुलेशन, चीट फंड, बँकींग गुन्हे, गृहनिर्माण गुन्हे, जॉब रॅकेटींग अशा वेगवेगळ्या प्रकारच्या आर्थिक गुन्ह्यांविषयी माहिती दिली. तसेच अशा प्रकारच्या आर्थिक स्किममध्ये पैशांची गुंतवणूक करताना कोणकोणत्या प्रकारची खबरदारी घ्यावी, स्किम राबवणाऱ्यांकडे कोणत्या परवानगी असणे आवश्यक आहे. तसेच सदरच्या गुंतवणूक स्किम शासनमान्य असल्याचे शासनाच्या पोर्टलवर तपासूनच त्यामध्ये गुंतवणूक करण्याबाबत माहिती देण्यात आली.
सदर कार्यक्रमास पोलीस पाटील, महिला आणि नागरिक मोठ्या संख्यने उपस्थित होते.
या संदर्भातील फसव्या जाहिरातींना बळी न पडता त्याची सत्यता पडताळावी आणि सावधगिरी बाळगावी. एखाद्या नागरिकाची आर्थिक फसवणूक झाल्यास किंवा अशा फसव्या योजना निदर्शनास आल्यास त्याबाबत ‘नवी मुंबई'च्या आर्थिक गुन्हे शाखेकडे, किंवा जवळच्या पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करावी.
डॉ. विशाल नेहुल, सहाय्यक पोलीस आयुवत-आर्थिक गुन्हे शाखा, नवी मुंबई.