महापे हनुमाननगर भागाला पावसाळयात पुराचा धोका?

वाशी : नवी मुंबई मधील महापे एमआयडीसी भागात हनुमाननगर लगत असलेल्या नैसर्गिक नाल्यावर एका खाजगी कंपनीने बांधकाम  केले आहे. या प्रकरणी नवी मुंबई महापालिका प्रशासनाने एमआयडीसी प्रशासनाला कारवाई करण्याच्या सूचना केल्या आहेत. मात्र, या सूचनांकडे एमआयडीसी प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने यंदाच्या पावसाळ्यात या नाल्यात गाळ अडकला तर हनुमाननगर मध्ये पाणी तुंबण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

महापे एमआयडीसी भागातील हनुमाननगर मधून वाहणाऱ्या नैसर्गिक नाल्यावर एका खाजगी कंपनीद्वारे इमारतीचे बांधकाम करण्यात आले आहे. याबाबत महापालिका कोपरखैरणे विभाग कार्यालयात तक्रारी प्राप्त झाल्यानंतर महापालिका अधिकाऱ्यांनी पाहणी केली. या पाहणीत हनुमाननगर मधील नाल्यावर बांधकाम केल्याचे निदर्शनास आले. सदर नाला महापे हनुमाननगर मधून जाऊन मिलेनियम बिजनेस पार्क,  रिलायन्स  कंपनी मार्गे पुढे ठाणे-बेलापूर मार्गावर निघून कोपरखैरणे खाडीत मिळतो. नवी मुंबई शहरात पावसाळी दिवसात पाणी भरु नये, याकरिता नवी मुंबई महापालिका दरवर्षी  शहरी आणि एमआयडीसी भागातील नालेसफाई करते. मात्र, हनुमाननगर येथील नाल्यावर इमारताचे बांधकाम केल्याने सदर नाला साफ करणे शवय होत नाही. त्यामुळे  या नाल्यात गाळ भरत चालला आहे. हनुमाननगर येथील नाल्यातील गाळ काढता न आल्यास पावसाळ्यात या भागात पाणी भरुन पुरसदृश्य परिस्थिती निर्माण होऊन वित्त तसेच जीवित हानी होण्याची शवयता आहे. त्यामुळे सदर प्रकरणी उचीत कार्यवाही करण्यासाठी नवी मुंबई महापालिकेने एमआयडीसी प्रशासनाला दोन वेळा पत्र दिले आहे. तसेच या प्रकरणी कारवाई करावी, अशी मागणी आमदार रमेश पाटील यांनी राज्य विधीमडळ अधिवेशनात दोन वेळा केली आहे. मात्र, एमआयडीसी प्रशासनाने हनुमाननगर येथील नाल्यावरील इमारत बांधकामावर आजवर कुठलीच कार्यवाही केलेली नाही.

महापे हनुमाननगर मधून वाहणाऱ्या नैसर्गिक नाल्यावर एका खाजगी  कंपनीने बांधकाम केल्याचे नवी मुंबई महापालिकेने केलेल्या पाहणीत निष्पन्न झाले असून, या बांधकामावर कार्यवाही करण्याच्या सूचना महापालिका प्रशासनाने एमआयडीसी प्रशासनाला दिल्या आहेत. मात्र, एमआयडीसी प्रशासनाने हनुमाननगर येथील नाल्यावरील  बांधकामावर कोणतीच कार्यवाही केली नाही.त्यामुळे पावसाळ्यात जर या ठिकाणी पाणी भरुन काही अनुचित प्रकार घडला तर त्यास एमआयडीसी अधिकारी जबाबदार असणार आहेत. - नामदेव डाऊरकर, माजी नगरसेवक - नवी मुंबई महापालिका. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

मोरबे धरणात २९ टक्के पाणी शिल्लक