अनधिकृत बांधकामाविरोधात ज्येष्ठ महिलेचे उपोषणाचे हत्यार

वाशी : नेरुळ परिसरात होणाऱ्या अनधिकृत बांधकामांची तक्रार करुन देखील नवी मुंबई महापालिका अधिकाऱ्यांकडून बेकायदा  बांधकामांना अभय दिले जात आहे. त्यामुळे अनधिकृत बांधकामांच्या विरोधात नेरुळ गावातील ज्येष्ठ महिला सीताबाई म्हात्रे या महापालिका नेरुळ विभाग कार्यालय बाहेर उपोषणाला बसल्या आहेत.

नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामाची दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाने महापालिका प्रशासनाचे कान टोचले आहेत. तर अनधिकृत बांधकामे रोखण्यासाठी महापालिका आयुक्तांनी वेळो-वेळी आदेश काढले आहेत. दुसरीकडे महापालिका क्षेत्राती वाढत्या अनधिकृत बांधकामांना आळा घालण्यासाठी अनधिकृत बांधकामे सुरु असतानाच त्यावर कारवाई करा तसेच बेकायदा बांधकामांना अभय देणाऱ्या अधिकाऱ्यांवर देखील कारवाई करुन गुन्हे दाखल करा, असे आदेश राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच नागपूर मधील हिवाळी राज्य विधीमंडळ अधिवेशन दरम्यान दिले आहेत. मात्र, या सर्व आदेशांना केराची टोपली दाखवत नवी मुंबई शहरात अधिकारी वर्गाच्या संगनमताने राजरोसपणे अनधिकृत बांधकामे सुरु आहेत. बेकायदा बांधकामांविरुध्द काही नागरिक तक्रारी करीत असतात. मात्र, अनधिकृत बांधकामे करण्यात विकासक, राजकीय नेते आणि अधिकारी वर्गाची मोठी साखळी असल्याने तक्रारदारांच्या अर्जांना केराची टोपली दाखवली जाते. नेरुळ विभागात देखील अनधिकृत बांधकामांकडे दुर्लक्ष झाल्याचे समोर आले आहे. नेरुळ भागात अनधिकृत बांधकाम सुरु असून, या बांधकामात अवैधरित्या पाणी नळ जोडणी घेऊन पाण्याचा गैरवापर केला जात असल्याने नेरुळ येथील स्थानिक ज्येष्ठ महिला सीताबाई म्हात्रे यांनी महापालिका नेरुळ विभाग कार्यालयात  तक्रारी केल्या आहेत. मात्र, सदर तक्रारींबाबत वारंवार पाठपुरावा करुन देखील कुठलीच कारवाई केली जात नाही. त्यामुळे नेरुळ गावातील ज्येष्ठ महिला सीताबाई म्हात्रे यांनी नेरुळ विभाग कार्यालय बाहेर आमरण उपोषण आंदोलन सुरु केले आहे. दरम्यान, अनधिकृत बांधकामावरोधात एक ज्येष्ठ महिला उपोषणाला बसल्याने महापालिका मधील कामचुकार अधिकाऱ्यांचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

पत्रकार दिनानिमित्त ठाण्यात रक्तदान शिबिर