गुढीपाडवा दिनी ठाणे शहरात स्वागतयात्रा

ठाणे ः ‘श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यास'तर्फे चैत्र शुध्द प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा या दिवशी नववर्ष स्वागत यात्रा ९ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजता ठाणे शहरात निघणार आहे. यावर्षीही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘स्वागतयात्रा'मध्ये सहभागी होणार आहेत. यावर्षी तरुण उद्योजक अर्जुन देशपांडे स्वागताध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत.
‘गुढीपाडवा'च्या शुभमुहूर्तावर अर्थातच सकाळी ७ वाजता श्री कौपिनेश्वर पालखीचे पारंपारिक प्रथेनुसार वाजत-गाजत प्रस्थान होईल. प्रथम ठाण्यातील श्री सिध्दीविनायकाचे दर्शन घेऊन पालखी आणि इतर पादचारी जांभळी नाका-रंगो बापुजी चौक या मार्गाने दगडी शाळेकडे निघतील. यावेळी तलावपाळीवर उभे असलेले चित्ररथ आपआपल्या क्रमानुसार पालखीबरोबर येऊन पालखीचे रुपांतर भव्य अशा ‘स्वागतयात्रा'मध्ये होईल. स्वागतयात्रा पुढे आराधना सिनेमा, हरी निवास चौक, गोखले रोड पर्यंत आल्यावर पुढे राममारुती मार्ग, पु. ना. गाडगीळ चौक, तलाव पाळीमार्गे पुन्हा श्री कौपिनेश्वर मंदिरात येईल.
मंदिरात आरती आणि प्रसाद वाटप झाल्यानंतर कार्यक्रमाची सांगता होईल. या निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमही आयोजित करण्यात आले आहेत. तसेच भव्य रांगोळी देखील साकारण्यात येणार आहे. ७ ते ९ एप्रिल या कालावधीत रांगोळी प्रदर्शन गांवदेवी मैदान, याच कालावधीत फोटो सर्कल आयोजित प्रदर्शन कौपिनेश्वर प्रांगण येथे, तर ७ एप्रिल रोजी सायं. ५.३० ते ८ पर्यंत कौपिनेश्वर प्रांगण येथे नृत्यधारा, सायं.८.३० ते १० पर्यंत दशावतार नाटक होईल. ८ एप्रिल रोजी सायं. ६ ते ७ या वेळेत कौपिनेश्वर प्रांगण येथे महिला पौरौहित्य वर्गाचे रुद्रपठण, याच दिवशी तलावपाळी येथे मासुंदा तलाव येथे सायं. ७.३० ते ८.१५ पर्यंत दिपोत्सव, सायं. ८.३० ते ९ दरम्यान कौपिनेश्वर प्रांगण येथे नांदी, तसेच रात्री ९.१० पासून कौपिनेश्वर प्रांगण येथे शिवराज्याभिषेक नृत्य नाटिका-सादर करण्यात येणार आहे.
५ एप्रिल रोजी महापालिका शाळा क्र.१९, विष्णूनगर येथे सकाळी १० ते २ आणि दुपारी ४ ते ८ या वेळेत रांगोळी स्पर्धा असून रांगोळी प्रदर्शन पुढील पाच दिवस खुले राहील. तसेच यंदा रामायण या विषयावर आधारित रांगोळ्या पहायला मिळतील. ‘श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यास'तर्फे आयोजित ‘गुढीपाडवा नववर्ष स्वागतयात्रा'मध्ये यंदा प्रबोधन करणारे सायकलस्वार, मल्लखांब आणि जिम्नॅस्टिक प्रात्यक्षिके, ड्रम-झेंबे वादन, एरियल कसरती, महिला बाईक रॅली, प्रबोधन करणारे चित्ररथ याधून समर्थ भारत, श्रेष्ठ भारताचे दर्शन घडणार आहे. राज्याभिषेक समारंभ संस्थेतर्फे ३५० वा राज्याभिषेक दिनानिमित्ताने राज्याभिषेक दिन महत्व चित्ररथ, सन्मान स्त्रीशक्तीचा, जागर नारीशक्तीचा, आदि विषय घेऊन महिला बाईक रॅली सहभागी होणार आहेत.
‘स्वागतयात्रा'मध्ये ‘आम्ही सायकल प्रेमी संस्था'चे सायकलस्वार पारंपारिक वेशभूषेत सहभागी होणार आहेत. तसेच ‘स्वागतयात्रा'मध्ये पारंपारिक वेश करुन १०० पेक्षा अधिक महिलांची बाईक रॅली निघणार आहे. सुमारे ६० हुन अधिक चित्ररथ सहभागी होणार असून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, पर्यावरण, ठाणे महापालिका तर्फे घनकचरा व्यवस्थापन, पाणी पुरवठा विभाग, प्रदुषण नियंत्रण कक्ष यांचा विशेष सहभाग असेल. प्लास्टिक बंदी, अवयवदानावर जनजागृती, मतदान जागृती असे विषय अनेक संस्थांनी ‘नववर्ष स्वागतयात्रा'साठी घेतला आहे. भगिनी निवेदिता उत्कर्ष मंडळ शिवाजी महाराज या विषयावर सादरीकरण करतील. या वर्षी प्रथमच अनाहत म्युझिक संस्था तसेच इंडियन इन्स्टिट्युट ऑफ इंटेरिअर डिझाईन आणिआर्कटिेक्ट यांचा सहभाग होणार आहे. यासारखे नाविन्यपूर्ण विषय हाताळणी करणारे चित्ररथ आकर्षण ठरणार आहेत. यावर्षी ‘स्वागतयात्रा'चे नियोजन करण्यासाठी १०० हून अधिक महाविद्यालयीन विद्यार्थी स्वयंसेवक म्हणून उपस्थित राहतील. पारंपारिक वेशभूषा, चित्ररथ स्पर्धा, रिल स्पर्धा ‘श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यास'तर्फे आयोजित करण्यात आली आहे.
‘स्वागतयात्रा' निमित्त आयोजित पत्रकार परिषद प्रसंगी स्वागताध्यक्ष देशपांडे, ‘कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यास'चे अध्यक्ष विद्याधर वालावलकर, अरविंद जोशी, कार्यकारणी अध्यक्ष उत्तम जोशी, विश्वस्त संजीव ब्रह्मे, डॉ. अश्विनी बापट, निमंत्रक तनय दांडेकर, सह-निमंत्रक विनित आश्रित, निखिल सुळे, कुमार जयवंत आदि उपस्थित होते. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नाल्यात निळे पाणी सोडणाऱ्या कारखान्यांवर कारवाई