मिरा-भाईंदर महापालिकेत ‘सीसीटीव्ही मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्ष'
खारघर, तळोजा वसाहतीत धुळवड जोरात
खारघर : खारघर आणि तळोजावासियांनी मुक्तपणे धुळवड साजरी केली. बहुतांश सोसायटीत लावण्यात आलेल्या स्पीकरवरील गाण्यांच्या तालावर तरुणाई थिरकत असल्याचे दृश्य अनेक ठिकाणी पहायला मिळाले. विशेष म्हणजे खारघर, सेक्टर ११ मधील नाना-नानी पार्क मध्ये राजस्थान नागरिकांचा होळीत घेर उत्सव साजरा करीत असताना फेर धरुन खेळला जाणारा लाठीकाठी खेळ पाण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. तर बच्चे कंपनी सकाळ पासून धूळवडीत रंगून गेले होते.
होळी रे होळी पुरणाची पोळी! असे म्हणत खारघर आणि तळोजा वसाहतीत सगळीकडे होळीचा सण उत्साहात साजरा झाला. गाव, वसाहतीत उत्साहाच्या वातावरणात होळी पेटविण्यात आली. खारघर गावात माजी नगरसेवक प्रवीण पाटील यांच्या माध्यमातून पारंपरिक होळी साजरी करण्यात आली. या होळीत गाव आणि वसाहत मधील नागरिक मोठया प्रमाणात सहभागी झाले होते. तर रंगपंचमीच्या दिवशी ‘बुरा ना मानो होली!' असे म्हणत एकमेकांना रंग लावत धुळवड उत्साहाने साजरी केली जाते.
बहुतांश सोसायटीत स्पीकर आणि डॉल्बीच्या तालावर मुले, महिला मनसोक्त होळी खेळताना दिसून आल्या. काही सोसायट्यांनी लहान मुलांसाठी पाण्याचे नळ मोकळे सोडले होते. खारघर, सेक्टर-५ मधील खारघरचा राजा सांस्कृतिक मैदानात गुजराती, मारवाडी समाजातील महिला, मुली आणि लहान मुलांनी गाण्याचा तालावर खेळण्यात दंग झाले होते.
तर सेक्टर-११ मधील नाना पार्क मध्ये राजस्थानी नागरिक गाण्याचा फेर धरत गाण्याचा तालावर लाठी काठी खेळ खेळून होळीचा आनंद घेतला. रंगपंचमी दिनी सोमवार असल्यामुळे मटण दुकानाकडे ग्राहकांनी पाठ फिरवली होती. खारघर परिसरात नवरंग, बँक ऑफ इंडिया, शिल्प चौक, डेली बझार आदि चौकात रस्त्या रस्त्यावर रंग विक्रेते बसले होते. मात्र, ग्राहकांनी पाठ फिरवल्याने खरेदी केलेला खर्च वसूल झाला नसल्याचे सांगितले. विशेष म्हणजे फुगे मारल्यामुळे डोळ्यांना इजा होण्याचेही प्रकार घडतात. त्यामुळे रंगाने भरलेले फुगे मारु नये, या विषयी जनजागृती करुनही रस्ते आणि सोसायटीच्या आवारात फुग्याचे ढीग पसरले होते. सुरक्षेचा उपाय म्हणून खारघर पोलिसांनी विविध ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.
बंजारा समाजाचे वर्तुळाकर नृत्य...
होळी सण बंजारा समाजासाठी महत्वाचा सण आहे. खारघर आणि तळोजा फेज-२ वसाहत आणि सीबीडी, सेक्टर-८ मधील बंजारा समाज बांधव एकत्र आले होते. यावेळी त्यांनी लेंगी गीतांवर स्त्री-पुरुष गोलाकार डफ वाजवत वर्तुळात नाचत होळी साजरी केली.
बंजारा समाजाच्या लोककला रुढी आणि परंपरा प्रवाहीत राहण्यासाठी होळी सण मोठ्या उत्साहात आपली संस्कृती जपत अगदी पारंपरिक रंगांरग पद्धतीने साजरा करतात. खारघर वसाहत निर्माण झाल्यापासून नवी मुंबई, पनवेल परिसरातील बंजारा बांधव खारघर मधील होळी उत्सव साजरा करीत असल्याचे ‘श्री संत सेवालाल महाराज सामाजिक ट्रस्ट उन्नती मंडळ'चे अध्यक्ष छगन राठोड यांनी सांगितले.
होळी मिलन रंगपंचमी उत्साहात...
‘खारघर कॉलनी फोरम'चे मुख्य समन्वयक मधू पाटील आणि फोरमच्या अध्यक्षा लीना गरड यांच्या वतीने खारघर, सेक्टर-२१ मधील आचार्य अत्रे उद्यानात आयोजित करण्यात आलेल्या होलिकोत्सव मिलन रंगपंचमी उत्साहात खारघर मधील महिला, मुले आणि पुरुष मंडळी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. वाढते उन्ह आणि उद्यानात गारवा असावा यासाठी टँकरने पाणी उपलब्ध करुन देण्यात आले होते. अंगावर टँकरचे पाणी ढोलताशा आणि होळी आयीरे अशा अनेक गाण्यावर बेधुंद नृत्याच्या उत्साहात तरुणाई तल्लीन झाली होती.
कामगारांची होळी...
होळी, धुलवड खेळताना दुकानातील साहित्य, वस्तुंची नासधूस होवू नये म्हणून खारघर मधील दुकाने बंद ठेवल्यामुळे दुकानात काम करणाऱ्या तरुण कामगारांनी एकत्र येवून धुळवड खेळून होळी साजरी केली. काही जण धुळवडची आठवण म्हणून सेल्फी काढताना दिसून आले. तसेच दिवसभर काबाड कष्ट करणाऱ्या आंध ्प्रदेश, खान्देश आणि विदर्भातील कामगार महिला कामाचा व्याप बाजुला ठेऊन नुत्य सादर करताना दिसून आले.
तळोजा वसाहतीत कोरडी होळी...
तळोजा वसाहतीत कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्यामुळे परिसरात नागरिकांनी कोरडी होळी साजरी केली. विशेष म्हणजे गेल्या अनेक महिन्यापासून अनेक सोसायटीत कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे.