बेलापूर ब्रिजखालील ४८ अनधिकृत झोपड्या निष्कासित
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका अतिक्रमण विभाग तर्फे बेलापूर ब्रिजखाली उभारण्यात आलेल्या ४८ अनधिकृत झोपड्या जमीनदोस्त करण्याची कारवाई २७ मे रोजी करण्यात आली. यापूर्वी महापालिका अतिक्रमण विभाग तर्फे पंचशिल नगर, शाहबाज टेकडी, बेलापूर येथील १४५ बेकायदेशीर झोपड्या निष्कासित करण्याची कारवाई २४ मे रोजी करण्यात आली होती.
नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रातील अे विभाग बेलापूर कार्यालय अंतर्गत बेलापूर ब्रिजखाली अनधिकृतपणे झोपड्यांची उभारणी करण्यात आली होती. या बेकायदेशीर झोपड्यांची दखल घेऊन महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार आणि उप आयुक्त (अतिक्रमण) डॉ.राहुल गेठे यांच्या मार्गदर्शनानुसार बेलापूर विभाग अधिकारी शशिकांत तांडेल यांच्या नियंत्रणाखाली बेलापूर ब्रिजखाली उभारण्यात आलेल्या ४८ अनधिकृत झोपड्या अे विभाग बेलापूर कार्यालयामार्फत तोडक मोहिमेचे आयोजन करुन निष्कासित करण्यात आल्या आहेत. या धडक कारवाईवेळी बेलापूर अे विभाग कार्यालय मधील कनिष्ठ अभियंता मयुरेश पवार, वरिष्ठ लिपिक स्वप्निल तारमळे, लिपिक नयन भोईर यांच्यासह अतिक्रमण विभागाकडील पोलीस उपस्थित होते. या कारवाईकरिता १० मजूर, १ जेसीबी, १ पिकअप व्हॅन यांचा वापर करण्यात आला.
दरम्यान, महापालिका कार्यक्षेत्रात उभारण्यात आलेल्या अनधिकृत झोपड्या, बेकायदा बांधकामे निष्कासित करण्याची कारवाई यापुढे अधिक तीव्र करण्यात येणार आहे, असे महापालिका उप आयुक्त (अतिक्रमण) डॉ. राहुल गेठे यांनी सांगितले.