वाशी प्लाझा बस स्थानकाला खाजगी प्रवासी वाहनांचा गराडा

वाशी : सायन-पनवेल महामार्गावरील वाशी येथील वाशी प्लाझा बस स्थानकाला खाजगी प्रवासी वाहने गराडा घालत असल्याचे चित्र दररोज रात्री दिसत आहे. त्यामुळे वाशी प्लाझा बस स्थानक ठिकाणी सार्वजनिक बस मध्ये चढ-उतार करणाऱ्या बस प्रवाशांना अर्ध्या रस्त्यात येऊन बस पकडावी लागत आहे. या प्रकारामुळे वाशी प्लाझा बस स्थानक ठिकाणी प्रवाशांचा अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

नवी मुंबई शहरातून सायन-पनवेल महामार्ग जातो. सायन-पनवेल महामार्ग पुढे पुणे, बंगलोर पर्यंत जातो. त्यामुळे सायन-पनवेल मार्गावर रोज लाखो प्रवासी प्रवास करीत असतात. मात्र, याच मार्गातील वाशी प्लाझा बस स्थानकाला काही खाजगी प्रवासी वाहन चालक गराडा घालून बसले आहेत. खाजगी वाहन चालक त्यांची वाहने चक्क बस थांब्यावर थांबवून प्रवासी शोधत असतात, असे चित्र नेहमीच दिसते. मात्र, खाजगी वाहन चालकांच्या या कृत्याने थांबलेल्या खाजगी बस मागून येणाऱ्या लांब पल्ल्याच्या राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बस आणि खाजगी ट्रॅव्हल्स बसेसना बस उभी करण्यासाठी जागा मिळत नाही. त्यामुळे एसटी बस आणि खाजगी ट्रॅव्हल्स बस अर्ध्या रस्त्यात उभ्या राहतात. या बस मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अर्ध्या रस्त्यातच चढ-उतार करावा लागत आहे. वाशी प्लाझा बस स्थानकासमोर एसटी बस आणि खाजगी ट्रॅव्हल्स बस अर्ध्या रस्त्यात उभ्या राहत असल्याने या बस स्थानकावरील प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत असून, या ठिकाणी अपघात होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येतआहे. त्यामुळे वाशी प्लाझा बस स्थानकासमोर उभ्या राहणाऱ्या खाजगी वाहन चालकांवर कारवाई करुन वाशी प्लाझा बस स्थानक मोकळे करावे, अशी मागणी या स्थानकावर बस पकडण्यासाठी येणाऱ्या प्रवााशांकडून जोर धरु लागली आहे.

वाहतुक पोलिसांचे दुर्लक्ष?
वाशी प्लाझा बस स्थानक लगत असलेल्या वाशी उड्डाणपुलाखाली वाशी वाहतुक नियंत्रण शाखा कक्ष आहे. या ठिकाणी वाशी परिसरातून टोविंग केलेली वाहने ठेवली जातात. त्यामुळे या ठिकाणी नेहमीच वाहतुक पोलीस कार्यरत असतात. मात्र, वाहतुक पोलीस कार्यरत असून देखील वाशी प्लाझा बस स्थानकावरील खाजगी प्रवासी वाहनांकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने दिवसेंदिवस वाशी प्लाझा बस स्थानकावरील खाजगी प्रवासी  वाहनांची संख्या वाढतच चालली आहे.

वाशी प्लाझा बस स्थानकावर नेहमीच खाजगी वाहन चालक गर्दी करुन असतात. मात्र, त्यांच्या या प्रकाराने एसटी बस सायन-पनवेल महामार्गावर अर्ध्या रस्त्यात उभ्या असतात. त्यामुळे अर्ध्या रस्त्यात उभ्या राहणाऱ्या एसटी बस आणि खाजगी ट्रॅव्हल्स बस मध्ये चढताना विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना अधिक त्रास होतो. वाशी वाहतुक पोलिसांनी वाशी प्लाझा बस स्थानकावर प्रवाशी घेण्यासाठी उभ्या राहणाऱ्या खाजगी वाहनांना अटकाव केला तर सर्वसामान्य प्रवाशांना वाशी प्लाझा बस स्थानकावर बस पकडताना अडचण येणार नाही. - हृतिक मुरूडकर, प्रवाशी -वाशी नवी मुंबई. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

अखेर तुर्भे येथील उद्यानामध्ये महापालिकेने बसवली खेळणी