‘महावितरण'च्या सब-स्टेशन मध्ये बेकायदेशीर संसार

 

पनवेल : कामोठे, कळंबोली आणि खांदा कॉलनी येथील ‘महावितरण'च्या सब-स्टेशनमध्ये ‘कोणीही या आणि संसार थाटा' अशी परिस्थिती आहे.

‘महावितरण'च्या कंत्राटदारावर मेहरबान होऊन आऊट सोर्सिंगमध्ये काम करणाऱ्या कामगारांनी  अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने सबस्टेशन मध्ये घरच थाटले असून चक्क स्टोव्ह गॅस शेगडीचा वापर केला जात आहे. त्यामुळे या ज्वलनशील पदार्थामुळे स्फोट झाल्यास ट्रान्सफॉर्मरला धोका निर्माण होऊन मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्त हानी होण्याची भिती व्यवत केली जात आहे.

‘महावितरण'कडे कोणत्याही प्रकारची नोंद नसलेल्या कामगारांची कोणतीही इएसआय, ओळखपत्र ,कामगार कायदे नियमाप्रमाणे तसेच ‘महावितरण'च्या नियमांना बगल देत कंत्राटदारावर मेहरबान होऊन या ठिकाणी पूर्ण वेळ वास्तव्य दिले आहे. त्यामुळे याठिकाणी अपघाताची घटना घडल्यास ‘महावितरण'च्या संबंधित अधिकाऱ्यांसह कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी नागरिकाकांडून केली जात आहे.

कामोठे, कळंबोली आणि खांदा कॉलनी येथील लोकसंख्येच्या तुलनेत लाखांपेक्षा जास्त ‘महावितरण'चे वीज ग्राहक आहेत. कामोठे, कळंबोली आणि खांदा कॉलनीसाठी स्वतंत्र सबस्टेशन उभारण्यात आले आहे. कामोठे वसाहतीमध्ये ‘महावितरण'च्या मुख्य कार्यालयाच्या माध्यमातून वसाहतींना विद्युत पुरवठा केला जातो. विद्युत पुरवठा करण्यासाठी काही सेक्टर मध्ये ट्रान्सफॉर्मर उभारले गेले आहेत. कामोठे येथील सब-स्टेशन मध्ये सहाय्यक अभियंता यांचेही कार्यालय आहे.

कामोठे, सेक्टर-९ मधील प्लॉट क्र.४०च्या बाजुला असलेल्या या सब-स्टेशनमध्ये कंत्राटदाराचे खाजगी कामगार वास्तव्यास असल्याचे उघड झाले असून ‘महावितरण'च्या नियमानुसार या परिसरात कर्मचारी यांच्या व्यतिरिक्त इतर कोणालाही प्रवेश मनाई आहे. ओउटसर्सिंग म्हणजे कॉन्ट्रॅक्ट पध्दतीमध्ये काम करणाऱ्यांनी या सब-स्टेशनच्या बाजुला आपला संसार थाटला आहे. त्याच्या बाजुलाच सुमारे १० श्ऊ चा ट्रान्सफॉर्मर असूनही तेथे स्टोव्ह, शेगडी पेटविली जात आहे.

कंत्राटदाराचे खाजगी कामगार ‘महावितरण'ची मोफत वीज, पाणी यासह अनेक सेवा घेत आहेत. खांदा कॉलनी, सेक्टर-१ प्लॉट क्र.९च्या बाजुला तोच प्रकार असल्याचे दिसून येत आहे. त्याचबरोबर कळंबोली गुरुद्वाराच्या पुढेअसलेल्या सब-स्टेशनमध्येही काहींनी आपला संसार थाटला आहे. या सर्व बाबींमुळे ट्रान्सफॉर्मरच गॅसवर असल्याचे दिसून येत आहे. सदर ठिकाणी ज्वलनशील पदार्थ गॅस, स्टोव्ह  वापरले जात असल्याने या कामगारांना तातडीने तेथून हटवावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 दिवा, मुंब्रा, कळवा, माजिवडा-मानपाडा मधील अनधिकृत बांधकामांवर कारवाई