महाराष्ट्र सरकारने नवीन फौजदारी कायदे तातडीने लागू करावेत -गृहमंत्री अमित शाह
‘हास्य दिन'च्या कार्यक्रमात स्वच्छतेचा जागर
नवी मुंबई : ‘स्वच्छ सर्वेक्षण-२०२४' अंतर्गत नवी मुंबई महापालिकेच्या वतीने आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबविले जात असून या माध्यमातून लोकांच्या मनात स्वच्छता संदेश रुजविला जात आहे. याकरिता वैशिष्ट्यपूर्ण दिवशी स्वच्छताविषयक नानविध उपक्रम राबविले जात आहे.
असाच एक अभिनव उपक्रम ‘जागतिक हास्य दिन'चे औचित्य साधून नवी मुंबई महापालिका आणि सुर्योदय स्मॉल फायनान्स बँक यांच्या संयुक्त विद्यमाने नेरुळ, सेक्टर-२६ येथील ज्वेल ऑफ नवी मुंबई या शहरातील आकर्षणस्थळी अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राबविण्यात आला. याप्रसंगी ‘स्वच्छ नवी मुंबई मिशन'चा युथ आयकॉन विक्रमवीर सागरी जलतरणपटू शुभम वनमाळी, समाजविकास विभागाचे सहा. आयुक्त किसनराव पलांडे, बेलापूर विभागाचे सहा. आयुक्त तथा विभाग अधिकारी शशिकांत तांडेल, पोलीस उपनिरीक्षक विशाल माने तसेच महापालिकेचे स्वच्छता अधिकारी, स्वच्छता निरीक्षक आणि बँकेचे मार्केटिंग टीम प्रतिनिधी शुभम जाधव, अधिकारी-कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपले नवी मुंबई शहर स्वच्छतेत अग्रणी असून स्वच्छता नियमित करण्याची गोष्ट असल्याने प्रत्येक नागरिकाने आपल्या घरातील ओला आणि सुका कचरा दररोज न चुकता घरातूनच वर्गीकरण करुन कचरा गाड्यांमध्येही वेगवेगळा देण्याची काळजी घ्यावी. यामध्ये खंड पडू देऊ नये, असे आवाहन यावेळी अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांनी केले. त्याचप्रमाणे प्लास्टिकचे पर्यावरणावर आणि मानवी जीवनावर होणारे दुष्परिणाम पाहता प्लास्टिक पिशव्या वापरास नागरिकांनी नकार द्यावा आणि कापडी पिशव्यांचा वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी सुनिल पवार आणि इतर मान्यवरांच्या शुभहस्ते उपस्थितांना कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले.
स्वच्छतेचा युथ आयकॉन जलतरणपटू शुभम वनमाळी यांनीही याप्रसंगी घरातील आणि परिसरातील स्वच्छतेचे महत्व सांगत यादृष्टीने एक नागरिक म्हणून आपली जबाबदारी मोठी असल्याचे सांगितले.
यावेळी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा' या मालिकेतील लोकप्रिय कलावंत कुणाल मेश्राम यांनी उपस्थितांशी एकपात्री संवाद साधत स्वच्छतेचे दैनंदिन जीवनातील महत्व हसत खेळत पटवून दिले. महिमा ग्रुपच्या सदस्यांनीही सादरीकरण करुन उपस्थितांना हसविले. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित नागरिकांनी ‘माझी वसुंधरा अभियान'ची सामुहिक शपथ ग्रहण केली.
याप्रसंगी घरापासूनच कचरा वर्गीकरण केला पाहिजे असा संदेश ओलू, सुकू आणि घातकू या अनुक्रमे ओला, सुका आणि घरगुती घातक कचरा यांच्या प्रतिकरुपातील ‘मॅस्कॉट'मार्फत अभिनव पध्दतीने पटवून देण्यात आला. या ३ मॅस्कॉट प्रमाणेच सफाईमित्र आणि टॉयलेट वापरा असा संदेश देणाऱ्या एकूण ५ ‘मॅस्कॉट'सोबत अनेकांनी सेल्फी काढण्याचा आनंद घेतला. दरम्यान, ‘जागतिक हास्य दिन'च्या कार्यक्रमाला स्वच्छतेची जोड दिल्याने नियमित स्वच्छता राहिली तर प्रत्येकाच्या चेहऱ्यावर कायम आरोग्यपूर्ण हास्य विलसत राहील, असा संदेश या कार्यक्रमाने दिला.