म्हाडा निर्णयाच्या धर्तीवर सिडकोनेही घरांच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घ्यावा
१.९० कोटींचे सोने घेऊन मुंबईतील ज्वेलर्स फरार
नवी मुंबई : सोन्याचे दागिने बनवून देणाऱ्या मुंबईतील झवेरी बाजारातील ज्वेलर्स मालकाने पनवेल मधील दोन ज्वेलर्स शॉप चालकांनी दागिने बनविण्यासाठी दिलेले तब्बल १.९० कोटी रुपये किंमतीचे ३.८० किलो वजनाचे शुध्द सोने घेऊन पलायन केल्याची घटना उघडकीस आली आहे. रंजितसिंग भवरसिंग सिसोदिया असे या ज्वेलर्स व्यावसायिकाचे नाव असून कामोठे पोलिसांनी त्याच्या विरोधात फसवणुकीसह अपहाराचा गुन्हा दाखल केला आहे.
सदर प्रकरणातील तक्रारदार बाबा कोळेकर (३१) कामोठे भागात राहण्यास असून त्यांचे कामोठे भागात जय माताची गोल्ड शॉप नावाचे ज्वेलर्स शॉप आहे. ऑक्टोबर महिन्यात कोळेकर यांच्याकडे कर्नाटक बेळगाव येथील ग्राहकाने सोन्याचे दागिने बनवण्यासाठी १.८० किलो वजनाची शुध्द सोन्याची लगड दिली होती. त्यामुळे कोळेकर यांनी मुंबईतील झवेरी बाजार येथील कोमल ज्वेलर्सचा मालक रंजित सिसोदिया याला बनवून देण्याची ऑर्डर दिली होती. त्यानुसार रंजित सिसोदिया आणि त्याचा कामगार भरवसिंग या दोघांनी कोळेकर यांच्या कामोठे येथील ज्वेलर्स शॉप मध्ये जाऊन त्यांच्याकडून १.८० किलो वजनाची शुध्द सोन्याची लगड सोबत नेली होती.
त्यानंतर सायंकाळी ५ वाजता रंजित सिसोदिया याच्या सोबत काम करणाऱ्या भवरसिंग याने कोळेकर यांना संपर्क साधून रंजित सिसोदिया यांच्या कोमल ज्वेलर्स या शॉपवर दिल्ली येथील डीआरआयचा (महसूल गुप्तचर संचालनालय) छापा पडल्याचे आणि त्यांच्या पथकाने सर्व दागिने जप्त केल्याचे सांगितले. त्यामुळे रंजित सिसोदिया याला फोन न करण्याबाबत कोळेकर यांना सूचित केले. त्यावेळी कोळेकर यांनी त्याच्याकडे असलेले ओरिजनल बिल घेऊन येत असल्याचे सांगितल्यानंतर त्याने उडवा-उडवीची उत्तरे दिली. त्यानंतर रंजित सिसोदिया याचा फोन बंद येत असल्याने कोळेकर यांनी झवेरी बाजार येथील त्याच्या शॉपवर धाव घेतली असता, त्याने शॉप बंद करुन पलायन केल्याचे निदर्शनास आले.
त्यामुळे कोळेकर यांनी आजुबाजुच्या व्यापाऱ्यांकडे चौकशी केली असता, रंजित सिसोदिया याच्या कोमल ज्वेलर्स शॉप वर कोणताही छापा पडला नसल्याचे त्यांना समजले. तसेच रंजित सिसोदिया याने पनवेल मधील करंजाडे येथील सचिन वाघमोडे यांच्याकडून देखील दागिने बनविण्यासाठी घेतलेले ५०० ग्रॅम वजनाचे सोने घेऊन पलायन केल्याचे समजले. अशा पध्दतीने रंजित सिसोदिया याने दागिने बनवून देण्याच्या बहाण्याने तब्बल १.९० कोटी रुपये किंमतीचे ३.८० किलो वजनाची शुध्द सोन्याची लगड घेऊन फसवणूक केल्याने कोळेकर यांनी कामोठे पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.