पाण्याच्या टाकीचे बांधकाम सुरु असलेल्या स्लॅबवरुन पडुन कामगाराचा मृत्यू,  

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या वाशी सेक्टर-5 मधील पाण्याच्या टाकीच्या बांधकामाच्या ठिकाणी काम करणाऱया अरसद हसिबुद्दीन आलम (31) या कामगाराचा चौथ्या मजल्यावरील स्लॅब खालील लोखंडी सेंट्रींगचे सामान काढताना खाली पडून त्याचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. सदर बांधकामाच्या ठिकाणी कामगारांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या उपायोजना न केल्याने सदरची घटना घडल्याचे आढळुन आले आहे. त्यामुळे वाशी पोलिसांनी सेफ्टी ऑफिसर व सब कॉन्ट्रक्टर या दोघांविरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला आहे.  

या घटनेतील मृत अरसद हसिबुद्दीन आलम हा वाशी सेक्टर-5 मध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या नवीन पाण्याच्या टाकीच्या बांधकामाच्या ठिकाणी लेबर म्हणून काम करत होता. मुळचा बिहार राज्यातला अरसद आलम हा सदर बांधकामाच्या ठिकाणी आपल्या इतर सहकाऱ्यासह राहत होता. गत 14 एप्रिल रोजी दुपारी अरसद व त्याचे इतर सहकारी चौथ्या मजल्यावरील स्लॅब झाल्यानंतर स्लॅब खालील लोखंडी सेंट्रींगचे सामान काढत होते. यावेळी अरसद हा तेथील बिमवर लोखंडी फ्लेट आडवी लावून त्यावर उभा राहुन सेंट्रींगचे सामान खाली उतरवत होता. त्यावेळी लोखंडी फ्लेट सरकुन अचानक खाली कोसळल्याने त्यावर उभा असलेला अरसद आलम हा देखील खाली पडून गंभीर जखमी झाला होता.  

त्यामुळे त्याला वाशीतील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्याच्यावर उपचार सुरु असताना पाचव्या दिवशी गुरुवारी रात्री अरसद याचा मृत्यू झाला. अरसद याच्या मृत्यूनंतर वाशी पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात स्वास्तीक कन्स्ट्रक्शन या कंपनीच्या सेफ्टी ऑफिसर व सब कॉन्ट्रॅक्टर यांनी कामाच्या ठिकाणी कामगारांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या उपायोजना न करता, कामगारांकडुन काम करुन घेतल्याने सदरची घटना घडल्याचे आढळुन आले आहे. त्यामुळे वाशी पोलिसांनी अरसद याच्या मृत्यूला सेफ्टी ऑफिसर शंकर गणेशन व सबकॉन्ट्रक्टर शंकर साहु या दोघांना जबाबदार धरुन त्यांच्या विरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला आहे.  

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

पामबीच मार्गावर भीषण अपघात