‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा' उपक्रमाचा शुभारंभ

नवी मुंबई : वर्धन म्हणजे वाढणे आणि संवर्धन म्हणजे विकास. या दोन वेगवेगळया गोष्टी असून आपण भाषेचे नाही तर भाषा आपले संवर्धन करत असल्याचे स्पष्ट करीत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा म्हणजे भाषेचा रियाज असल्याचे मत साहित्यिक, व्याख्याते प्रा. प्रवीण दवणे यांनी व्यक्त केले. नवी मुंबई शहर स्वच्छ आहेच; त्यासोबतच मनाची स्वच्छता राखण्यासाठी विविध उपक्रमांच्या माध्यमातून मराठी भाषेचा, साहित्याचा व्यापक प्रसार करण्यातही आघाडीवर असल्याबद्दल प्रा. दवणे यांनी आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या भाषाप्रेमाची प्रशंसा केली.

महाराष्ट्र शासनाच्या वतीने १४ ते २८ जानेवारी २०२४ या कालावधीत संपूर्ण राज्यभरात ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा' साजरा केला जात असून यानिमित्त नवी मुंबई महापालिकेच्या वतीनेही या पंधरवड्यत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. या पंधरवड्याचा शुभारंभ प्रा. प्रवीण दवणे यांच्या व्याख्यानाने झाला. या प्रसंगी आयुक्त राजेश नार्वेकर, अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, शहर अभियंता संजय देसाई व्यासपीठावर उपस्थित होते.

जीवनाला प्रवाही ठेवते ती भाषा, त्यामुळे सर्वांना सामावून घेणाऱ्या मराठी भाषेची आधुनिक काळात बदलती संरचना स्विकारली पाहिजे आणि मराठीकडे ती ताकद आहे असे सांगत प्रा. प्रवीण दवणे यांनी मातृभाषेकडे आता आसूसून पाहायला हवे. नाहीतर आपण अनमोल ठेवा गमावून बसू, अशी भिती व्यवत केली.

आयुष्यात महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार, तकतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, बा. भ. बोरकर, कुसुमाग्रज, इंदिरा संत, पु.ल. देशपांडे, पु. भा. भावे अशा नामवंत साहित्यिकांच्या अनुभवांचा खजिना खुला करीत प्रा. दवणे यांनी अनेक व्यासंगाचे वटवृक्ष आयुष्यात आले म्हणून मी समृदध होऊ शकलो, असे सांगितले.  

मराठी शाळा बंद पडणे म्हणजे संस्कृतीचा लचका तोडणे असून आज दोन पिढ्यांमधील तणाव वाढताना दिसतोय. घराघरांतील संवादाचे मातृभाषा हे माध्यमच हरवत चाललेय, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

संवर्धनातील सं हा संगोपनाचा असून संवेदनांचे सपाटीकरण होत असल्याच्या परिस्थितीत आपण आयुष्याचे उत्सव हरवून बसलोय, अशीही वास्तव स्थिती त्यांनी मांडली. त्याचप्रमाणे कोणत्याही क्षेत्रात मोठे होण्याच्या मुळाशी घट्ट भाषाप्रेम असल्याचे सांगत त्यांनी बाहेरचे विश्व जवळ येताना आपल्या आतले विश्व हरवता कामा नये, त्यासाठी आपल्याला संस्कृतीशी जोडून ठेवणारी भाषा जोपासण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी यावेळी बोलताना मराठी भाषेचा गौरव वाढवित प्रचार-प्रसार करणारे तसेच कार्यालयीन कामकाजात मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर वाढविणारे विविध उपक्रम मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त आयोजित करण्यात आले असून यामध्ये महापालिका अधिकारी, कर्मचारी वृंदाच्या सहभागाकरिता वक्तृत्व, परकाव्यवाचन तसेच चारोळी-घोषवाक्य लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती दिली.

स्वच्छताकर्मींसह सर्वांना तीळगूळ वाटून स्वच्छता पुरस्काराचा आनंद साजरा...
मकर संक्रांती सणाचे औचित्य साधून याप्रसंगी ‘स्वच्छ सर्वेक्षण'मध्ये देशातील उंचावलेले मानांकन तसेच सर्वोच्च सेव्हन स्टार रेटींग प्राप्ती बद्दल आनंदाचा गोडवा साजरा करण्यासाठी आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या हस्ते पुरस्कारात महत्वाचे योगदान देणाऱ्या सफाईकर्मींसह, अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, शहर अभियंता संजय देसाई, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. बाबासाहेब राजळे तसेच सर्व उपस्थित विभागप्रमुख आणि अधिकारी, कर्मचारी यांना तीळगूळ वाटप करण्यात आले. तसेच स्वच्छतेचा वसा जपण्याचे ठरवत ‘निश्चय केला, नंबर पहिला' असे आपले घोषवाक्य साध्य करण्यासाठी अधिक जोमाने सज्ज होऊया, असे आवाहन आयुक्तांनी यावेळी केले. 

 

Read Previous

पालिका कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक समस्या सोडविण्याची मागणी

Read Next

प्रजासत्ताक दिन निमित्त खारघर मध्ये आकर्षक विद्युत रोषणाई