ठाणे मधील विविध विकास प्रकल्पांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
करवाढ-दरवाढ नसलेला ठाणे महापालिकेचा अर्थसंकल्प मंजूर
ठाणे : कोणतीही करवाढ नसलेला तरीही महसुली खर्चावर नियंत्रण, महसुली उत्पन्न वाढविण्यावर भर, कामांचा दर्जा उत्तम रहावा याकडे विशेष लक्ष देणारा काटकसरीचा सन २०२३-२४ चा सुधारित ५९८८ कोटी ९ लक्ष रुपयांचा तर सन २०२४-२०२५ सालचा ५०२५ कोटी १ लक्ष रुपयांचा मूळ अर्थसंकल्प महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सादर करुन मंजूर केला.
तत्पूर्वी ठाणे महापालिकेचे अंदाजपत्रक ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्याकडे मुख्य लेखा-वित्त अधिकारी दिलीप सुर्यवंशी यांनी तर ठाणे परिवहन सेवेचा अर्थसंकल्प परिवहन सभापती विलास जोशी आणि परिवहन व्यवस्थापक भालचंद्र बेहेरे यांनी सादर केला. याप्रसंगी अतिरिवत आयुक्त संदीप माळवी, प्रशांत रोडे उपस्थित होते.
ठाणे महापालिकेच्या उत्पन्नाच्या सर्वच बाबींचा अतिशय काळजीपूर्वक विचार करुन प्रत्यक्ष प्राप्त होणाऱ्या एकूण उत्पन्नाचा प्रामुख्याने विचार विनिमय करुनच अर्थसंकल्प तयार करण्यात आला आहे. महसुली उत्पन्न वाढविण्यावर भर, खर्चामध्ये वित्तीय शिस्त, अनावश्यक महसुली खर्चात कपात, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण या त्रिसुत्री कार्यक्रमाची अंमलबजावणी, भांडवली कामातंर्गत घेतलेली कामे पूर्ण करण्याचे नियोजन, प्रशासकीय कामकाजामध्ये सुधारणा, प्राप्त अनुदानातील कामे विहित वेळेत पूर्ण करण्याचे नियोजन, कामांचा दर्जा उत्तम रहावे याकडे विशेष लक्ष देण्यात येणार असल्याचे आयुक्त अभिजीत बांगर यांनी यावेळी सांगितले.
ठाणे महापालिकेचा सन २०२३-२४ मध्ये ४३७० कोटी रवकमेचा अर्थसंकल्प तयार करण्यात आला होता. यामध्ये पाणीपुरवठा आकार, अग्निशमन दल, जाहिरात, स्थावर मालमत्ता, आदि विभागांच्या उत्पन्नात घट येत असली तरी शहर विकास विभागाच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. त्यामुळे महसूली उत्पन्न ३१६० कोटी १६ लक्ष ऐवजी ३०९२ कोटी ३९ लक्ष सुधारित करण्यात आले आहे. महापालिकेस प्राप्त होणाऱ्या अनुदानाचा विचार करता मूळ अर्थसंकल्पात अपेक्षित केलेल्या ४६०.०५ कोटी अनुदानामध्ये ६९७.९८ कोटींची वाढ होत असून सुधारित अर्थसंकल्पात अनुदानापोटी ११५८.०३ कोटी अनुदान अपेक्षित केले आहे. महापालिकेला डिसेंबर २०२३ अखेर ८९८.२९ कोटी रुपये अनुदान प्राप्त झाले असून सदर रवकम २०२३-२४ च्या आरंभीच्या शिल्लकेमध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहेत.
खर्चाच्या बाजुमध्ये सन २०२३-२४ मध्ये महसुली खर्च २७०८.८३ कोटी अपेक्षित केला होता, तो सुधारित अंदाजपत्रकात २६७२.७९ कोटी अपेक्षित असून भांडवली खर्च १६६०.९१ कोटी ऐवजी भांडवली अनुदानात वाढ झाल्याने तो २०४९.४३ कोटी सुधारित करण्यात आला असल्याचे आयुक्त अभिजीत बांगर यांनी नमूद केले.
महापालिका उत्पन्नाचे प्रमुख स्त्रोत असणाऱ्या मालमत्ता कर आणि फी पासून डिसेंबर २०२३ अखेरचे उत्पन्न ४८१.३६ कोटी विचारात घेवून मालमत्ता करापासून ७३८.७१ कोटींचे सुधारित अंदाज करण्यात आले आहे. सन २०२४-२५ मध्ये मालमत्ता कर आणि फीसह ८१९.७१ कोटी इतके उत्पन्न अपेक्षित केले आहे. महापालिकेच्या कर वसुली विभागांतर्गत मालमत्ता कराचे महसुली उत्पन्न वाढीसाठी भागिदारी तत्वावर मालमत्तांचा जी.आय.एस. सर्व्हे, करुन मालमत्ता कराचा डेटा गोळा करण्यात येणार आहे. डिसेंबर अखेरचे उत्पन्न ५५४.५१ कोटी रुपये विचारात घेऊन शहर विकास विभागाकडील उत्पन्न रक्कम ६६२.८६ कोटी करण्यात आले आहे. त्यामुळे आगामी आर्थिक वर्षात ७५० कोटी इतके उत्पन्न अपेक्षित करण्यात आलेले आहे.
स्थानिक संस्था कर विभागाकडे वस्तू-सेवाकर अनुदानापोटी १०५७.७९ कोटी, मुद्रांक शुल्क अधिभारापोटी अनुदान २०० कोटी, स्थानिक संस्था कराची मागील वसुली १० कोटी असे एकूण १२६७.७९ कोटी उत्पन्न अपेक्षित केले होते. शासनाकडून वस्तू-सेवाकर अनुदानाची रक्कम नियमितपणे प्राप्त होत असून डिसेंबर अखेर ७९३.३५ कोटी प्राप्त झाले आहेत. परंतु, मुद्रांक शुल्क अधिभारापोटी अपेक्षित धरलेल्या अनुदानापैकी आतापर्यंत ८६.५१ कोटी अनुदान प्राप्त झाले असल्याने मुद्रांक शुल्कापोटी सुधारित अंदाज १७५ कोटी अपेक्षित केले आहे. तसेच स्थानिक संस्था कराचे सुधारित अंदाज ११.११ कोटी करण्यात आले आहे. सदर सर्व बाबींचा विचार करुन स्थानिक संस्था कर विभागाचे सुधारित अंदाज १२४३.९० कोटी अपेक्षित केले आहेत.
पाणी पुरवठा आकाराचे डिसेंबर पर्यंत प्राप्त उत्पन्न ६३.७६ कोटी विचारात घेता सुधारित अंदाज १५० कोटी अपेक्षित केले असून सन २०२४-२५ मध्ये २२५कोटी उत्पन्न अपेक्षित केले आहे.
याशिवाय अग्निशमन विभागाकडून आगामी आर्थिक वर्षासाठी १००.०३ कोटी, स्थावर मालमत्ता विभागाकडून १२.१५ कोटी, जाहिरात फीच्या माध्यमातून २४.६२ कोटी, शासनाकडील विविध अनुदाने सुधारित ११५८.०३ कोटी तर आगामी आर्थिक वर्षासाठी २८४.३२ कोटी करण्यात आले आहे. तसेच महापालिका हिस्स्याची रक्कम म्युनिसिपल बॉन्ड उभारुन किंवा कर्जाद्वारे उपलब्ध करुन घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
कुष्ठरोग रुग्णांसाठी मोफत औषधे, मातोश्री गंगुबाई संभाजी शिंदे हॉस्पीटलचे विस्तारीकरण, मातोश्री इंदिराबाई बाबुराव सरनाईक हॉस्पिटल नळपाडा, डायलेसिस केंद्र, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आणि राजीव गांधी वैदयकीय महाविद्यालय अद्ययावतीकरण, इंग्रजी माध्यमांच्या नवीन शाळा सुरु करणे, मराठी माध्यमांच्या शाळांचे सक्षमीकरण, ठाणे मध्यवर्ती ग्रंथालय, आदि कामे आगामी वर्षात करण्यात येणार आहेत.
परिवहन सेवा...
ठाणे महापालिका क्षेत्राचा विस्तार आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्याची गरज आहे. ज्यायोगे सर्वसामान्य नागरिकांना सुलभ प्रवासाचे साधन उपलब्ध होईल आणि खाजगी वाहने कमी प्रमाणात रस्त्यावर येतील. त्याचा दुहेरी फायदा होऊन वाहतूक कोंडी कमी होईल, तसेच प्रदुषणही कमी होण्यास मदत मिळेल. केंद्र शासनाच्या १५ व्या ‘वित्त आयोग'च्या शिफारशीनुसार ठाणे महापालिका परिवहन उपक्रमाकडे पर्यावरण पुरक १२३ इलेक्ट्रीक बसेस दाखल झाल्या आहेत. तसेच आणखी ८६ ई-बस खरेदी प्रस्तावित आहे.
पीएम-ई बस सेवांतर्गत ठाणे शहराची निवड करण्यात आली असून सदर योजनेतून ठाणे महापालिका परिवहन सेवेस १०० ई - बसेस मंजूर झाल्या असून टप्प्याटप्प्याने या बसेस दाखल होणार आहेत.
ठाणे शहरासाठी महापालिका मार्फत पुरविण्यात येणाऱ्या सेवा सुविधा प्रभावीपणे पुरविण्याच्या दृष्टीकोनातून लोकसहभाग असणे आवश्यक आहे. याकरिता महान्पालिका प्रशासन एएलएम (ॲडव्हान्स लोकॅलिटी मॅनेजमेंट) संकल्पना लवकरच नागरिकांसमोर सादर करणार आहे. यामध्ये प्रभाग स्तरावर नागरिकांचे समूह एकत्र येवून एएलएम समिती स्थापन करतील आणि समितीमार्फत त्यांचे क्षेत्रातील प्रामुख्याने घनकचरा व्यवस्थापन, परिसर स्वच्छता, शौचालयांची स्वच्छता, आपत्ती व्यवस्थापन, आदि सेवांवर देखरेख ठेवली जाईल.
दरम्यान, सदर सर्व योजना, अभियान आणि प्रकल्पांसाठी सन २०२४-२५ मध्ये महसुली खर्च ३३४५.६६ कोटी, भांडवली खर्च १६७९ कोटी, अखेरची शिल्लक ३५ लक्ष यासह एकूण ५०२५.०१ कोटी खर्चाचे अंदाज प्रस्तावित करण्यात येत असल्याचे आयुक्त अभिजीत बांगर यांनी स्पष्ट केले.