विहीरींनी तळ गाठल्याने भीषण पाणी टंचाई

उरण : उरण तालुक्यातील रानसई ग्रामपंचायत हद्दीतील ६ आदिवासी वाड्यांना आणि चिरनेर ग्रामपंचायत हद्दीतील २ आदिवासी वाड्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींनी तळ गाठल्याने आदिवासी बांधवांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे रानसई आणि चिरनेर या २ ग्रामपंचायत हद्दीतील आदिवासी बांधवांना भेडसावणारी पाण्याची समस्या दूर करण्यासाठी त्यांना टँकरने पाणीपुरवठा करण्याचा निर्णय ‘उरण पंचायत समिती'चे गटविकास अधिकारी समीर वाठारकर यांनी घेतला आहे.

उरण तालुक्यातील जनतेला पाणी पुरवठा करणाऱ्या रानसई आणि पुनाडे धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाण्याची पातळी खालावली आहे. त्यामुळे तालुक्यातील अनेक गावांमधील रहिवाशांना गढूळ पाणी पुरवठा होत असल्याची ओरड रहिवाशांकडून ऐकण्यास मिळत आहे. त्यातच रानसई धरणाच्या डोंगर कुशीत वसलेल्या रानसई ग्रामपंचायत हद्दीतील ६ आदिवासी वाड्यांना तसेच चिरनेर ग्रामपंचायत हद्दीतील चांदायणी आणि केळाचामाळ या २ आदिवासी वाड्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींनी तळ गाठल्याने दोन्ही ग्रामपंचायत हद्दीतील रहिवाशांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे आदिवासी बांधवांना भेडसावणारी पाण्याची समस्या दूर करण्यासाठी टँकरने पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी आदिवासी बांधवांनी केली आहे.

उरण तालुक्यातील रानसई ग्रामपंचायत आणि चिरनेर ग्रामपंचायत हद्दीतील २ आदिवासी वाड्यांवरील रहिवाशांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे या आदिवासी वाड्यावरील पाण्याची समस्या दूर करण्यासाठी सध्या टँकरने पाणीपुरवठा करण्याचा निर्णय ‘उरण पंचायत समिती'च्या माध्यमातून घेण्यात आला आहे.

-समीर वाठारकर, गटविकास अधिकारी-उरण पंचायत समिती. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 शहर स्वच्छतेसह प्रत्येक घरापासूनच कचरा वर्गीकरण महत्वाचे