निसर्गरम्य आपटा रेल्वे स्थानकात सुविधांची वानवा
पनवेल : अनेक सुपरहिट चित्रपटांचे चित्रीकरण झालेल्या आपटा रेल्वे स्थानकात सुविधांची वानवा निर्माण झाली आहे. या स्थानकाच्या सल्लागार समिती सदस्यांनी पाहणी केल्यानंतर आपटा रेल्वे स्थानकात असलेल्या असुविधांबाबत खेद व्यक्त केला. तसेच प्रवाशांना सुविधा मिळण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही सल्लागार समिती सदस्यांनी दिली.
निसर्गरम्य ठिकाण असलेले आपटा रेल्वे स्थानक, एका बाजूला डोंगर आणि दुसऱ्या बाजूला नदीजवळील रस्ता तसेच सुलभ रस्त्यांकरिता ओळखले जाते. कोकण आणि मुंबई मार्ग असलेल्या आपटा रेल्वे स्थानकाला महत्वाचे स्थान आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकानंतर आपटा रेल्वे स्थानक सर्वाधिक चित्रीकरणाचे लोकप्रिय स्थान ठरले आहे. चित्रपट आणि जाहिरात चित्रीकरणासाठी निर्मात्यांची सर्वात जास्त पसंती आपटा रेल्वे स्थानकाला राहिली आहे. कुली, दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे, मोहब्बते, कुछ कुछ होता है, रंग दे बसंती, खाकी, बागी, अशा सुपरहिट चित्रपटांबरोबरच इतर अनेक चित्रपट आणि जाहिरातींचे चित्रीकरण या ठिकाणी झाले आहे. गाड्यांच्या फेऱ्यात वाढ झाल्यानंतर या स्थानकाला दोन्ही बाजूला प्लॅटफॉर्म बांधण्यात आले. तसेच त्यांना जोडण्यासाठी चांगल्याप्रकारे पूल उभारण्यात आला आहे. इन्फ्रास्ट्रक्चरच्या माध्यमातून या प्रगत स्थानकात निर्मिती झाली. आपटा रेल्वे स्थानक दिसायला सुंदर झाले असले तरी आपटा रेल्वे स्थानकामध्ये प्रवासी आणि पर्यायाने कर्मचाऱ्यांना मात्र असुविधांना सामोरे जावे लागत आहे. आपटा रेल्वे स्थानकात पिण्याच्या पाण्यासाठी नळ आहे पण त्याला पाणीच नाही, तीच परिस्थिती शौचालयात पण आहे. आपटा रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्मवर बसण्यासाठी चारच बेंच आहेत. तसेच प्लॅटफॉर्मचा मध्यभाग वगळून सर्वत्र अंधार आहे. स्थानकाच्या दर्शनी भागात उभारलेला खाद्यपदार्थाचा स्टॉल बंद आहे. त्यामुळे प्लॅटफॉर्मची जागा अडवून ठेवण्याचे काम या स्टॉलच्या निमिताने झाले आहे. आपटा रेल्वे स्थानक परिसरात नियमित स्वच्छता, दिव्यांगांसाठी व्हील चेअर, स्ट्रेचर, अग्निरोधक यंत्रणा अशा सुविधा उपलब्ध असल्या तरी उर्वरित सुविधांची कमतरता ‘आपटा रेल्वे स्थानक सल्लागार समिती'चे सदस्य हरेश साठे, अशोक मालुसरे आणि प्रकाश शेडगे यांच्या पाहणीत आली.
आपटा रेल्वे स्थानकात प्रवाशांना जास्तीत जास्त प्राथमिक सुविधा मिळाल्या पाहिजेत आणि या स्थानकाचे महत्व अधिक वाढले पाहिजे यासाठी प्रवाशांकडून सूचना येत आहेत. त्या अनुषंगाने रेल्वे प्रशासनाला लेखी स्वरुपात माहिती देणार आहोत, असे ‘आपटा रेल्वे स्थानक सल्लागार समिती'चे सदस्य हरेश साठे यांनी सांगितले.