मिरा-भाईंदर महापालिकेत ‘सीसीटीव्ही मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्ष'
स्पेशल छब्बीस सारखी टोळी तयार करुन लुट करणारी टोळी अटकेत
11 आरोपींना अटक करण्यात रबाळे पोलिसांना यश
नवी मुंबई : स्पेशल छब्बीस सारखी टोळी तयार करुन ऐरोलीत राहणा-या सार्वजनिक बांधकाम विभागातील सेवानिवृत्त अधिकाऱयाच्या घरातील रोख रक्कमेसह दागिने असा सुमारे 35 लाखांचा ऐवज लुटून नेणाऱया टोळीतील 11 आरोपींना अटक करुन या गुन्हयाची उकल करण्यात रबाळे पोलीसांना मिळाले आहे. या टोळीने लुटलेल्या ऐवजापैकी 12 लाख 75 हजार रुपयांची रोख रक्कम एक पिस्तुल व 6 काडतुस तसेच सियाझ आणि बलोनो कार पोलिसांनी जफ्त केले आहे. पोलिसांकडुन आता या प्रकरणात सहभागी असलेल्या इतर आरोपींचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती परिमंडळ-1चे पोलीस उपआयुक्त विवेक पानसरे यांनी दिली.
ऐरोली सेक्टर-6 मध्ये कुटुंबासह राहणारे कांतीलाल यादव हे वर्षभरापुर्वीच सार्वजनिक बांधकाम विभागातुन सेवानिवृत्त झाले आहेत. गत 21 जुलै रोजी यादव व त्यांची पत्नी घरात असताना, दुपारी पावणे तीन वाजण्याच्या सुमारास ऍन्टी करफ्शनचे अधिकारी असल्याचे भासवून सहा व्यक्ती त्यांच्या घरात घुसले होते. त्यानंतर या टोळीने घराची झडती घेण्याचा बहाणा करुन यादव यांच्या घरातील 25 लाख रुपयांच्या रोख रक्कमेसह विविध प्रकारचे दागिने व इतर ऐवज असा सुमारे 35 लाख रुपये किंमतीचा ऐवज लुटून नेला होता. दोन दिवसानंतर यादव यांनी रबाळे पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केल्यानंतर रबाळे पोलिसांनी परिसरातील सीसीटिव्ही कॅमेऱयांची तपासणी सुरु केली.
या तपासणीत आरोपी ज्या वाहनांतून आले होते, त्या वाहनांची पोलिसांना माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सदर वाहनांच्या नंबरवरुन आरोपींचा माग काढला असता, या गुह्यातील आरोपी हे पुणे, मुंबई, कल्याण, डोबिवली व ठाणे या भागातील असल्याची माहिती मिळाली. सदर माहितीच्या आधारे पोलिसांच्या वेगवेगळ्या पथकांनी वेगवेगळ्या ठिकाणी सापळे लावुन या गुन्हयाची उकल करुन दिपक सुर्यकांत कविटकर (47), नरेश राजपती मिश्रा (52), रुपेश महेश नाईक (42), सिध्देश महेश नाईक (32), मुस्तफा कल्लुभाई करंकाळी (40), विजय लक्ष्मण बारात (43), देवेद्र गांगराम चाळके (32),किशोर गंगाधर जाधव (47), जुल्फीकार वलीमहमद शेख (43), वसिम हमजा मुकादम (39) आणि आयुब बाबुला खान (50) या 11 आरोपीना अटक केल्याचे पोलीस उपआयुक्त विवेक पानसरे यांनी सांगितले.
सदरची कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते, पोलीस निरीक्षक भागुजी औटी (गुन्हे), सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश पगारे, दिपक खरात, पोलीस उपनिरीक्षक दयानंद वणवे व त्यांच्या पथकाने केली.
स्पेशल छब्बीस चित्रपटाच्या कथानकातून लुटीची सुचली कल्पना
या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या टोळीला ऐरोलीत राहणाऱया कांतीलाल यादव यांच्या घरात 80 करोड रुपये असल्याची माहिती मिळाली होती. सदर रक्कम लुटण्यासाठी या टोळीला अक्षय कुमारच्या स्पेशल छब्बीस या चित्रपटावरुन कल्पना सुचल्याचे तसेच सदर चित्रपटातील कथानकानुसार त्यांनी ऍन्टी करफ्शनच्या अधिकाऱयांची टीम तयार करुन सदरची लुट केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या लुटीत सहभागी असलेल्या काही आरोपींना इडीची कारवाई असल्याचे सांगुन सोबत घेतल्याचे व सदर कारवाईत जफ्त करण्यात आलेल्या रक्कमेतील 3 टक्के रक्कम प्रत्येकाला देण्याचे कबुल करण्यात आल्याचे तपासात आढळुन आले आहे.