नवी मुंबई मधील बाजारात ‘रानमेवा' दाखल

वाशी : ऐन उन्हाळ्यात हवाहवासा वाटणारा आणि लांबून पाहूनच तोंडाला पाणी सुटेल इतका चविष्ट असणारा रानमेवा नवी मुंबई शहरातील बाजारात दाखल झाला आहे. चिंच, आवळा, करवंदे, छोटा आवळा, बोर, तोतापुरी कैरी, जांभूळ, ताडगोळे, फणस गरे, पिवळा रानमेवा असा रानमेवा भरलेल्या टोपल्या नवी मुंबई शहरात ठिकठिकाणी नजरेस पडत आहेत. यातील ताडगोळे, करवंदे, जांभूळ, पिवळा रानमेवा यांना सध्या जास्त मागणी असल्याने त्यांचे भाव देखील दरवर्षीप्रमाणे चढेच आहेत .

रस्त्याच्या कडेला, गावागावातील बाजारात विकण्यासाठी आलेला आंबट, गोड, तुरट रानमेवा खरेदी करण्यासाठी नवी मुंबईकरांची झुंबड उडत आहे. उन्हाळा म्हटल्यावर नारळ, आंबा, फणस या पलिकडचा रानमेवा कुणाला दिसत नाही. पण, बोरे, रानजांभळे, आवळा, चिंच, पिवळा रानमेवा, ताडगोळे, करवंदे या अस्सल रानमेव्याने नवी मुंबई शहरातील वाशी, तुर्भे, नेरुळ, कोपरखैरणे, घणसोली, बेलापूर आदी बाजारात हजेरी लावल्याने बाजार घमघमून निघाला आहे. या रानमेव्यातील प्रत्येक फळाचे स्वतःचे वेगळे वैशिष्टय़ही आहे. रानमेवा गुणकारी असण्यासोबतच रानमेव्याची चवही खवय्यांच्या मनाला तृप्त करणारी आहे.

इतरवेळी जंकफूड, चाट पदार्थावर ताव मारणारी तरुणाई बाजारात आलेला रानमेवा आवडीने खात आहे. २० ते ५०  रुपयांमध्ये हा रानमेवा विकला जात असल्याने खवय्यांच्या खिशालाही परवडणारा आहे.

चिंचांमध्येही विविध प्रकार खवय्यांच्या खायला मिळत आहेत. तिखट-मिठी मसाला लावलेल्या चिंचा, साखरेचे पाणी मारलेल्या गोड चिंचा, तोतापुरी कैरीचे लांबसडक काप, तिखट-मीठ भुरभुरलेले कैरीचे काप, छोटी बोरे, सुकवलेले आणि सुरकुत्या आलेले खारी बोर, गावठी बोर खाण्यासाठी प्रत्येकाला मोह आवरत नाही, असे चित्र सध्या बाजारात दिसत आहे.

नवी मुंबई मधील बाजारात छोटया-छोटया रानमेव्यासह पिवळसर सोनेरी रंगोचे आणि गोड फणसाचे गरेही विकले जात आहेत. गर काढून प्लास्टिकच्या पिशवीत बाजारात विकण्यासाठी ठेवण्यात आले आहेत. डोंगराची काळी मैना म्हणून नावलौकिक असलेल्या करवंदाशिवाय रानमेवा अपूर्णच आहे. कच्ची आणि पिकलेली करवंदे घ्ोण्यासाठी नागरिकांची बाजारात चांगलीच झुंबड उडत आहे. ठाणे, पालघर, बदलापूर आणि पनवेल आदी भागातून मोठ्या प्रमाणात रानमेवा नवी मुंबई शहरातील बाजारात दाखल होत आहे.

बाजारातील रानमेवा भाव
ताडगोळे -१२० ते १६० रुपये डझन
जांभूळ - ४०० ते ५०० रुपये प्रतिकिलो
चिंच - २५० ते ३०० रुपये प्रतिकिलो
करवंदे - २० ते ५० रुपये वाटा 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘अंतिम श्वासात राही मराठी'