अखेर तुर्भे येथील उद्यानामध्ये महापालिकेने बसवली खेळणी

तुर्भे : तुर्भे येथील उद्यानामधील खेळण्यांची दुरवस्था झाल्याने स्थानिक रहिवाशांनी नाराजी व्यक्त केली होती. तसेच उद्याानामधील खेळण्यांची दुरुस्ती करण्याची मागणी नवी मुंबई महापालिका प्रशासनाकडे केली होती. या मागणीची नोंद घेत अखेर महापालिका उद्यान विभाग मार्फत तुर्भे येथील उद्यानांमधील खेळण्यांची दुरुस्ती करण्यात आली असून, उद्यानात २ लाख रुपयांपेक्षा अधिक रवकमेची नवीन मल्टिप्लेक्स खेळणी बसवण्यात आली आहेत. यामुळे स्थानिक मुले-मुलींना दिलासा मिळाला आहे.

‘सिडको'ने नवी मुंबई शहराची निर्मिती करताना रहिवासी वस्तीमध्ये मोकळ्या जागा, मैदाने, उद्याने आदींची तरतूद करुन ठेवली आहे. तुर्भे विभागामध्ये माथाडी आणि लहान व्यापारी, दलाल आदींसाठी अल्प उत्पन्न गटातील घरांचा प्रकल्प राबवण्यात आला आहे. या प्रकल्पामध्ये रहिवासी घराजवळ काही मोकळ्या भूखंडावर उद्याने, मैदाने निर्माण करण्यात आली आहेत. तुर्भे सेक्टर-२१ ए/ ए-१ टाईप मध्ये एका मोकळ्या भूखंडावरील उद्यानामधील खेळणी तुटली होती. यामुळे मागील वर्षभरापासून लहान मुले-मुलींच्या आनंदावर विरजण पडले होते. या विषयी स्थानिकांनी वारंवार तक्रारी करुनही त्या तक्रारींची महापालिका प्रशासनाकडून दखल घेतली जात नव्हती. त्यामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये संतापाची भावना होती. अल्प उत्पन्न गटातील रहिवाशांना ६० ते ७० रुपये खर्च करुन त्यांच्या मुले-मुलींना वाशी येथील उद्यानामध्ये खेळायला घेऊन जाणे नेहमी परवडणारे नव्हते. तुर्भे येथील रहिवाशी पाणी देयक, मालमत्ता कर आदी महापालिकेचे कर अगदी वेळेवरती भरत आहेत. याविषयी वारंवार वर्तमानपत्रामध्ये वृत्त प्रसिध्द करुन वरिष्ठ महापालिका अधिकाऱ्यांपर्यंत जनतेच्या भावना मांडण्यात आल्या होत्या. याची नोंद घेत नवी मुंबई महापालिक उपायुक्त (उद्यान विभाग) दिलीप नेरकर यांनी तुर्भे येथील उद्यानातील खेळण्यांची देखभाल दुरुस्ती करणे आणि काही ठिकाणी नवीन खेळणी बसवण्याच्या कामाला तातडीने मंजुरी दिली. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

एपीएमसी फळ बाजारात अमेरिकन सफरचंद दाखल