पर्यावरणशीलता जपत दिव्यांग विद्यार्थ्यांनी बनविले सीडबॉल

महापालिका ईटीसी केंद्रातर्फे सीडबॉल बनविण्याची कार्यशाळा संपन्न

नवी मुंबई : ‘माझी वसुंधरा अभियान' अंतर्गत क-वर्ग महापालिकांमध्ये राज्यातील प्रथम क्रमांकाच्या पर्यावरणशील शहराचा बहुमान पटकविण्यामध्ये नवी मुंबई शहरातील नागरिकांचा महत्वाचा वाटा आहे. अभियान अंतर्गत विविध स्वरुपाच्या पर्यावरणशील उपक्रमांचे महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात येत असून यामध्ये विविध समाज घटकांचा सक्रिय सहभाग नेहमीच राहिलेला आहे.

याकामी दिव्यांगांचाही सहभाग असावा या दृष्टीने नवी मुंबई महापालिकेच्या ईटीसी अपंग शिक्षण, प्रशिक्षण-सुविधा केंद्राच्या वतीने माता अमृतानंदमयी मठ, नेरुळ यांच्या सहयोगाने ईटीसी केंद्रात दिव्यांग मुलांसाठी सीडबॉल तयार करण्याच्या विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. लहान वयातच मुलांमध्ये पर्यावरणशील दृष्टीकोन निर्माण व्हावा यादृष्टीने सकाळ आणि दुपार या दोन सत्रातील मुलांसाठी स्वतंत्र कार्यशाळा घेण्यात आली. ईटीसी केंद्र संचालक डॉ. मिताली संचेती यांच्या नियंत्रणाखाली आयोजित सदर सीडबॉल कार्यशाळेमध्ये दिव्यांग मुले काहीतरी वेगळे करायला मिळणार या उत्सुकतेने सहभागी झाली होती.

देशापरदेशात सीडबॉलचा प्रयोग यशस्वीरित्या राबविण्यात येत असल्याचे दिसून येते. यामध्ये वृक्ष लागवडीसाठी बीज असलेले मातीचे गोळे तयार करण्यात येतात. सीडबॉल बनविण्याकरिता जुने कपडे, हातरुमाल, ॲप्रन अशा वस्तुंचा उपयोग करण्यात आला. कार्यशाळेमध्ये मुलांना बी रुजण्यासाठी योग्य मातीची निवड कशी करावी, त्यात गांडूळ खत, कोकोपीट आणि शेणखताचे किती प्रमाण असावे अशा विविध बाबींबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.

यावेळी लागवड योग्य ओलसर मातीचे बियांसहित गोळे, बॉल मुलांकडून बनवून घेण्यात आले. सीड बॉल बनविण्याकरिता वड, पिंपळ, जांभूळ, निंब, करंज अशा विविध देशी झाडांच्या बियांचा उपयोग करण्यात आला. यावेळी मुलांनी मातीच्या चिखलामध्ये बीज रोपणाचा आनंद घ्ोतला. ईटीसी केंद्र संचालक डॉ. मिताली संचेती यांच्यासह ईटीसी केंद्रातील शैक्षणिक व्यवस्थापक दीपक नवगरे आणि सर्व शिक्षकांनी कार्यशाळा आयोजनात उत्साहाने सहभागी होत मुलांकडून सीडबॉल बनवून घेण्यात महत्वाची भूमिका बजावली.

दिव्यांग मुलांमध्ये पर्यावरण प्रेम वाढविण्याच्या दृष्टीने व त्यांच्या मनात निसर्गा विषयी जागरुकता निर्माण करण्याच्या दृष्टीने महत्वाचा असलेला सीडबॉल निर्मिती कार्यशाळेचा उपक्रम दिव्यांग विद्यार्थ्यांनी उत्साहाने यशस्वी केला. 

 

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

माध्यमिक शिक्षक पदासाठी ५३३ अर्ज प्राप्त