मराठा समाज व खुल्या प्रवर्गाच्या सर्वेक्षणासाठी पनवेल महापालिकेकडून मन्युष्यबळ उपलब्ध
पनवेल : पनवेल महानगरपालिका हद्दीतील मराठा आरक्षण व खुल्या प्रवर्गाचे सर्वेक्षण करण्यासाठी आयुक्त गणेश देशमुख यांच्या आदेशानुसार आज दिनांक २१ जानेवारी रोजी आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह येथे प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले.
सदर प्रशिक्षणास उपायुक्त तथा सहाय्यक नोडल अधिकारी गणेश शेटे, उपायुक्त सचिन पवार,उपायुक्त डॉ. वैभव विधाते, मुख्य लेखा परिक्षक निलेश नलावडे, लेखाधिकारी संदीपान खुरपे, निवडणूक विभाग प्रमुख सदाशिव कवठे, आस्थापना विभाग प्रमुख नामदेव पिचड ,प्रभाग अधिकारी जितेंद्र मढवी, अरविंद पाटील, रोशन माळी, सर्व पर्यवेक्षक व प्रगणक उपस्थित होते.
राज्य मागासवर्ग आयोगामार्फत सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी दिनांक 23 जानेवारीपासून युद्धपातळीवर सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यासाठी पनवेल महापालिकेची यंत्रणा सज्ज असून कालबद्धरितीने अचूक सर्वेक्षण पूर्ण करण्यासाठी सर्व नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन आयुक्त गणेश देशमुख यांनी केले आहे.
मागासवर्ग आयोगाच्या सर्वेक्षणाचे काम दि. 23 जानेवारी ते 31 जानेवारी दरम्यान होणार आहे. या सर्वेक्षणासाठी पालिकेच्यावतीने कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे कर्मचारी गृहभेटी देणार असून शासनाने दिलेल्या विहित नमुन्यातील माहिती संकलित करणार आहे. या कर्मचाऱ्यांना अचूक व बिनचूक माहिती द्यावी तसेच या कालावधीत उपलब्ध रहावे. हे काम अत्यंत महत्वाचे असल्याने या सर्वेक्षणासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे असे आवाहन उपायुक्त गणेश शेटे यांनी केले आहे.
पनवेल महापालिका हद्दीत घरोघरी जाऊन होणाऱ्या या सर्वेक्षणासाठी महापालिकेच्यावतीने सुमारे ६०० कर्मचारी व ४० पर्यवेक्षकांची निवड करण्यात आली आहे. या सर्वेक्षणासाठी शासनाच्यावतीने मोबाईल ॲप विकसित करण्यात आले आहे. खारघर, कळंबोली, कामोठे, पनवेल चारही प्रभागासांठी प्रभाग अधिकाऱ्यांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.