जागतिक पर्यावरण दिन निमित्त महापालिका तर्फे आज व्यापक लोकसहभागातून वृक्षारोपण
नवी मुंबई: जागतिक पर्यावरण दिननिमित्त नवी मुंबई महापालिका तर्फे आज ५ जून रोजी राबविण्यात येणाऱ्या वृक्षारोपण मोहीमेत लोकसहभागावर विशेष भर दिला जाणार आहे. या अनुषंगाने महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली यावर्षी करावयाच्या वृक्षारोपणाचा कृती आराखडा उद्यान विभागाने तयार केला असून, १.५ लाख देशी वृक्षरोपांची लागवड महापालिका तर्फे करण्यात येणार आहे.
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून करावयाच्या वृक्ष लागवडीसाठी महापालिका उद्यान विभागाकडे ३५ हजारपेक्षा अधिक देशी वृक्षरोपे उपलब्ध असून, व्यापक लोकसहभाग घेत या वृक्षरोपांची योग्य जागी लागवड करण्यात येणार आहे.
वृक्षरोपे लागवडीसाठी वृक्षरोपांची आणि जागांची आवश्कता असलेल्या नागरिकांनी आणि संस्थांनी महापालिका सहाय्यक आयुवत (उद्यान) ऋतुजा गवळी यांना ७९७७६३००६३ या क्रमांकावर तसेच महापालिका उद्यान अधिक्षक प्रकाश गिरी यांना ९३२२९१२८०१ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन सर्व माध्यमांतून करण्यात आले होते. या आवाहनास नागरिकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला असून, वृक्षरोपे आणि वृक्षरोपणासाठी जागा उपलब्ध करुन देण्यासाठी १५० पेक्षा अधिक व्यक्ती आणि संस्था यांनी महापालिका उद्यान विभागाकडे अर्ज दिले आहेत. नागरिक आणि संस्थांच्या मागणीनुसार त्यांना लागवडीसाठी ११ हजारपेक्षा अधिक देशी वृक्षरोपांचे वाटप करण्यात आले आहे. तसेच त्यामधील काही जणांना लागवडीसाठी जागाही सूचित करण्यात आलेल्या आहेत.
यावर्षी जागतिक पर्यावरण दिनाची संकल्पना ‘आमची जमीन, आमचे भविष्य' अशी असून, त्या अनुषंगाने नवी मुंबई महापालिका तर्फे विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात येणार आहे. वृक्षारोपणासाठी महापालिका मार्फत तुर्भे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, कोपरखैरणे निसर्गोद्यान, मीनाताई ठाकरे उद्यान वाशी, नेरुळ पोलीस स्टेशनसमोर, साने गुरुजी उद्यान दिघा आदी विविध जागांवर वृक्षारोपण करण्यात येणार असून, कांचन, चिंच, मोहगना पारिजात, सिताफळ, जांभूळ, निंब, आंबा, बांबू अशा पक्ष्यांना आकर्षित करतील आणि नवी मुंबई शहराच्या जैवविविधतेत भर पडेल अशा देशी वृक्षारोपांची लागवड नवी मुंबई महापालिका तर्फे करण्यात येणार आहे.
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून नवी मुंबई शहरातील नागरिकांना सोबत घेऊन महापालिका तर्फे देशी वृक्षरोपांची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात येणार असून, या मोहीमेमध्ये वृक्षप्रेमी नागरिकांनी सहभागी होऊन आपले नवी मुंबई शहर हरित आणि पर्यावरणशील बनविण्यासाठी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन महापलिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी केले आहे.