‘ज्ञानविकास विद्यालय'ची स्पर्धा परीक्षांतील यशाची परंपरा कायम

नवी मुंबई : कोपरखैरणे सेक्टर-१७ मधील ज्ञानविकास संस्था संचलित ‘ज्ञानविकास विद्यालय' मधील आठवी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद मार्फत घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती (एनएमएमएस २०२३-२०२४) परीक्षेत उज्वल यश संपादन करुन ‘ज्ञानविकास विद्यालय'च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे.

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवत्ता यादीत ‘ज्ञानविकास विद्यालय' मधील एकूण ८  विद्यार्थी- विद्यार्थिनी आले असून, कुमारी अविष्का महेश घरत या विद्यार्थिनीने संपूर्ण ठाणे जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावण्याची किमया केली आहे. तसेच ओमकार तानाजी काळे, वैष्णवी संतोष शेलार, शिवराज अनिल चटाले, सत्यवान संदीप धापते, आयुष किशोर सोलंकर, रसिका रमेश शेळके, दिशा रामू महाले या विद्यार्थ्यांनीही शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त केले आहे. या सर्व विद्यार्थ्यांना प्रत्येकी ६० हजार रुपये शिष्यवृत्ती पाच वर्षात प्राप्त होणार आहेत. यापूर्वी कुमारी अविष्का  घरत हिने प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत ८७.३३ % गुण मिळवून नवी मुंबई विभागात प्रथम क्रमांक पटकाविला होता.

गुणवत्ता यादी व्यतिरिक्त शिष्यवृत्ती परीक्षा दिलेल्या ज्ञानविकास विद्यालय मधील २२ विद्यार्थ्यांना प्रत्येकी ३८,४०० रुपये इतक्या रक्कमेसह सारथी शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे.      दुसरीकडे इयत्ता नववी मधील विद्यार्थ्यांसाठी आयोजित डॉक्टर होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षेत ‘ज्ञानविकास विद्यालय' मधील विद्यार्थिनी कुमारी सृष्टी सुधीर जगदाळे हिने यशस्वी होत कांस्यपदकाला गवसणी घातली आहे.

 शिष्यवृत्ती आणि स्पर्धा परीक्षा दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांना विद्यालयातील शिक्षिका सौ. एस. ए. देशमुख, सौ.एम. एम. पाटील आणि शिक्षक व्ही. बी. पाटील यांनी मार्गदर्शन केले होते.

शिष्यवृत्ती आणि स्पर्धा परीक्षा मधील सर्व यशस्वी विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि मार्गदर्शक शिक्षकांचे ‘ज्ञानविकास संस्था'चे संस्थापक-अध्यक्ष ॲड. पी. सी. पाटील, अध्यक्ष प्रसाद पाटील, ज्येष्ठ संचालक बळीराम म्हात्रे, प्रशासकीय अधिकारी रामदास बिडवे, मुख्याध्यापक एस. एस. कापडणीस यांच्यासह सर्व संस्था संचालक, विद्यालयातील पर्यवेक्षक, शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. 

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

 उष्णता लाट; शाळांच्या वेळेत बदल करण्याची मागणी