‘धुतूम'मधील साकवांचे स्ट्रक्चरल ऑडीट करा

उरण : उरण तालुक्यातील दिघोडे आणि वेश्वी ग्रामपंचायत हद्दीत २६ फेब्रुवारी रोजी बेलोंडाखार खाडीकिनाऱ्यावरील साकव पडण्याची दुदैवी घटना घडली आहे. या अपघातात निष्पाप आदिवासी बांधवांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे भविष्यात अशा प्रकारची दुदैवी घटना टाळण्यासाठी सिडको, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि खार भूमी अभिलेख विभाग पेण यांनी धुतूम ग्रामपंचायत हद्दीतील खाडीकिनाऱ्यावरील साकवांचे स्ट्रक्चरल ऑडीट करुन नवीन साकवांचे बांधकाम करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी ‘धुतूम'च्या सरपंच सौ. सुचिता प्रेमनाथ ठाकूर यांनी केली आहे.

धुतूम आणि दिघोडे, वेश्वी या गावांना जोडणाऱ्या बेलोंडाखार खाडीकिनाऱ्यावर १० वर्षापूर्वी ‘पीडब्ल्युडी'च्या माध्यमातून साकवांचे काम ‘नियोजन समिती'च्या फंडातून करण्यात आले होते. परंतु, जीर्ण झालेल्या साकवांकडे संबंधित प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने २६ फेब्रुवारी रोजी साकव पडण्याची दुदैवी घटना घडली. सदर अपघातात मासेमारी करण्यासाठी गेलेल्या राजेश लक्ष्मण वाघमारे, अविनाश सुरेश मुरकुटे यांना आपला जीव गमवावा लागला. तर गुरुनाथ सदानंद कातकरी, सुरज शाम वाघमारे या दोघांना गंभीर स्वरुपाची दुखापत झाली आहे, अशी माहिती सरपंच सौ. सुचिता ठाकूर यांनी दिली.

त्यामुळे सिडको, पीडब्ल्युडी, खार भूमी अभिलेख विभाग यांनी धुतूम ग्रामपंचायत हद्दीतील खाडीकिनाऱ्यावरील जीर्ण झालेल्या साकवांचे स्ट्रक्चरल ऑडीट करुन नव्या साकवांचे बांधकाम करण्यासाठी पुढाकार घ्यावा. अन्यथा खाडीकिनाऱ्यावर मासेमारी करण्यासाठी जाणाऱ्या गावातील शेतकऱ्यांना आणि परिसरातील आदिवासी बांधवांना पुन्हा एकदा २६ फेब्रुवारी २०२४ च्या घटनेची पुनरावृत्ती घडून आपले प्राण गमवावे लागतील, अशी भिंती ‘धुतूम'च्या सरपंच सौ. सुचिता ठाकूर यांनी व्यक्त केली आहे. तसेच सिडको, पीडब्ल्युडी-उरण यांच्याकडे लेखी पत्राद्वारे नवीन साकव बांधण्याची मागणी देखील केली आहे. याप्रसंगी धुतूम गावातील नंदकुमार ठाकूर, दिपक ठाकूर, दिगंबर ठाकूर, प्रेमनाथ ठाकूर यांच्यासह इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

दरम्यान, ‘धुतूम'च्या सरपंच सौ. सुचिता ठाकूर यांच्या मागणीची दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम विभाग-उरण आणि ‘सिडको'च्या अधिकारी वर्गाने तात्काळ सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पडलेल्या साकवांचे आणि खाडीकिनाऱ्यावरील जीर्ण झालेल्या साकवांची पाहणी केली. यावेळी लवकरच लवकर साकवांचे नव्याने बांधकाम करण्यात येणार असल्याचे आश्वासन दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांनी सरपंच सौ. सुचिता ठाकूर यांना दिले आहे. 

 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

पनवेल महापालिका ॲवशन मोडवर