२० मे रोजीच्या ‘मतदान' करिता ‘नमुंमपा'चे नियोजन

नवी मुंबई : ‘लोकसभा निवडणूक-२०२४'करिता ‘२५-ठाणे लोकसभा मतदारसंघ'मध्ये २० मे रोजी मतदान होत असून जास्तीत जास्त मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा याकरिता नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ.  कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीप कार्यक्रमांतर्गत विविध प्रसार माध्यमांचा आणि साधनांचा वापर करुन मोठ्या प्रमाणावर जनजागृती अभियान राबविण्यात आले आहे.

अशाच प्रकारे मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांवर नागरिकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये याची खबरदारी घेत १५०-ऐरोली विधानसभा मतदारसंघ कार्यालय तसेच १५१-बेलापूर विधानसभा मतदारसंघ कार्यालय यांच्याशी समन्वय साधून नवी मुंबई महापालिका तर्फे आवश्यक सुविधा उपलब्ध करुन दिल्या जात आहेत.

महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार या अनुषंगाने विशेष आढावा बैठक घेत अतिरिक्त आयुक्त शिरीष आरदवाड आणि सुनील पवार यांनी शहर अभियंता संजय देसाई, निवडणूक विभागाचे उपायुक्त शरद पवार, उपायुक्त योगेश कडुस्कर, चंद्रकांत तायडे यांच्यासह संबंधित विभागप्रमुख आणि विभाग अधिकारी यांच्याशी संवाद साधत मतदान केंद्रांवर पुरवावयाच्या सुविधांविषयी नियोजन केले.

नवी मुंबई महापालिकेच्या वतीने महापालिका कार्यक्षेत्रातील मतदान केंद्रांवर दिव्यांग मतदारांकरिता ३६० व्हीलचेअर पुरवण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे सर्व ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि स्वच्छतागृहांची व्यवस्था पाहण्यात येत आहे. मतदानाच्या दिवशी मतदारांना त्यांच्या मतदान केंद्राची माहिती सहजपणे होण्यासाठी शहरातील चौकांमध्ये दिशादर्शक फलक लावण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे मतदान केंद्राच्या परिसरात मतदान केंद्राची नेमकी स्थळे दर्शविणारे क्यूआर कोड असलेले फलक प्रदर्शित केले जात आहेत. याशिवाय मतदान जनजागृती अंतर्गत मतदारांना प्रोत्साहित करण्यासाठी बिल्ले तयार करण्यात आले असून ते महापालिका अधिकारी-कर्मचारी तसेच स्वच्छताकर्मी आपल्या छातीवर प्रदर्शित करून मतदान करण्याचे आवाहन करणार आहेत.

महापालिकेच्या आशा वर्कर मार्फतही मतदानाच्या दिवशी घराघरातील मतदारांना मतदान करण्यासाठी आवाहन केले जाणार आहे. त्यासोबतच महापालिकेची आरोग्य पथके आणि रुग्णवाहिकाही सुसज्ज असणार आहेत.

नवी मुंबई महापालिकेने सुरुवातीपासूनच स्वीप उपक्रमांतर्गत मतदार जनजागृतीसाठी वेगवेगळे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले असून त्यामध्ये चौकाचौकांमध्ये पथनाट्य सादरीकरण, मॉल्समध्ये पलॅश मॉबसारखा आकर्षित करुन घेणारा उपक्रम, चित्रपटगृहांमध्ये व्हिडिओ क्लिप द्वारे मतदान जनजागृती, महापालिकेच्या सर्व सोशल मिडीया माध्यमांद्वारे प्रशांत दामले, भरत जाधव, कविता लाड अशा नामवंत कलावंतांच्या चित्रफिती प्रदर्शित करुन तसेच ग्राफिक प्रदर्शित करुन मतदानाबाबत केलेले आवाहन, चौकाचौकांमध्ये पलेक्स होर्डिंगद्वारे तसेच डिजीटल होर्डिंगद्वारे केलेली जनजागृती, नवी मुंबई महापालिकेच्या ४०० हून अधिक एनएमएमटी बसेस आणि बसस्टॉपवर बॅनर द्वारे केलेली प्रसिध्दी तसेच एनएमएमटी चालक-वाहक यांनी मतदानाचा संदेश प्रसार करणारी गांधी टोपी घालून केलेली मतदार जागृती, महापालिकेच्या कचरा वाहतूक करणाऱ्या २०० हुन अधिक वाहनांवर मतदार जनजागृतीचे जिंगल प्रसारण, मालमत्ता देयकांवरुन तसेच रुग्णालयातील केसपेपर द्वारे मतदान करण्याचे केलेले आवाहन, ठिकठिकाणी लावलेले सेल्फी पॉईंट, अशा कल्पक संकल्पना राबवत व्यापक जनजागृती करण्यात आली.

शिक्षण विभागामार्फत विद्यार्थ्यांच्या रॅली काढून तसेच शाळा शाळांमध्ये निबंध, चित्रकला, रांगोळी, गायन, वक्तृत्व असे नानाविध उपक्रम राबवून मतदान जनजागृती करण्यात आली. त्याचप्रमाणे १.०३ लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी आपल्या आई-बाबांना पत्र लिहून मतदानाचे आवाहन केले आहे. अशा सर्वच अभिनव उपक्रमांची दखल नागरिकांप्रमाणेच ‘निवडणूक आयोग'कडूनही घेतली गेली.

लोकसभा निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी महापालिका निवडणुकीच्या दिवसापर्यंत अधिक प्रभावीपणे प्रचार मोहीम राबवणार असून त्याविषयी या बैठकीमध्ये सखोल चर्चा करण्यात येऊन नियोजन करण्यात आले आहे. -शिरीष आरदवाड, अतिरिवत आयुवत-नवी मुंबई महापालिका. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

 नवी मुंबईत ८५० पोलींग बुथवर शांततेत मतदान