महापालिकेची पावती फाडण्याच्या बदल्यात मार्केट ओट्याचा ताबा

खारघर : खारघर सेक्टर-१९ मध्ये ‘सिडको'ने उभारलेल्या मंडई मध्ये  भाजीपाला विक्री आणि इतर व्यवसाय करायचा असेल तर पनवेल महापालिकेची पावती फाडा आणि बिनधास्त व्यवसाय करा, अशी ऑफर अनधिकृत फेरीवाल्यांना दिली जात असल्याने रहिवाशांमध्ये नाराजी पसरली आहे.

खारघर सेक्टर-१९ वसाहत तसेच बाजूला असलेल्या मुर्बी गावात भाजी मंडईची सोय नसल्यामुळे ‘सिडको'ने खारघर सेक्टर-१९ मधील केसर सिम्फनी इमारती शेजारी भाजीपाला, फळ विक्रेत्यांसाठी ओटे उभारले आहेत. ‘सिडको'ने सदर ओट्यांचे वितरण करुन मंडई सुरु करावी, अशी मागणी खारघर मधील रहिवाशांनी ‘सिडको'कडे केली होती. मात्र, पनवेल महापालिका अस्तित्वात आल्यावर ‘सिडको'ने खारघर मधील फेरीवाला भूखंड महापालिकाकडे हस्तांतरीत केले आहेत. महापालिकेने सदर भूखंडांवर भाजी, फळ मंडई सुरु करणे आवश्यक आहे. परंतु, बाहेरुन आलेल्या परप्रांतीयांकडून पैसे मिळतात म्हणून ऑफर देवून  अनधिकृत फेरीवाल्यांच्या  व्यवसायला प्रोत्साहन देण्याऐवजी खारघर, मुर्बी परिसरातील अधिकृत  फेरीवाल्यांना जागा देवून सदर मंडई सुरु करावी, अशी मागणी स्थानिक रहिवाशांकडून केली जात आहे. या विषयी महापालिका खारघर प्रभाग अधिकारी जितेंद्र मढवी यांच्याशी संपर्क केला असता होवू शकला नाही.

गेल्या दहा वर्षांपासून खारघर सेक्टर-१९ वसाहत तसेच मुर्बी गावातील भाजी मंडई धूळ खात पडून आहे. त्यामुळे पनवेल महापालिकेने अधिकृत फेरीवाल्यांना ओट्याचे वितरण करुन महापालिकेच्या फेरीवाला धोरणानुसार शुल्क आकारणी करुन भाजी मंडई सुरु करण्याची मागणी करण्यात आली आहे. - नेत्रा किरण पाटील, माजी नगरसेविका - खारघर. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

मालमत्ता कर भर करण्याकडे वाढला पनवेलकरांचा कल