नवी मुंबईतील ‘विकसित भारत संकल्प यात्रा'ची सांगता
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका क्षेत्रात २७ डिसेंबर २०२३ रोजी दिघा येथून सुरु झालेल्या ‘विकसित भारत संकल्प यात्रा'ची १८ जानेवारी रोजी सीबीडी, सेवटर-१ मधील सुनिल गावस्कर मैदान येथे सांगता करण्यात आली. यावेळी १२०० हुन अधिक नागरिक उपस्थित होते. दरम्यान, यापूर्वी नवी मुंबई महापालिका क्षेत्रात ४४ ठिकाणी झालेल्या ‘विकसित भारत संकल्प यात्रा'मध्ये २४ हजार हुन अधिक नागरिक उत्साहाने सहभागी झाले.
‘विकसित भारत संकल्प यात्रा'च्या या सोहळ्यावेळी बेलापूर परिसरात नागरिक आणि विद्यार्थ्यांच्या सहभागातून जनजागृतीपर रॅली काढण्यात आली. यामध्ये बँड आणि लेझीम पथकांच्या तालासूरात विद्यार्थी, नागरिकांनी ‘संकल्प यात्रा'मध्ये सहभागी होण्याचे इतर नागरिकांना आवाहन केले.
सुनिल गावस्कर मैदानात संपन्न झालेल्या ‘विकसित भारत संकल्प यात्रा'च्या सांगता समारंभ प्रसंगी ‘बेलापूर' आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून संपूर्ण देशभरात आयोजित करण्यात आलेल्या ‘संकल्प यात्रा'चे नवी मुंबई महापालिका क्षेत्रात उत्तम प्रकारे आयोजन केल्याबद्दल महापालिका आयुवत राजेश नार्वेकर यांच्यासह इतर अधिकारी, कर्मचारी समुहाचे कौतुक केले. दिघा पासून बेलापूरपर्यंत ‘संकल्प यात्रा'तील सर्वच ठिकाणी नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला. त्यामुळे सरकारी योजनांची माहिती आणि लाभ थेट नागरिकांपर्यंत पोहोचवता आला, याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
आमदार रमेश पाटील यांनीही यावेळी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. यावेळी अतिरिक्त आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांनी नवी मुंबईतील नागरिकांनी संकल्प यात्रा उपक्रमाला चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल आभार मानत २० जानेवारी पासून सुरु होणाऱ्या शासन आपल्या दारी या उपक्रमातही मोठ्या संख्येने सहभागी होऊन विविध शासकिय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
या प्रसंगी अतिरिवत आयुक्त सुजाता ढोले, परिमंडळ-१ चे उपायुक्त सोमनाथ पोटरे, समाजविकास विभागाचे उपायुक्त किसनराव पलांडे, बेलापूर विभागाचे सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी शशिकांत तांडेल, ‘विकसित भारत संकल्प यात्रा'चे नोडल अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त जयंत जावडेकर, कार्यकारी अभियंता संजय पाटील, संजीव पाटील, माजी नगरसेवक डॉ. जयाजी नाथ, अशोक गुरखे, माधुरी सुतार, सुरेखा नरबागे, राजश्री कातकरी तसेच ‘संकल्प यात्रा'चे शासकिय समन्वयक एस. एस. पानसरे, दिग्विजय सिंग यांच्यासह बाळकृष्ण बंदरे आणि इतर मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी सुनिल गावस्कर मैदानामध्ये विविध योजनांची माहिती देणारे स्टॉल्स प्रदर्शित करण्यात आले होते. ज्यामध्ये केंद्र आणि राज्य शासन तसेच नवी मुंबई महापालिकेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती देणारे आणि योजनांचा लाभ मिळण्यासाठी अर्ज भरण्यापासून संपूर्ण सहकार्य करण्यात आले. यात पीएम स्वनिधी योजना, स्वनिधी से समृध्दी योजना, आभा कार्ड, आयुष्यमान कार्ड योजना, पीएम उज्ज्वला योजना, पीएम विश्वकर्मा योजना, पीएम मुद्रा लोन, स्वच्छ भारत अभियान, स्टार्ट अप इंडिया, स्टँड अप इंडिया, खेलो इंडिया, पीएमई बस सेवा, आरोग्य तपासणी अशा विविध योजनांच्या स्टॉलचा समावेश होता.
यावेळी १२०० हुन अधिक नागरिकांनी स्टॉल्सना भेटी देत विविध योजनांची माहिती जाणून घेत काही योजनांचे अर्ज भरुन लाभही घेतला. महापालिका आरोग्य विभागामार्फत रक्त तपासणी आणि क्षयरोग तपासणी कक्षाची स्थापना करण्यात आली होती. तेथेही भेट देऊन अनेक नागरिकांनी आरोग्य तपासणी करून घेतली.
या ठिकाणी केंद्र सरकारच्या वतीने योजनांच्या माहिती प्रसारणासाठी एलईडी व्हॅनची व्यवस्था करण्यात आली होती. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदेश प्रसारित केला जात होता. तसेच १२.३० वाजल्यापासून पंतप्रधान मोदी देशभरातील विविध ठिकाणच्या नागरिकांशी थेट प्रक्षेपणाद्वारे संवाद साधत होते, त्याचेही प्रक्षेपण आमदार आणि इतर मान्यवरांनी नागरिकांसमवेत पाहिले.
२७ डिसेंबर पासून १८ जानेवारी पर्यंत महापालिका क्षेत्रातील दिघा ते बेलापूर पर्यंत ४५ ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या ‘विकसित भारत संकल्प यात्रा'ला नागरिकांनी प्रत्येक ठिकाणी उत्तम प्रतिसाद दिला. सदर उपक्रम यशस्वी केल्याबद्दल कोणत्याही सामाजिक कार्यात मनापासून सहभागी होणाऱ्या नवी मुंबईकर नागरिकांचे अभिनंदन करतो. -राजेश नार्वेकर, आयुक्त-नवी मुंबई महापालिका.