नवी मुंबईतील १० डान्स बार, ५ पबवर पहाटेपर्यंत कारवाई  

नवी मुंबई : पुणे मधील पोर्शे कार अपघात प्रकरणानंतर खडबडून जागे झालेल्या नवी मुंबई महापालिका, उत्पादन शुल्क विभाग आणि पोलीस विभागाने नवी मुंबईत रात्री उशीरापर्यंत चालणारे पब, लेडीज बार आणि अनधिकृत ढाब्यांवर कारवाईला सुरुवात केली आहे. २८ मे रोजी रात्रभर या तिन्ही विभागाच्या संयुक्त पथकाने शहरातील १० डान्स बार, ५ पब आणि इतर बार मधील अनधिकृत बांधकामावर कारवाईचा हातोडा मारला आहे. या कारवाईदरम्यान १ लाख रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला.

पुणे मधील कल्याणीनगरमध्ये पोर्शे कारच्या अपघातानंतर रात्रभर चालणारी पब संस्कृती प्रकाशझोतात आली आहे. पुणे पाठोपाठ नवी मुंबईत देखील पब संस्कृती फोफावत असल्याचे आणि नवी मुंबई शहरात रात्रभर अनेक बार, पब, हुक्का पार्लर सुरु राहत असल्याचे पोलिसांनी वेळोवेळी केलेल्या कारवाईवरुन दिसून आले आहे. पुणे मधील घटनेनंतर नवी मुंबई महापालिका, उत्पादन शुल्क विभाग आणि पोलीस विभागाने आपल्या हद्दीतील बार, पब आणि ढाब्यांची झाडाझडती सुरु केली आहे. याच अनुषंगाने नवी मुंबई महापालिका अतिक्रमण विभाग, उत्पादन शुल्क विभाग आणि पोलीस विभागाकडून २८ मे रोजी रात्री अचानक नवी मुंबईतील पब, लेडीज बारच्या अनधिकृत बांधकामांवर २९ मे रोजी पहाटेपर्यंत कारवाई करण्यात आली.

नवी मुंबई महापालिका अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त डॉ. राहुल गेठे यांच्या मार्गदर्शनाखाली वाशी, तुर्भे, नेरुळ, सीबीडी येथील १० डान्सबार, ५ पब-लेडीज बार तसेच अनधिकृत ढाब्यांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत चुकीच्या पध्दतीने बांधकाम करणे, पवानगी पेक्षा मोठा बोर्ड लावणे, वेळेचे बंधन न पाळता डान्सबार सुरु ठेवणे, अशा विविध कारणास्तव सदरची कारवाई करण्यात आली.

या मोहिमेत अतिक्रमण विभागाचे सहा. आयुक्त डॉ. अजय गडदे, बेलापूर विभागाचे सहा. आयुक्त शशिकांत तांडेल, नेरुळ विभागाचे सहा. आयुक्त डॉ.अमोल पालवे, वाशी विभागाचे सहा. आयुक्त सागर मोरे, तुर्भे विभागाचे सहाय्यक आयुक्त भरत धांडे आणि अतिक्रमण विभागाचे कनिष्ठ अभियंता सहभागी झाले होते.

दरम्यान, यापुढील काळात देखील बार, पब आणि अनधिकृत ढाब्यांवर अशाच प्रकारची तीव्र कारवाई करण्यात येणार असल्याचे उपआयुवत डॉ. राहुल गेठे यांनी सांगितले. 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

रासायनिक कंपन्या हद्दपार करा; पण कामगारांचा करा विचार