म्हाडा निर्णयाच्या धर्तीवर सिडकोनेही घरांच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घ्यावा
मराठा आंदोलन दरम्यान सहकार्य; सकल मराठा समाज तर्फे महापालिका आयुक्तांचे आभार
वाशी : वाशी मधील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे दिनांक २५,२६ आणि २७ जानेवारी २०२४ रोजी मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वात झालेल्या मराठा समाज आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान नवी मुंबई महापालिकेने केलेल्या सहकार्याबद्दल १२ फेब्रुवारी रोजी सकल मराठा समाज द्वारे नवी मुंबई महापालिका आयुक्त तथा प्रशासक राजेश नार्वेकर आणि महापालिका आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत जवादे यांची भेट घेऊन आभारपत्र तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
सकल मराठा समाजाच्या मागणीनंतर नवी मुंबई महापालिका कल्याण विभागाने गरजू विद्यार्थ्यांसाठी इयत्ता पहिली ते पदवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या गरजू-विद्यार्थिनींसाठी शिष्यवृत्ती योजना जाहीर केली. यामध्ये ८० टक्के मार्कांची अट टाकण्यात आली होती. सदरची अट शिथिल करुन मागील वर्षाप्रमाणे ६५ टक्के इतकीच कायम ठेवल्याबद्दल सकल मराठा समाज द्वारे महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांचे आभार मानण्यात आले. तसेच शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी २८ फेब्रुवारी २०२४ पर्यंत दिलेली मुदत वाढविण्याची विनंती केली. यावर महापालिका आयुक्त तथा प्रशासक राजेश नार्वेकर यांनी सकारात्मक भूमिका दाखवत योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. महापालिका शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेता यावा, यासाठी शिष्यवृत्ती योजनेच्या जनजागृतीबाबत महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांना एक पत्र देऊन सदर योजनेच्या जनजागृतीसाठी काही उपाययोजना करण्याची सूचना सकल मराठा समाज द्वारे करण्यात आली.
दरम्यान, या भेटीत नवी मुंबई शहरातील नागरी सुविधांबाबत सकल मराठा समाज तर्फे महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांचे लक्ष वेधण्यात आले. तसेच नेरुळ सेक्टर-१ येथील प्रस्तावित छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाबाबत देखील यावेळी चर्चा झाली असून, लवकरात लवकर सदर स्मारकाचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी ‘सकल मराठा समाज'च्या शिष्टमंडळाला दिले .
यावेळी विनोद पोखरकर, डॉ. अमरदीप गरड, बाळासाहेब शिंदे, जयश्रीराजे महाडिक, डॉ. बाळासाहेब जगताप, विजय देशमुख, नेताजी कदम आदी उपस्थित होते.
सकल मराठा समाज तर्फे करण्यात आलेल्या इतर मागण्या
स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नवी मुंबई शहरातील नागरिकांना फोन करुन माहिती दिली जाते. त्याच धर्तीवर शिष्यवृत्ती योजनेची देखील नवी मुंबई शहरात बॅनर, होर्डिंग लावून, गाडीवर भोंगे लावून, वृत्तपत्रांमध्ये जाहिरात देऊन, प्रत्येक रेल्वे स्टेशन, महापालिका तसेच खाजगी शाळांच्या बाहेर, शाळेच्या आतमध्ये बॅनर लावून तसेच अल्प उत्पन्न गटातील नागरिक बांधव मोठ्या प्रमाणात राहत असलेल्या दिघा, ऐरोली, रबाळे, घणसोली, महापे, कोपरखैरणे, तुर्भे भागात वेगवेगळ्या माध्यमातून शिष्यवृत्ती योजनेची मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी.