गोदामातून विषारी पाणी नाल्यात सोडल्याने पाणी दुषित  

गोदाम चालकावर कारवाई करण्याची मागणी

उरण - चिरनेर येथिल श्री समर्थ वेअर हाऊस नामक एका गोदामातून विषारी आणि केमिकल युक्त पाणी नाल्यात सोडल्यामुळे नाल्यातील सर्व पाणी दुषित झाले असून नाल्यातील मासे मरून पडले आहेत. हे दुषित पाणी आजूबाजूच्या शेतीमध्ये जाऊन त्याचा दुषपरीणाम शेतीवर होण्याची शक्यता असल्याने संबधीत गोदाम चालकावर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी आणि ग्रामस्थांनी केली आहे.

उरण तालुक्यातील चिरनेर ग्रामपंचायत हद्दीत चिरनेर- खारपाडा  रस्त्यालगत श्री समर्थ वेअर हाऊस असून या गोदामातून बुधवारी ( दि१३) विषारी केमिकल युक्त पाणी नाल्यात सोडण्यात आले होते.  हे पाणी नाल्यात सोडल्यामुळे संपूर्ण नाल्यातील पाणी लाल झाले आणि त्यामुळे या नाल्यात असणारे मासे तडफडून मरू लागले. ग्रामस्थांना ही बातमी समजल्यानंतर त्यांनी या गोदाम चालकाला या बाबत जाब विचारला त्यावेळेस त्यांनी गोदामातील दोन वाटाण्यांच्या गोणी भिजल्या असलामुळे ते पाणी नाल्यात गेले असल्याचे सांगितले. मात्र वाटाण्याच्या पाण्यापासून पाणी दुषित होवू शकत नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

काही दिवसांपूर्वी कोप्रोली येथिल ग्लोबिकॉन सीएफएस मधून असेच दुषित पाणी सोडल्याने संपूर्ण नाल्याचे पाणी दुषित होवून मासे मेले होते. आत्ता चिरनेर विभागातील अनधिकृत पणे थाटलेल्या गोदामांमध्ये देखिल हे प्रकार घडू लागले आहेत. अगोदरच ही गोदामे थाटताना सिडकोकडून परवानगी घेतलेल्या नाहीत. शिवाय नाले, नैसर्गिक पाण्याचे प्रवाह बंद करून भराव करून ही गोदामे उभारली आहेत. त्यामुळे या गोदामांवर उरण तहसीलने ,सिडकोने आणि महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

या घटनेसंदर्भात श्री समर्थ यार्ड व्यवस्थापनाकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की गोदामात वाटाणे हे नाशवंत झाले होते.त्याच्या विल्हेवाटाचे पाणी नाल्यात वाहून गेले आहे.मासे मरण पावले की नाही हे माहीत नाही.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

वेतनासाठी प्रतिक्षा करणाऱ्या कंत्राटी सफाई कामगारांनी काढला पनवेल महापालिकेवर मोर्चा