शिवसेना ठाकरे गटाला धक्का 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत केला प्रवेश

कल्याण : शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा महिला संघटक विजया पोटे आणि माजी नगरसेवक अरविंद पोटे यांनी गुरुवार 18 तारखेला  पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह ठाणे येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

पक्षप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण ही शिकवण आपल्याला असून पूर्वीच्या पक्षात मात्र आता १०० टक्के राजकारण होते. त्यामुळे आपण शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे यावेळी विजया पोटे यांनी सांगितले. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मागील १० वर्षात कल्याण लोकसभेत मोठ्या प्रमाणात कामे केली असून त्यामुळे यंदा त्यांची हॅट्ट्रिक नक्की होईल, असा विश्वासही  पोटे यांनी व्यक्त केला.

विजया पोटे यांसह  उपशहर संघटक पल्लवी बांदिवडेकर, नमिता साहू, भारती भोसले, मंदाकिनी गरुड, मोनिका इंगळे, रंजना पाटील, वंदना पाटील यांच्यासह विभाग संघटक, उपविभाग संघटक, शाखा संघटक, उपशाखा संघटक, युवासेना पदाधिकारी असे सुमारे १०० पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. याप्रसंगी कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, शिवसेना राज्य समन्वयक नरेश म्हस्के, शिवसेनेचे स्टार प्रचारक राहुल लोंढे, उल्हासनगर उपजिल्हाप्रमुख अरुण आशान यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विजया पोटे यांचे शिवसेनेत स्वागत केले. महाराष्ट्राला आज फेसबुकवर काम करणारे नको, तर फेस टू फेस काम करणारे हवेत, असे म्हणत विरोधकांना टोला लगावला. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मागील १० वर्षात कल्याण लोकसभेत विक्रमी कामे केली असून ते  मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

‘निवडणूक आयोग'विरुध्द शिक्षण क्रांती संघटना उच्च न्यायालयात