ठाणे येथे उभे राहणार धर्मवीर आनंद दिघे कॅन्सर हॉस्पिटल

कॅन्सर हॉस्पिटल केवळ ठाणे जिल्ह्यासाठी नव्हे तर राज्यासाठी देखील महत्त्वाचे -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे : टाटा मेमोरियल सेंटर, ठाणे महापालिका आणि जितो ट्रस्ट यांच्या संयुक्त प्रयत्नातून बाळकुम रोड (ग्लोबल हॉस्पिटल) ठाणे येथे धर्मवीर आनंद दिघे कॅन्सर हॉस्पिटल आणि त्रिमंदीर संकुलाचा भूमीपुजन समारंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि ‘दादा भगवान फाऊंडेशन'चे दीपक देसाई यांच्या हस्ते ३० जुलै रोजी संपन्न झाला.

याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय पंचायत राज मंत्री कपिल पाटील, राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा ठाणे जिल्हा पालकमंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री दादाजी भुसे, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री रविंद्र चव्हाण, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, राहुल शेवाळे, जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, ‘एमएसआरडीसी'चे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, ‘टाटा मेमोरियल हॉस्पिटल'चे प्रख्यात वैद्यकीय कॅन्सर तज्ञ डॉ. शैलेश श्रीखंडे, महसूल, पोलीस आणि इतर शासकीय विभागातील वरिष्ठ अधिकारी, व्यापार, सामाजिक, वैद्यकीय क्षेत्रातील विविध मान्यवर यांची उपस्थिती होती.

धर्मवीर आनंद दिघे कॅन्सर हॉस्पिटल केवळ ठाणे जिल्ह्यासाठी नव्हे तर संपूर्ण राज्यासाठी देखील महत्त्वाचे आहे. औषधोपचाराबरोबरच आशिर्वाद आणि प्रार्थनेचीही गरज असते. या हॉस्पिटलच्या नावातच आनंद आहे. ज्यांनी आयुष्यामध्ये फक्त इतरांच्या आनंदाचाच विचार केला, दुसऱ्याचा आनंद हाच आपला आनंद मानला. दुसऱ्यांचे दुःख कमी करण्याचे काम केले, अशा धर्मवीर आनंद दिघेंचे नाव या कॅन्सर हॉस्पिटलला देण्यात आले आहे. तो क्षण माझ्यासाठी अत्यंत मोलाचा आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

३१ डिसेंबरचा दिवस आम्ही आजही रक्तदानाने साजरा करतो. रवतदानाी परंपरा आनंंद दिघे यांनी सुरु केली होती. त्यांच्यामुळेच आम्ही घडलो. आज मी जरी मुख्यमंत्री असलो तरी कार्यकर्ता म्हणूनच काम करतो आणि यापुढेही असेच काम करीत राहीन, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मनोगतातून ठाण्यात धर्मवीर आनंद दिघे कॅन्सर हॉस्पिटल निर्माण होत असल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मनापासून आभार मानले. राजकारणापेक्षा सेवा करणारा नेता म्हणून धर्मवीर आनंद दिघे यांच्याकडे पाहिले जात होते. त्यांचा वारसा मुख्यमंत्री शिंदे पुढे नेत आहेत. ‘जितो ट्रदट'च्या माध्यमातून चांगले काम होत आहे. ज्याच्या मागे जितो आणि जैन समाज आहे, त्याच्याकडे संसाधनांची कमतरता भासत नाही. या ‘ट्रस्ट'च्या माध्यमातून देशभरात मोठ्या प्रमाणात सेवा कार्य होत आहे. कॅन्सर रोगामध्ये देशभरात दुर्दैवाने मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. २०३५ पर्यंत कॅन्सरच्या रुग्णांमध्ये वाढ होणार आहे. कॅन्सर जगातील दुसऱ्या क्रमांकाचा किलर रोग आहे. या रोगामुळे फक्त आजारी एकट्या व्यक्तीलाच नव्हे तर कुटुंबातील सर्वांनाच त्रास होतो. टाटा कॅन्सर हॉस्पिटलच्या माध्यमातून ठाणे शहरात कॅन्सर हॉस्पिटल होत आहे. आस्थेचे आणि सेवेचे मंदीर आजुबाजुला होत आहे. त्यामुळे या हॉस्पिटलमध्ये आलेला रुग्ण बरा होऊनच जाईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यवत केला.

आजच्या काळाची गरज उत्तम शिक्षण आणि आरोग्य या गोष्टी आहेत. आपल्या देशात सोयीसुविधांचा अभाव आहे. इच्छा असूनही चांगले शिक्षण, आरोग्य सुविधा मिळत नाही. या सुविधा सहज मिळू शकतील अशा अंतरावर असायला हव्यात. सध्याच्या काळात कॅन्सर हॉस्पिटल असणे आवश्यक आहे. मानवाची बदलती दिनचर्या (लाईफ स्टाईल) आणि सायकोसोमॅटिक आजारांमुळे सदर सर्व आहे. कॅन्सर हॉस्पिटल सेवा कार्य आहे. आजच्या जीवनात संवेदना महत्त्वाची आहे. आपण चांगले केले तर आपल्याकडे चांगलेच येईल. केवळ लाभासाठी काम करण्याची भावना ठेवल्यास लाभ होत नसतो. चांगले केले तरच चांगले होईल, यावर विश्वास ठेवायलाच हवा, असे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आपले विचार मांडताना सांगितले. तसेच सर्वांना जवळ पडेल आणि परवडतील अशी कॅन्सर हॉस्पिटल राज्यात होणे गरजेचे असल्याचेही मोहन भागवत म्हणाले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक ‘जितो एज्युकेशन-मेडीकल ट्रस्ट'चे अध्यक्ष अजय आशर यांनी केले. या हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारच्या आरोग्य सोयीसुविधांसह ६०० हुन अधिक खाटांचे नियोजन करण्यात येणार असून गरजू कॅन्सरग्रस्त रुग्णांना अत्याधुनिक क्रोटॉन थेरपीचीही सुविधा तसेच रुग्णांबरोबर येणाऱ्या नातेवाईकांसाठी अत्यल्प दरात भोजन व्यवस्था देखील असणार आहे, अशी माहितीही आशर यांनी दिली. कार्यक्रमाच्या शेवटी महेंद्र जैन यांनी आभार मानले. 

 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

वाशीत ‘आंतरराष्ट्रीय छायाचित्र प्रदर्शन'चे आयोजन, ४३ देशांतील २१९ फोटोग्राफर्स सहभागी