प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वेने बांधलेले रेलिंग ओलांडून प्रवाशांचा जीवघेणा प्रवास सुरुच
नवी मुंबई : प्रवाशांनी रेल्वे रुळ ओलांडू नये यासाठी रेल्वे प्रशासनाने फ्लॅटफॉर्मच्या दोन्ही बाजूकडील रॅम्प तोडुन त्याठिकाणी लोखंडी रेलिंग बसविल्यानंतर देखील बहुतेक प्रवाशांचा रेलिंग ओलांडून रेल्वे रुळांवरुन प्रवास सुरु असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे रेल्वे रुळ ओलांडणाऱ्या या प्रवाशांना आवारायचे कसे? असा प्रश्न रेल्वे प्रशासनाला पडला आहे.
प्रवाशांची रेल्वे रूळ ओलांडून फलाटावर जाण्याची सवय मोडावी तसेच त्यांनी रेल्वे स्थानकातील पादचारी पूलाचा वापर करावा, यासाठी रेल्वे प्रशासनाकडून रेल्वे स्थानकात सर्वतोपरी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मध्य व हार्बर रेल्वे मार्गावरील बहुतेक रेल्वे स्थानकाच्या दोन्ही टोकाला असलेले रॅम्प तोडून त्याजागी लोखंडी रेलिंग बसविले आहेत. मात्र त्यानंतर देखील शॉर्टकट मारण्याच्या व वेळ वाचवण्याचा नादात अनेक प्रवासी आपला जीव धोक्यात घालुन रेल्वे रुळ ओलांडून जात असल्याचे निदर्शनास आले आहे.
गत नोव्हेंबर महिन्यात रेल्वे स्थानकावरील रॅम्प तोडुन त्याजागी रेलिंग बसवण्यास कामाला सुरुवात झाली आहे. मात्र त्यानंतर देखील प्रवाशांचा बेजबाबदारपणा सुरु असून हार्बर रेल्वे मार्गावरील बहुतेक रेल्वे स्थानकात प्रवाशांकडून रेल्वे रुळ ओलांडण्याचे प्रकार सर्रास सुरु आहेत. हे प्रवासी आता लोखंडी रेलिंग सुद्धा ओलांडून रेल्वे रुळावरून येजा करत असल्याचे निदर्शनास येत आहे.
ग्रीस लावुन प्रवाशांना अटकाव करण्याचा प्रयत्न
रेल्वे स्थानकाच्या दोन्ही टोकाला असलेले रेलींग ओलांडून ये-जा करणाऱया प्रवाशांना रोखण्यासाठी रेल्वे प्रशासनाने रेलींगच्या बाजुला फलाटावर मोठÎा प्रमाणात ग्रीस पसरवून ठेवण्यास सुरुवात केली आहे. जेणेकरुन या ठिकाणावरुन जाणाऱया प्रवाशांच्या चफ्पल, बुट व कपडÎांना ग्रीस लागण्याची भिती असल्याने प्रवासी रेलींग ओलांडुन जाणार नाहीत. मात्र अनेक प्रवासी त्याची तमा न बाळगता रेलींग ओलांडून जात असल्याचे निदर्शनास येत आहे.
रेल्वे पोलिसांची कारवाई थंडावली
रेल्वे रुळ ओलांडताना प्रवासी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करत त्यांचे समुपदेशन करण्याचे काम रेल्वे पोलिसांद्वारे करण्यात येते. मात्र गेल्या काही दिवसांपासून ही कारवाई थंडावल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रवाशांकडून रेल्वे रुळ ओलांडून शॉर्टकट मारण्याचे प्रकार सुरु आहेत. एका रेल्वे स्थानकात आरपीएफ, जीआरपी, एमएसएफ जवान असे फक्त 3 ते 4 कर्मचारी असतात, एवढ्या अल्प मनुष्यबळात सर्व ठिकाणी लक्ष देणे त्रासदायक आणि आव्हानात्मक असल्याचे रेल्वे पोलिस कर्मचा-यांचे म्हणणे आहे.
रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना आवाहन
प्रवाशांनी रेल्वे रुळ ओलांडू नये यासाठी रेल्वे प्रशासनाने मध्य व हार्बर रेल्वे मार्गावरील रेल्वे स्थानकात पादचारी पूल, सरकते जिने (एक्सलेटर), लिफ्ट उभारण्याचे काम हाती घेतले आहे. यापैकी बहुतेक रेल्वे स्थानकात पादचारी पुल, सरकते जिने व लिफ्ट उभारण्याचे काम पुर्ण झाले आहे. तर काही स्थानकातील कामे प्रगतीपथावर आहेत. त्यामुळे प्रवाशांनी रेल्वे रुळ न ओलांडता पादचारी पूल, सरकते जिने, लिफ्ट यांचा वापर करावा असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडुन करण्यात येत आहे.
रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांसाठी उपाययोजना
रेल्वे प्रशासनाकडून मिशन जीवनरक्षा अंतर्गत विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. या उपक्रमातंर्गत रेल्वे रुळ ओलांडणाऱया प्रवाशांवर कारवाई करण्यात येत आहे. मागील 3 वर्षात रेल्वे रुळ ओलांडणाऱ्या 50 हजारांहून अधिक प्रवाशांवर रेल्वे प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली आहे. याबरोबरच उपनगरीय रेल्वेमार्गावरील विविध स्थानकांत जनजागृती कार्यक्रम व उपक्रम राबविण्यात येत आहेत. मात्र त्यानंतर देखील प्रवाशांकडून रेल्वे रुळ ओलांडण्याचे प्रकार सुरुच आहेत. त्याशिवाय दंडात्मक कारवाई, रेल्वे रुळ ओलांडण्यासाठी प्रवाशांना मज्जाव करणे, उद्घोषणा अशा विविध उपाययोजना करण्यात येऊन सुद्धा प्रवाशांकडून स्वतचे जीव धोक्यात घालणे सुरुच आहे.