मिशन कन्विक्शन अंतर्गत नवी मुंबई पोलिसांचे पथदर्शी उपक्रम

नवी मुंबई : नवी मुंबई पोलिसांनी मिशन कन्विक्शनअंतर्गत दोष सिध्दीच्या प्रमाणाची टक्केवारी वाढविण्यासाठी गत वर्षभरामध्ये अनेक नवे उपक्रम हाती घेतले आहेत. त्यापैकीच एनआरआय आणि पनवेल तालुका पोलीस ठाणे येथे मध्यवर्ती पुरावा व्यवस्थापन कक्ष (एव्हीडन्स मॅनेजमेंट सेंटर-इएमएस) तसेच तळोजा पोलीस ठाण्याच्या आवारात वाहनांसाठी पुरावा व्यवस्थापन कक्ष (व्हेईकल एविडन्स सिस्टीम) सुरु केले आहे. या ‘मध्यवर्ती पुरावा व्यवस्थापन कक्ष'मुळे पोलिसांच्या कार्यक्षमातेत वाढ होणार आहे.  

यापूर्वी गुन्ह्यातील मुद्देमाल पोलीस ठाण्यातील मुद्देमाल कक्षामध्ये ठेवला जात होता. परंतु, पोलीस ठाण्यात पुरेशी जागा नसल्यामुळे मुद्देमाल खराब होणे, ओला होणे या सारख्या अनेक समस्यांमुळे गुन्ह्यातील मुद्देमाल खराब होण्याचे प्रकार होते होते. त्यामुळे अशा प्रकारचे मुद्देमाल योग्य पध्दतीने न्यायालयात सादर करण्यात देखील अडचणी निर्माण होत होत्या. सदर सर्व मुद्देमाल पोलीस ठाण्यामधून एका स्वतंत्र ठिकाणी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन ठेवल्यास जागेची, वेळेची आणि मनुष्यबळाची बचत होऊ शकते, हे लक्षात घेऊन पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या संकल्पनेनुसार नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात मध्यवर्ती पुरावा व्यवस्थापन कक्ष (एव्हीडन्स मॅनेजमेंट सेंटर) सुरु करण्यात आले आहे. 

 परिमंडळ-१ मधील पोलीस ठाण्यांकरिता एनआरआय पोलीस ठाण्याच्या आवारात आणि परिमंडळ-२ मधील पोलीस ठाण्यांसाठी पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या आवारात स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. या कक्षामध्ये एव्हीडन्स मॅनेजमेंट सिस्टीम या ऑनलाईन प्रणालीचा वापर करण्यात आला असून प्रत्येक पोलीस ठाण्याकरिता स्वतंत्र रॅक आणि मुद्देमालासाठी स्वतंत्र क्यु.आर. कोडची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे मुद्देमाल तत्काळ एका विलकवर उपलब्ध होणार आहे. यापूर्वी मुद्देमालाचे जतन करण्यासाठी आणि त्याच्यावर देखरेख ठेवण्यासाठी प्रत्येक पोलीस स्टेशनचे मनुष्यबळ वाया जात होते. ‘एव्हीडन्स मॅनेजमेंट सिस्टीम'साठी एनआरआय आणि पनवेल या दोन्ही सेंटरमध्ये प्रत्येकी ३ किंवा ४ कर्मचारी तैनात राहणार आहेत. त्यामुळे पोलीस ठाण्यातील वाचलेल्या मनुष्यबळाचा इतर ठिकाणी वापर करता येणार आहे.  

एका क्लिकवर मुद्देमालाची माहिती...
प्रमाण नावाच्या ॲपिलकेशनच्या माध्यमातून ‘मुद्देमाल कक्ष'च्या व्यवस्थापनाची संपूर्ण प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. घटनास्थळावरुन ताब्यात घेतलेला मुद्देमाल सील झाल्यानंतर मुद्देमाल कारकुनकडे पाठवला जाणार आहे. तेथे त्याच्यावर क्युआर कोड टाकला गेल्यानंतर तो एव्हीडन्स डिस्पॅच व्हॅनमधून ‘एफएसएल'ला पाठवला जाणार आहे. तेथून सदर मुद्देमाल ‘एव्हीडन्स मॅनेजमेंट सेंटर'ला गेल्यानंतर तो कोर्टात पाठवला जाणार आहे. या सर्व गोष्टी टॅम्पर प्रुफ असल्यामुळे क्युआर कोडची संपूर्ण प्रक्रिया डिजिटायजेशन केली गेली आहे. मुद्देमालावरील क्युआर कोड स्कॅन केल्यानंतर ते कुठून आले आहे आणि त्याला कुणी कुणी हँडल केले आहे, ते तत्काळ समजणार आहे.  

एव्हीडन्स डिस्पॅच वाहन...  
यापूर्वी प्रत्येक पोलीस स्टेशनचे एक-एक कर्मचारी ठाणे चरई येथे किंवा कालिना येथे दररोज एव्हीडन्स घेऊन जात होते. आता ‘एव्हीडन्स डिस्पॅच वाहन'मुळे त्याची गरज भासणार नाही. मुद्देमाल व्यवस्थित घेऊन जाण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या ‘एव्हीडन्स डिस्पॅच व्हॅन'मध्ये विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच त्यात फ्रिजची देखील व्यवस्था करण्यात आली आहे. या व्हॅनमध्ये १ पोलीस कर्मचारी आणि १ वाहन चालक राहणार आहे. या व्हॅनमुळे पोलीस स्टेशनचे मनुष्यबळ वाचणार आहे.  

पोलीस ठाण्याच्या आवारातील वाहनांसाठी एव्हीडन्स मॅनेजमेंट सिस्टीम-व्हेईकल कक्ष...
एखाद्या गुन्ह्यात अथवा अपघातातील वाहन पोलिसांनी जप्त केल्यानंतर ते पोलीस ठाण्याच्या आवारात ठेवले जात होते. त्यामुळे अनेक वर्षे सदर वाहने त्याच ठिकाणी ठेवली गेल्यामुळे वाहनांचे नुकसान होत होते. पोलीस ठाण्याच्या आवारात वाहनांचा ढिग लागत असल्यामुळे पोलीस ठाण्याला बकाल स्वरुप येत होते. त्यामुळे नवी मुंबई पोलिसांनी तळोजा पोलीस ठाण्याच्या आवारात मध्यवर्ती मुद्देमाल व्यवस्थापन कक्ष-वाहने (एव्हीडन्स मॅनेजमेंट सिस्टीम-व्हेईकल) कक्ष सुरु केले आहे. वाहनांसाठी तयार करण्यात आलेल्या या ‘मध्यवर्ती मुद्देमाल व्यवस्थापन कक्ष'मध्ये नवी मुंबई पोलीस आयुक्तालय अंतर्गत सर्व पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात जप्त करण्यात आलेली वाहने ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे पोलीस ठाण्याच्या आवार आता मोकळा श्वास घेणार आहे.  

इएमएस सुरु करणारे नवी मुंबई देशातील पहिले पोलीस आयुक्तालय
नवी मुंबई पोलिसांनी मिशन कन्विक्शन अंतर्गत मध्यवर्ती पुरावा व्यवस्थापन कक्ष (एविडन्स मॅनेजमेंट सेंटर-इएमएस) यासारखे आधुनिक यंत्रणेची कास धरुन प्रकल्प सुरु करणारे नवी मुंबई पोलीस आयुक्तालय देशातील पहिले पोलीस आयुक्तालय बनले आहे. त्यामुळे नवी मुंबई पोलिसांच्या या पथदर्शी प्रकल्पांची राज्यात सर्वत्र अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पनवेलमध्ये केली आहे.  

मिशन कन्विक्शन अंतर्गत दोष सिध्दीची टक्केवारी वाढविण्याच्या उद्देशाने गत वर्षभरामध्ये नेल्सन सिस्टीम, आय-बाईक, ई-पैरवी या सारखे उपक्रम सुरु करण्यात आले आहेत. आता एव्हीडन्स मॅनेजमेंट सिस्टीम, एव्हीडन्स मॅनेजमेंट सिस्टीम-व्हेईकल, तसेच डिस्पॅच व्हॅन असे नवीन उपक्रम सुरु करण्यात आले आहेत. या उपक्रमांमुळे मनुष्यबळ वाचत आहे. तसेच टेक्नॉलॉजीचा सुध्दा वापर होत आहे. त्यामुळे मिशन कन्विक्शन साध्य करुन जास्तीत जास्त गुन्हेगारांना शिक्षा मिळ्यास मदत होणार आहे.
-मिलिंद भारंबे, पोलीस आयुवत-नवी मुंबई. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

सीवूडस मधील कमळ तलाव नामशेष होण्याच्या मार्गावर?