आरटीई अंतर्गत शाळांचे १८०० कोटींचे शैक्षणिक शुल्क शासनाकडे प्रलंबित

 ‘आम आदमी पार्टी'च्या वतीने महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

नवी मुंबई :  आरटीई अंतर्गत विद्यार्थ्यांना मोफत शाळा प्रवेश देऊन मागील चार वर्षापासून शिक्षण देणाऱ्या शाळांचे १८०० कोटी रुपये सरकारने देणे आहे. त्याचा परिणाम म्हणून गरीब वंचित घरातील मुलांना शैक्षणिक फटका बसत असल्याच्या निषेधार्थ ‘आम आदमी पार्टी'च्या वतीने महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. त्याअनुषंगाने ‘आप'च्या ठाणे आणि नवी मुंबई टीम तर्फे २७ जून २०२३ रोजी ठाणे टीमने शिक्षणाधिकारी गोमासे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे तक्रार पत्र देऊन आरटीईच्या विविध मुद्द्यांवर चर्चा केली. याप्रसंगी ‘आप'चे ठाणे उपाध्यक्ष सतीश सलुजा, ओवळा-माजिवडा विधानसभा कार्याध्यक्ष अशोक वाल्मिकी, सचिव संकेत वाडेकर, नवी मुंबईतून वॉर्ड अध्यक्ष जावेद पवार आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

एकीकडे राजकीय नेते मंडळींच्या मुलांचे शिक्षण पंचतारांकित शाळेत, परदेशात चालू आहे. तर दुसरीकडे सरकार गरीब, वंचित घरातील मुलांचे शिक्षण व्हावे यासाठी मात्र निधी नसल्याचे कारण सांगत हात वर करीत आहे, अशी टिका ‘आप-ठाणे'चे उपाध्यक्ष सतीश सलुजा यांनी केला आहे.

महाराष्ट्रातील खाजगी शाळांमध्ये वंचित आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील पालकांची किमान १ लाख मुले दरवर्षी शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत प्रवेश घेतात. आता २०२२-२३ शैक्षणिक वर्ष सुरु झाले असून गेल्या चारवर्षातील सुमारे १८०० कोटी रुपये एवढी रक्कम शासनाने शाळांना न दिल्यामुळे अनेक ठिकाणी शाळा अडचणीत आल्या आहेत. दरवर्षी शासन दिरंगाई करीत असल्याने मुलांचे मोठे शैक्षणिक नुकसान होते आहे. यंदा पुन्हा तशीच वेळ आली आहे, असा आरोप ‘आप'चे ओवळा-माजिवडा विधानसभा कार्याध्यक्ष अशोक वाल्मिकी यांनी यावेळी केला.

दरम्यान, शासनाने शाळांची थकीत शैक्षणिक शुल्क रक्कम आठ दिवसात अदा करुन लाखो मुलांचे शिक्षण चालू ठेवावे, अशी मागणी ‘आम आदमी पार्टी' करीत आहे. अन्यथा आप त्याविरोधात राज्यभर तीव्र आंदोलन करेल, असा इशारा ‘आप'चे ठाणे शहर सचिव संतोष कोरी यांनी दिला आहे.

फुले शाहू आंबेडकर यांचे नाव घेत राज्य करणाऱ्या शासनाच्या दरबारी मुलांना मात्र न्याय मिळत नाही, अशी वस्तुस्थिती आहे. ‘संविधान'ने दिलेल्या शिक्षण हक्काची पायमल्ली होत आहे. -श्यामभाऊ कदम, कार्याध्यक्ष-आप, नवी मुंबई.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

राज्यातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात