फ्लेमिंगोंच्या मृत्युची ‘एनजीटी'कडून दखल

नवी मुंबई : नेरुळ येथील डीपीएस पलेमिंगो तलावाजवळ पलेमिंगो पक्ष्यांच्या झालेल्या मृत्युची स्वतःहून दखल घेत ‘राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण'च्या (एनजीटी) प्रधान खंडपीठाने सिडको, राज्य वन विभाग आणि पाणथळ प्राधिकरण यांना नोटिसा बजावल्या आहेत. 

दरम्यान, वारंवार पर्यावरणीय नियमांचे पालन करण्याशी संबंधित महत्त्वपूर्ण मुद्दे उपस्थित केले जात आहेत. विशेषतः वेटलँड (संवर्धन-व्यवस्थापन) नियम २०१७ च्या तरतुदींचे पालन, जैविक विविधता कायदा-२००२ आणि पर्यावरण (संरक्षण) कायदा- १९८६ बाबत ‘एनजीटी'ने टिप्पणी केली.

‘एनजीटी'चे अध्यक्ष न्यायमूर्ती प्रकाश श्रीवास्तव, न्यायमूर्ती अरुण कुमार त्यागी आणि तज्ञ सदस्य डॉ. अफरोज अहमद यांच्या खंडपीठाने पलेमिंगोंच्या मृत्युचे प्रकरण पश्चिम विभागाकडे वर्ग करुन सुनावणीसाठी १७ जुलै २०२४ ची तारीख निश्चित केली आहे.

‘सिडको'ने नेरुळ जेट्टी येथे नव्याने बांधलेल्या उंच रस्त्यांमुळे डीपीएस तलावातील ३ पैकी २ इनलेट ब्लॉक करण्यात आले होते. त्यामुळे त्यात पाणी साचले होते. पलेमिंगो सामान्यपणे वाहते पाणी असलेल्या भागात राहतात. त्यामुळे वृत्त अहवालातील प्राथमिक निरीक्षणांची ‘एनजीटी'ने दखल घेतली आहे.

पलेमिंगोंच्या मृत्युनंतर पर्यावरणवाद्यांनी उपस्थित केलेल्या चिंतेला त्वरित प्रतिसाद दिल्याबद्दल पर्यावरणवाद्यांनी ‘एनजीटी'चे स्वागत केले. ‘सिडको'ने नेरुळ येथील पॅसेंजर वॉटर टर्मिनलच्या कामामुळे आंतरभरतीच्या पाण्याच्या प्रवाहावर परिणाम होणार नाही या स्वतःच्या नियमांचेे उल्लंघन केले आहे. ते देखील केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने दिलेल्या पर्यावरण मंजुरीमध्ये नमूद केलेल्या अटींचे उल्लंघन आहे. तसेच पाण्याचा प्रवाह आणि जीवजंतू अबाधित आहे, याची खात्री करण्यासाठी राज्याने दिलेल्या सरकारी आदेशाचेही उल्लंघन झाले आहे, अशी बाब ‘नॅटकनेवट फाऊंडेशन'चे संचालक बी. एन. कुमार यांनी निदर्शनास आणली आहे.

 पलेमिंगोच्या निवासस्थानावर विपरित परिणाम करणाऱ्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरले पाहिजे. ‘सिडको'ने तलावाच्या संरक्षणासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाची अवहेलना केल्याच्या वृत्ताचीही ‘एनजीटी'ने दखल घेतली आहे. पलेमिंगोंच्या मृत्यूचे कारण ‘प्रकाश प्रदूषण' असू शकते, जे त्यांच्या नाजूक डोळ्यांमुळे पक्ष्यांची दृष्टी अंशतः बिघडवते, असे ‘सेव्ह पलेमिंगो ॲन्ड मँग्रोव्हज्‌ फोरम'च्या सदस्या रेखा सांखला यांनी सांगितले.

दरम्यान, नेरुळ जेट्टी, डीपीएस तलाव परिसरात लावण्यात आलेले एलईडी दिवे उडताना पक्ष्यांना दिशाभूल करतात, असे ‘एनजीटी'ने आदेशात नमूद केले आहे. त्यामुळे ‘एनजीटी'ने प्रधान मुख्य वन संरक्षक-नागपूर, महाराष्ट्र वेटलँड प्राधिकरण, सिडको आणि ठाणे जिल्हाधिकारी यांना पलेमिंगो मृत्यू प्रकरणी पश्चिम विभागीय खंडपीठासमोर जबाब नोंदवण्याचे निर्देश दिले आहेत. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

पावसाळ्यामधील मदतकार्यासाठी नवी मुंबई महापालिका सज्ज