मिरा-भाईंदर महापालिकेत ‘सीसीटीव्ही मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्ष'
विरंगुळा केंद्राच्या प्रतीक्षेत जुहूगाव मधील ज्येष्ठ नागरिक
वाशी : मागील ६ वर्षांपासून जुहूगाव येथे ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र बांधून द्यावे, अशी मागणी ज्येष्ठ नागरिक आधार संस्था, जुहूगाव तर्फे नवी मुंबई महापालिकेकडे करण्यात येत असून, मागणीचा पाठपुरावा देखील करण्यात येत आहे. मात्र, या मागणीला महापालिका प्रशासन दाद देत नसल्याने जुहूगाव मधील ज्येष्ठ नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
ज्येष्ठ नागरिकांना सायंकाळी काही क्षण निवांत घालविण्याच्या उद्देशातून, ज्येठांच्या विचारांचे आदान-प्रदान व्हावे, मन हलके व्हावे म्हणून नवी मुंबई महापालिका प्रशासनाने नवी मुंबई शहरात ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राची संकल्पना राबवली. त्यानंतर नवी मुंबई महापालिका जेष्ठांना त्यांच्या हक्काचे सुसज्ज असे विरंगुळा केंद्र बांधून देणारी देशातील पहिली महापालिका ठरली होती. पण, अजूनही नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील अनेक प्रभागात जेष्ठ नागरिक त्यांच्या हक्काच्या विरंगुळा केंद्रापासून वंचित असून, विरंगुळा केंद्र बांधून देण्याची मागणी होत आहे. वाशी सेक्टर-११ मधील जुहूगाव येथील ज्येष्ठ नागरिक आधार संस्था द्वारे जुहूगावातील गावदेवी मैदान लगत पडीक जागेत ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र बांधून देण्याची मागणी २०१७ पासून करण्यात येत आहे. मागणी प्रत्यक्षात येण्यासाठी पाठपुरावा देखील सुरु आहे.मात्र, सदर मागणीला महापालिका प्रशासन दाद देत नसल्याने जुहुगावातील ज्येष्ठ नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत.
जुहूगाव मध्ये ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र बांधून द्यावे म्हणून, संस्था सदस्य २०१७ पासून नवी मुंबई महापालिका प्रशासनाकडे चपला झिजवत आहेत. मात्र, महापालिका प्रशासन ज्येष्ठांच्या मागणीची दखल घेत नाही. - जगन्नाथ म्हात्रे, खजिनदार - ज्येष्ठ नागरिक आधार संस्था, जुहूगाव, नवी मुंबई.
जुहूगाव मध्ये ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र बांधून देण्याच्या मागणीनुसार महापालिका समाज विकास विभागाला उचीत कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. - राजेश नार्वेकर, आयुक्त - नवी मुंबई महापालिका.