बेकायदेशीर वास्तव्य; १२ परदेशी नागरिकांची धरपकड

नवी मुंबई : खारघर पोलिसांनी आपल्या हद्दीत केलेल्या कोंबींग ऑपरेशन दरम्यान खारघर परिसरात बेकायदेशीररीत्या वास्तव्यास असलेल्या १२ परदेशी नागरिकांची धरपकड करण्यात आली. यात १० आफ्रिकन महिला तसेच २ बांग्लादेशी नागरिकांचा समावेश आहे. सदर सर्व परदेशी नागरिक काही वर्षापासून नवी मुंबईत बेकायदेशीरपणे वास्तव्यास असल्याचे त्यांच्या चौकशीत आढळून आले आहे. पोलिसांनी या सर्व परदेशी नागरिकांना अटक करुन त्यांना त्यांच्या मुळ देशात पाठविण्याची कार्यवाही सुरु केली आहे.  

 लोकसभा निवडणुकीदरम्यान कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, तसेच कायदा-सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी नवी मुंबई पोलिसांनी रेकॉर्डवरील आरोपी, पाहिजे आरोपी, गुंड, हिस्ट्रीशीटर तसेच अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्यांची झाडाझडती सुरु केली आहे. त्यासाठी नवी मुंबई पोलिसांनी वेगवेगळ्या भागामध्ये कोंबींग ऑपरेशन राबवून गुन्हेगार आणि बेकायदेशीर कृत्य करणा-यांची धरपकड सुरु केली आहे. त्यानुसार १९ एप्रिल रोजी रात्री खारघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोंबींग ऑपरेशन राबविण्यात आले होते. या कोंबिंग ऑपरेशन दरम्यान खारघर, सेक्टर-२७ मधील रांजणपाडा भागातील मेट्रो रेसीडेन्सी या इमारतीत काही नायजेरियन नागरिक बेकायदेशीररित्या राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.  

त्यानुसार पोलिसांनी रात्री १०.१५ वाजण्याच्या सुमारास मेट्रो रेसीडेन्सी इमारतीतील एका पलॅटवर छापा मारला असता, सदर पलॅटमध्ये १० आफ्रिकन महिला राहत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी सदर सर्व महिलांकडे पासपोर्ट आणि व्हिजा बाबत चौकशी केली असता, त्यांच्याकडे भारतातील वास्तव्याबाबतचे कागदपत्रे तसेच पासपोर्ट, व्हिजा नसल्याचे आढळून आले. तसेच त्यांनी युगांडा देशाचे नागरिक असल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी या महिलांविरोधात विदेशी व्यक्ती अधिनियम-पारपत्र अधिनियमानुसार गुन्हा दाखल करुन सर्व महिलांना ताब्यात घेतले आहे.  

दरम्यान, खारघर पोलिसांचे पथक १९ एप्रिल रोजी रात्री कोंबींग ऑपरेशन दरम्यान सेक्टर-१८ मध्ये गस्त घालत असताना, बालाजी स्वीट समोर काजल मुख्तार शेख (३६) आणि नुर इस्लाम लतीफ शेख (४२) या दोन व्यक्ती संशयास्पदरित्या आढळून आल्या. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांच्याकडे भारतातील वास्तव्याबाबतचे तसेच पासपोर्ट आणि व्हिसा आदि कागदपत्रे नसल्याचे आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता, त्यांनी बांग्लादेशी नागरिक असल्याची कबुली दिली. तसेच त्यांनी नवी मुंबई परिसरात ५ ते ६ वर्षापासून राहत असल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी या दोघांना अटक केली आहे. 

 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

‘एपीएमसी'चे शीतगृह सुरु होण्यास दिरंगाई